गुंतवणूक ही साधारणपणे सोनं, घर, एखादी जागा यामध्ये केली जाते. त्यातही सामान्य माणसाकडून गुंतवणूक करताना अनेकदा कर्जाचा पर्याय स्वीकारला जातो. मात्र, श्रीमंतांच्या बाबतीत त्यांना नेमकी कुठे गुंतवणूक करावी याचा प्रश्न पडतो. पैसा आणि मालमत्ता, असे दोन्ही पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध असतात. तेव्हा गडगंज श्रीमंत लोक नेमकी कुठे गुंतणवूक करत असतील, मग ते परताव्याचा विचार करून गुंतवणूक करत असतील की आणखी काही. याचबाबतचा एक अहवाल आता समोर आला आहे. जागतिक एक्विटी रिसर्च अँड ब्रोकरेज फर्म बर्नस्टाईनच्या अहवालानुसार, भारतातील अतिश्रीमंत अजूनही रिअल इस्टेट आणि सोन्याला गुतंवणुकीसाठी प्राधान्य देतात. मात्र, दुसरीकडे देशात संपत्तीची असमानतादेखील वाढत आहे. भारतातील ६० टक्के संपत्ती अतिश्रीमंत लोकांकडे आहे. घरगुती संपत्तीच्या या केंद्रीय स्वरूपामुळे श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होत राहतील, असेही या कंपनीने त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.

अतिश्रीमंतांची संपत्ती कशी विभागली जाते?

बर्नस्टाईनच्या अहवालानुसार एएनआयने असे वृत्त दिले आहे की, भारतातील अतिश्रीमंतांकडे असलेली सुमारे ६० टक्के संपत्ती रिअल इस्टेट आणि सोन्यात आहे. अतिश्रीमंत लोकांमध्ये अल्ट्रा हाय नेट वर्थ, हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल्स आणि श्रीमंत वर्गाचा समावेश आहे. भारतातील सर्व श्रीमंतांकडे सुमारे २.७ ट्रिलियन डॉलर्स इतकी सेवायोग्य मालमत्ता आहे; तर सुमारे ६० टक्के संपत्ती अजूनही रिअल इस्टेट आणि सोन्यात आहे.

भारताच्या एकूण घरगुती मालमत्तेचे मूल्य १९.६ ट्रिलियन डॉलर्स आहे. त्यापैकी ५९ टक्के किंवा ११.६ ट्रिलियन डॉलर्स इतकी संपत्ती अतिश्रीमंतांकडे आहे. या श्रीमंत कुटुंबांपैकी भारतीय कुटुंबांचे प्रमाण फक्त एक टक्का आहे. असे असताना त्यांच्याकडे एकूण मालमत्तेच्या ६० टक्के आणि देशाच्या आर्थिक मालमत्तेच्या ७० टक्के मालकी आहे.

भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींकडे असलेली सुमारे ८.९ ट्रिलियन डॉलर्स इतकी मालमत्ता रिअल इस्टेट, सोने, प्रमोटर इक्विटी व चलन मालमत्ता यांसारख्या स्वरूपात आहे. पारंपरिकपणे ही संपत्ती व्यवस्थापकांद्वारे व्यवस्थापित केली जात नाही किंवा त्या संपत्तीचे पुनर्वाटप करणेही कठीण आहे. बर्नस्टाईनच्या अहवालानुसार, भारतातील सर्वांत श्रीमंतांच्या मालकीच्या संपत्तीपैकी फक्त २.७ ट्रिलियन डॉलर्सची संपत्ती थेट इक्विटी, म्युच्युअल फंड, विमा आणि बँक किंवा सरकारी ठेवींसारख्या सेवायोग्य वित्तीय मालमत्ता स्वरूपात आहे.

भारतातील अतिश्रीमंत व्यक्ती

भारतात सुमारे ३५ हजार अल्ट्रा हाय नेट वर्थ व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती १२ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे. या अतिश्रीमंत कुटुंबांचे सरासरी उत्पन्न ४.८ दशलक्ष डॉलर्स आहे आणि त्यांची सरासरी मालमत्ता ५४ दशलक्ष डॉलर्स आहे. यामध्ये २४ दशलक्ष डॉलर्सच्या आर्थिक मालमत्तेचा समावेश आहे.
भारतातील सर्वात श्रीमंतांकडे ४.५ ट्रिलियन डॉलर्सची आर्थिक मालमत्ता आहे. ही एकूण आर्थिक मालमत्तेच्या जवळपास ७० टक्के आहे. या कंपनीने त्यांच्या अहवालात असेही नमूद केले की, भारतीय संपत्ती व्यवस्थापकांना देशातील अतिश्रीमंत कुटुंबांना आर्थिक सल्ले किंवा त्यांच्या संपत्तीचे व्यवस्थापन करण्याच्या वाढत्या संधी आहेत.

सोन्याला गुतंवणुकीसाठी प्राधान्य Photo: Reuters

“वाढत्या परताव्याच्या अपेक्षा आणि उत्पादनांची गुंतागुंत यांमुळे व्यावसायिक सल्ल्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे विशेष संपत्ती व्यवस्थापकांना फायदा होत असल्याचे दिसून आले. विशेष संपत्ती व्यवस्थापकांच्या अखत्यारीतील मालमत्तेचे मूल्य येत्या काही दशकांत ३०० अब्ज डॉलर्सवरून तब्बल १.६ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढेल, म्हणजेच ही वाढ १८ टक्क्यांहून अधिक दराने अपेक्षित आहे,” असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

भारतातील संपत्तीतील विषमता

अहवालानुसार, भारतात उत्पन्नातील तफावत जरी लक्षणीय असली, तरी संपत्तीतील तफावत अधिक ठळकपणे जाणवते. श्रीमंतांच्या वरच्या एक टक्का लोकांकडे एकूण उत्पन्नाच्या ४० टक्के कमाई होते; तर उर्वरित लोकांकडे उत्पन्न आणि मालमत्तेचा एक छोटासा भाग असतो. एका अभ्यासानुसार, भारतातील उत्पन्न असमानता जगात सर्वाधिक आहे. ती अमेरिका, ब्राझील व दक्षिण आफ्रिकेपेक्षाही जास्त आहे. “एकूणच हा पिरॅमिड पाहिला, तर श्रीमंत व्यक्ती अधिक श्रीमंत होतील. भारतातील अंदाजे ३० लाख अतिश्रीमंत कुटुंबे २.७ ट्रिलियन डॉलर्सची तरल आर्थिक संपत्ती बाळगतात”, असेही बर्नस्टाईन अहवालात म्हटले आहे.

या वर्षाच्या हुरून ग्लोबल रिच लिस्टनुसार, भारतात २८४ अब्जाधीश आहेत. त्यामध्ये २०२४ मध्ये १३ नवीन अब्जाधीश एलिट क्लबमध्ये सामील झाले आहेत