INS Nistar launch 2025 भारतीय नौदलात आता पुन्हा एक शक्तिशाली युद्धनौका दाखल होत आहे. १८ जुलै २०२५ रोजी विशाखापट्टणम येथील नौदल डॉकयार्ड येथे अत्याधुनिक स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट व्हेसल (डीएसव्ही) असणाऱ्या पहिल्या आयएनएस निस्तारचा भारतीय नौदलात समावेश होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आयएनएस निस्तार भारतीय नौदलात दाखल होईल. भारतीय नौदलात या युद्धनौकेचा समावेश झाल्याने समुद्री क्षेत्रामध्ये भारताची ताकद आणखी वाढेल. विशेषतः पाणबुडी बचाव आणि खोल समुद्रातील विविध मदतकार्यांमध्ये (डायव्हिंग ऑपरेशन्स) ही युद्धनौका महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. काय आहे आयएनएस निस्तार? ही युद्धनौका भारतीय नौदलासाठी किती महत्त्वाची? त्याविषयी जाणून घेऊयात.
आयएनएस निस्तार
- सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (एचएसएल)ने या युद्धनौकेची बांधणी केली आहे.
- आयएनएस निस्तार ही भारतातील पहिली पूर्णपणे स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट व्हेसल (डीएसव्ही) आहे.
- या युद्धनौकेची लांबी अंदाजे ११८ मीटर आणि वजन सुमारे ९,३५०- १०,००० टन आहे. ६० दिवसांहून अधिक काळ समुद्रात कार्यशील राहण्याच्या दृष्टीने तिचे डिझाइन करण्यात आले आहे.
- त्यावर २०० हून अधिक कर्मचारी कार्यरत असतील.
- मुख्य म्हणजे ही युद्धनौका डिझाईन करताना ७५ टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्री वापरण्यात आली आहे. त्यामुळे आयएनएस निस्तार हे संरक्षण क्षेत्रातील मेक इन इंडिया मिशनचे महत्त्वाचे उदाहरण आहे.
- या युद्धनौकेत बहुतांश सामग्री स्वदेशी असल्याने भारताच्या महत्त्वपूर्ण बचावात्मक पायाभूत सुविधांसाठी विदेशी तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी होते.

आयएनएस निस्तार विशेषतः डायव्हिंग आणि पाणबुडी बचाव मोहिमांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. ही युद्धनौका ३०० मीटरपर्यंत सॅच्युरेशन डायव्हिंग, ७५ मीटरपर्यंत साइड डायव्हिंग व रिमोटली ऑपरेटेड व्हेइकल्स (आरओव्ही)च्या मदतीने एक हजार मीटर खोलीवर बचावकार्य करण्यास सक्षम आहे. ही युद्धनौका डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेईकल (डीएसआरव्ही)साठी ‘मदर शिप’ म्हणून काम करेल. खोल पाण्याखाली अडचणीत आलेल्या पाणबुड्यांमधून खलाशांना बाहेर काढण्यासाठी या युद्धनौकेची मदत घेतली जाणार. त्यात १५ टन वजनाची सब्सी क्रेन, डायनॅमिक पोजिशनिंग सिस्टीम, डीकंप्रेशन चेंबर्स, हायपरबेरिक मेडिकल सिस्टीम आणि आठ खाटांचे रुग्णालय, तसेच प्रगत ऑनबोर्ड वैद्यकीय सुविधादेखील आहेत.
‘निस्तार’चा अर्थ काय? त्याचा नौदलाशी काय संबंध?
निस्तार हा शब्द संस्कृतमधून आला आहे. त्याचा मुक्ती किंवा बचाव, असा अर्थ होतो. सध्याची युद्धनौका पूर्वीच्या आयएनएस निस्तारची सुधारित आवृत्ती आहे. पूर्वीची युद्धनौका १९७१ मध्ये सोविएत पाणबुडी बचाव नौका होती, १९८९ मध्ये ती निवृत्त झाली. १९७१ च्या भारत-पाक युद्धादरम्यानच्या विविध कार्यांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. नवीन नौका पुढील पिढीतील डिजिटल नेव्हिगेशन प्रणालींनी सुसज्ज असल्याने ती अधिक सक्षम आहे.
आयएनएस निस्तारचे महत्त्व काय?
इंडो-पॅसिफिक प्रदेशात पाण्याखालील धोक्यांचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः शत्रूच्या पाणबुड्या आणि समुद्राखालील वाढत्या हालचालींमुळे आयएनएस निस्तारद्वारे बचाव मोहिमा, पाण्याखालील दुरुस्ती व प्रशिक्षण सराव आदी गोष्टी स्वतंत्रपणे पार पाडण्याची क्षमता यांमुळे भारतीय नौदलाची बाजू अधिक बळकट होईल. आयएनएस निस्तार आणि लवकरच दाखल होणाऱ्या आयएनएस निपुणमुळे आपत्कालीन परिस्थिती आणि लढाऊ परिस्थिती या दोन्ही बाबतीमध्ये नौदलाची ताकद वाढेल. आता आयएनएस निस्तार दाखल झाल्याने ही युद्धनौका देशाच्या वाढत्या स्वावलंबन आणि तांत्रिक कौशल्याचा एक ढळढळीत पुरावा आहे.
भारतीय नौदलात कोणकोणत्या युद्धनौकांचा समावेश?
भारतीय नौदलात १ जुलै २०२५ रोजी प्रगत स्टेल्थ फ्रिगेट आयएनएस तमालचा समावेश करण्यात आला. कॅलिनिनग्राडमधील रशियाच्या यंतार शिपयार्ड येथे भारताने रशियाच्या सहकार्याने ही युद्धनौका विकसित केली आहे. ही युद्धनौका २०१६ मध्ये स्वाक्षरी केलेल्या २१,००० कोटी रुपयांच्या संरक्षण कराराचा एक भाग आहे. डिसेंबर २०२४ मध्ये आयएनएस तुशीलचा नौदलात समावेश करण्यात आला होता. ही त्याचीच प्रगत आवृत्ती आहे. शत्रूला या नौकेचा शोध घेता येणार नाही, असे तंत्रज्ञान वापरून ती विकसित करण्यात आली आहे. त्यासाठी यात अत्याधुनिक इन्फ्रारेड स्टेल्थ तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
भारतीय नौदलाने विशाखापट्टणममधील नौदल डॉकयार्ड येथे भारताची पहिली अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट आयएनएस अर्नाळा ताफ्यात दाखल करण्यात आली आहे. आयएनएस अर्नाळा ही डिझेल इंजिन वॉटरजेट प्रोपल्शन सिस्टीमद्वारे चालवली जाणारी सर्वांत मोठी भारतीय युद्धनौका आहे. उथळ पाण्यात वेग आणि हालचाली वाढवण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे.