Peter Navarro on India अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचे सूत्रधार त्यांचे व्यापारविषयक सल्लागार पीटर नवारो आहेत. पूर्वीपासून त्यांची भारतविरोधी भूमिका राहिली आहे. पीटर नवारो वारंवार भारताविरोधात वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. नवारो यांनी युक्रेन युद्धासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरले आहे. त्यांनी भारतीयांना ‘उद्धट’ असेही संबोधले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लागू केलेले अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आणि आधीचे २५ टक्के असे एकून ५० टक्के टॅरिफ लागू झाले आहे. व्हाईट हाऊस आणि खुद्द ट्रम्प यांच्या नाराजीमुळे अमेरिका आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय करारावर होणाऱ्या व्यापार चर्चाही थांबलेल्या आहेत.

दिल्ली सरकारने या आयात शुल्कांना अन्यायकारक, अवाजवी आणि अयोग्य, म्हटले आहे. भारताने अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांचे रशियाबरोबरचे व्यापार सुरूच असल्याबद्दल त्यांचा दुटप्पीपणाही निदर्शनास आणून दिला आहे. या शुल्कांवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कोणतीही राजकीय किंमत मोजण्याची माझी तयारी आहे. भारताने हेदेखील स्पष्ट केले आहे की, राष्ट्रीय हित सर्वोपरी आहे आणि त्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पीटर नवारो भारताच्या विरोधात का? त्यांनी आतापर्यंत भारताविरोधात कोणकोणते विधान केले? त्याविषयी जाणून घेऊयात.

नवारो यांनी युक्रेन युद्धासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरले आहे. (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहित)

“युक्रेन-रशिया युद्धाला भारताची मदत”

१८ ऑगस्ट रोजी पीटर नवारो यांनी दावा केला की, भारत युक्रेनमधील युद्धासाठी रशियाला निधी देत आहे. ‘फायनान्शियल टाइम्स’मध्ये लिहिलेल्या एका लेखात नवारो यांनी भारत सरकारवर चीन आणि रशिया दोघांशीही जवळीक साधण्याचा आरोप केला. त्यांनी भारताचे रशियन तेलावरील अवलंबित्व संधीसाधूपणाचे असल्याचे म्हटले. नवारो म्हणाले, “अमेरिकेचा एक धोरणात्मक भागीदार म्हणून वागणूक हवी असेल तर त्यांनी तसे वागायला सुरुवात केली पाहिजे.”

नवारो यांनी लिहिले, “भारत रशियन तेलासाठी एक जागतिक वितरण केंद्र म्हणून काम करत आहे. बंदी घातलेल्या कच्च्या तेलाची निर्यात करून रशियाला पैसे पुरवत आहेत.” नवारो यांनी असाही दावा केला की, रशिया आणि चीनबरोबर भारताचे घनिष्ठ संबंध असल्यामुळे भारताला अमेरिकेच्या अत्याधुनिक लष्करी क्षमता हस्तांतरित करणे धोकादायक आहे.

“भारत रशियासाठी कपडे धुण्याचे केंद्र”

गेल्या आठवड्यात २२ ऑगस्टला नवारो यांनी भारताला रशियासाठीचे कपडे धुण्याचे केंद्र असल्याचे म्हटले आहे. “भारत शी जिनपिंग (चीनचे राष्ट्राध्यक्ष) यांच्याशी जवळीक साधत आहेत. भारताला रशियन तेलाची गरज नाही,” असे ते म्हणाले. भारताने अर्थातच हे निदर्शनास आणून दिले आहे की, युक्रेन युद्धाच्या सुरुवातीलाच त्यांनी अमेरिकेच्या सांगण्यावरून रशियन तेल खरेदी करण्यास सुरुवात केली होती. यातून जगाला होणाऱ्या फायद्यांवरही त्यांनी लक्ष वेधले. नवारो यांनी तेलाच्या खरेदीला नफा मिळवण्याची एक योजना म्हटले. हे रशियासाठी कपडे धुण्याचे केंद्र आहे,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “भारत त्यांच्याकडून (अमेरिकेकडून) काही वस्तू विकून जो पैसा मिळवतो, त्याचा वापर रशियन तेल खरेदी करण्यासाठी करतो. रशियन त्या पैशाचा वापर अधिक शस्त्रे बनवण्यासाठी आणि युक्रेनियन लोकांना मारण्यासाठी करतात आणि त्यामुळे अमेरिकन करदात्यांना युक्रेनियन लोकांना अधिक लष्करी मदत पुरवावी लागते, हे वेडेपणाचे आहे.” नवारो यांनी भारताला ‘शुल्कांचा महाराजा’ म्हणून संबोधले.

“हे मोदी युद्ध”

नवारो यांनी एका अमेरिकन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतावर जोरदार टीका केली. नवारो यांनी दावा केला की, भारत कच्च्या तेलाच्या खरेदीद्वारे अप्रत्यक्षपणे युक्रेनमधील रशियाच्या युद्धाला निधी देत आहे. त्यांनी युक्रेन व रशिया यांच्यात चालू असलेल्या युद्धाला ‘मोदी युद्ध’ म्हटले. “भारताच्या या कृतीमुळे अमेरिकेतील प्रत्येकाचे नुकसान होत आहे. ग्राहक, व्यावसायिक आणि कामगारांचे नुकसान होत आहे, कारण भारताच्या उच्च शुल्कामुळे आमच्या नोकऱ्या, कारखान्याचे नुकसान होतं आणि मग करदात्यांचे नुकसान होत आहे, कारण आम्हाला मोदींच्या युद्धाला निधी द्यावा लागत आहे,” असे नवारो म्हणाले.

“अमेरिकेतील करदात्यांचा पैसा बुडतोय, कारण आपल्याला या ‘मोदी युद्धा’चा भुर्दंड बसतो आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे अमेरिकेचे युक्रेनमधील शांततेचे प्रयत्न अयशस्वी ठरत आहेत. दोन्ही देशांमधील शांततेचा मार्ग काही प्रमाणात का होईना, नवी दिल्लीतूनच जातो”, असे नवारो म्हणाले. ते पुढे म्हणाले, “माझा सगळ्यात जास्त आक्षेप यावर आहे की भारतीय खूप उद्धट आहेत. त्यांचा दावा असतो की त्यांच्याकडून जास्त टॅरिफ आकारले जात नाही, ते म्हणतात की ते सार्वभौम आहेत, कुणाकडूनही तेल खरेदी करू शकतात. पण, तुम्ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहात, त्याप्रमाणे वागा.”

भारताने नवारो यांच्या आरोपांवर काय म्हटले?

रशियातील भारतीय राजदूत विनय कुमार म्हणाले, “आम्ही स्पष्टपणे सांगितले आहे की आमचे उद्दिष्ट भारतातील १.४ अब्ज लोकांची ऊर्जा सुरक्षा आहे आणि रशियाबरोबरचे भारताचे सहकार्य, इतर अनेक देशांप्रमाणे जागतिक तेल बाजारात स्थिरता आणण्यास मदत करत आहे.” नवारो यांची ही विधाने ३१ ऑगस्ट रोजी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या वार्षिक शिखर परिषदेपूर्वी आली आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला जाणार आहेत. पंतप्रधान मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठकही घेणार आहेत.