पाकिस्तानमधील एका दहशतवादी गटाच्या तळावर इराणने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला. एकीकडे पश्चिम आशियामध्ये इस्रायल-हमास युद्ध सुरू आहे. असे असताना इराण आणि पाकिस्तान हे दोन देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभे ठाकले आहेत. अतिरेकी संघटनेवर कारवाईचे कारण देऊन त्यांनी एकमेकांच्या सीमांमध्ये हल्ले घडविले आहेत. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि इराणने कोणकोणत्या संघटनांवर कारवाई केली, हे जाणून घेऊ या…

जैस अल अदल

मंगळवारी (१६ जानेवारी २०२४) इराण आणि पाकिस्तान यांच्यातील वादाला सुरुवात झाली. या दिवशी इराणने पाकिस्तानातील बलुचीस्तानमधील पंजगूर या भागात क्षेपणास्त्र डागले. पाकिस्तानातील जैश अल अदल (जेएए) या संघटनेकडून इराणमधील सिस्तान आणि बलुचेस्तान या भागाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी प्रयत्न केले जातात. याच संघटनेवर हल्ला करण्यासाठी इराणने क्षेपणास्त्र डागल्याचे म्हटले जात होते.

Maryam Nawaz Sharif
‘पाकिस्तानी असले तरीही, मी सुद्धा खरी पंजाबी आहे’; मरियम नवाज़ शरीफ़ यांच्या या विधानामागचे गूढ काय?
dgca fines air india rs 30 lakh after death of elderly passenger due to lack of wheelchair
इस्रायलमधील परिस्थिती चिघळली? तेल अवीवला जाणारी एअर इंडियाची सेवा पुन्हा स्थगित!
Saudi Arabia and india
काश्मीरच्या समस्येवर सौदी अरेबियानं स्पष्ट केली भूमिका, दिली भारताला साथ
aap jantar mantar hunger strike
महात्मा गांधी ते ममता बॅनर्जी; उपोषण हे ‘राजकीय शस्त्र’ म्हणून कसे वापरले गेले?

जैश ए अदलचा शब्दश: अर्थ काय?

जैश ए अदलचा शब्दश: अर्थ न्याय देणारी सेना असा होतो. जुनादल्लाह या संघटनेतून फुटून २०१२ साली ही संघटना उदयास आली होती. अब्दोलमलेक रिगी याला इराणने अटक केल्यानंतर जैश ए अदल संघटना सुरू झाली.

इराणच्या सैनिकांवर संघटनेकडून हल्ले

इराणच्या सरकारपासून बलोची प्रदेशाच्या सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय अधिकारांचे संरक्षण व्हावे हे या संघटनेचे मुख्य उद्दीष्ट आहे. मात्र तेहराणकडून या संघटनेला एक दहशतवादी गट समजले जाते. २०१३ सालापासून सीमेवरील इराणच्या सैनिकांवर या संघटनेकडून हल्ले केले जात आहेत. याच कारणामुळे तेहराणकडून ही संघटना म्हणजे ‘अन्याय करणारे सैनिक’ असा उल्लेख केला जातो.

अपहरण, सुसाईड बॉम्बिंग, हीट अँड रनसारख्या कारवाया

इराणमधील तस्मन नावाच्या वृत्तसंस्थेने २०२३ सालाच्या डिसेंबरमध्ये एक वृत्त दिले होते. या वृत्तानुसार जेएए या संघटनेने सिस्तान आणि बलुचेस्तान प्रांतातील रास्क या शहरातील पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. यामध्ये एकूण ११ इराणी पोलीस शहीद झाले होते. जेएए संघटनेकडून मुख्यत्वे इराणी सैनिक, पोलीस यांना लक्ष्य केले जाते. यासह इराणी शासकीय अधिकारी, शिया नागरिकांवर हल्ला, त्यांची हत्या, छळवणूक, अपहरण, सुसाईड बॉम्बिंग, हीट अँड रन असेदेखील प्रकार केले जातात.

सध्या अब्दोलरीम मुल्लाजादेह हा या संघटनेचा प्रमुख असल्याचे म्हटले जाते. सध्यातरी त्याच्याबद्दल लोकांना अधिक माहिती नाही.

बलूच लिबरेशन फ्रंट, बलूच लिबरेशन आर्मी

इराणने पाकिस्तानच्या प्रांतात क्षेपणास्त्र डागल्यानंतर पाकिस्ताननेही इराणला जशास तसे उत्तर दिले. पाकिस्तानने १८ जानेवारी रोजी इराणमधील बलूच लिबरेशन फ्रंट (बीएलएफ) आणि बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट (बीएलए) या दोन दहशतवादी संघटनांना लक्ष्य केले. पाकिस्तानकडून या दोन्ही संघटनाना दहशतवादी संघटना म्हटले जाते.

संघटनेचे संस्थापक अफगाणिस्तानमध्ये गेले

बीएलएफ या संघटनेची स्थापना जुम्मा खान मारी यांनी सिरियातील दामास्कस येथे १९६४ साली केली होती. ही संघटना बलूचमधील १९६८ ते ७३ या काळातील बंडखोरीदरम्यान तसेच १९९३ ते ७८ या काळात पाकिस्तानमधील बंडखोरीदरम्यान वेगवेगळ्या कारवायांत सक्रिय होती. मात्र कालांतराने या संघटनेचा प्रभाव नाहीसा झाला. त्यानंतर ही संघटना इराण तसेच पाकिस्तानातून १९८० पर्यंत नाहीशी झाली. या संघटनेचे संस्थापक पुढे अफगाणिस्तानमध्ये गेले.

पत्रकार, शासकीय अधिकारी, लष्करी अधिकाऱ्यांवर हल्ला

बीएलएफ ही संगटना पुढे २००४ साली पुन्हा एकदा उदयास आली. यावेळी या संघटनेचे नेतृत्व अल्लाह नझर बलोच याच्याकडे आली. तेव्हापासून पाकिस्तानी नागरिक, पत्रकार, शासकीय अधिकारी, लष्करी अधिकारी यांच्यावरील हल्ल्यांची जबाबदारी ही संघटना स्वीकारते.

बीएलएची २००० साली स्थापना

बीएलएफ आणि बीएलए या दोन्ही संघटना अनेकदा एकत्र येऊन काम करतात. बीएलए संघटनेची स्थापना २००० साली झाली होती. सध्या या संघटनेचे नेतृत्व बशीर झेब याच्याकडे आहे. बीएलएफ या संघटनेनेही दरम्यानच्या काळात अनेक अनेक हल्ले केले आहेत.

२०२२ साली कराची विद्यापीठात बॉम्बस्फोट

या दोन्ही संघटनांकडून पाकिस्तानमधील चीनच्या वायू आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना लक्ष्य केले जाते. या हल्ल्यांत कधीकधी चीनी कामगारांचा मृत्युदेखील झालेला आहे. २०२२ साली कराची विद्यापीठात एक बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता. यामध्ये शारी बलोच या ३० वर्षीय शिक्षकाचा मृत्यू झाला होता. यामध्ये तीन चीनी सैनिकांचाही मृत्यू झाला होता. बीएलए संघटनेने या हल्याची जबाबदारी घेतली होती.

पाकिस्तानचा भारतावर आरोप

दरम्यान, बीएलएफ आणि बीएलए या दोन्ही संघटनांचे भारताशी संबंध आहेत, असा आरोप याआधी पाकिस्तानने केलेला आहे. भारत या संघटनांना शस्त्रे पुरवते, या संघटनांतील दहशतवाद्यांना भारत प्रशिक्षण देतो तसेच आर्थिक मदत देतो, असे पाकिस्तानकडून म्हटले जाते. मात्र भारत आणि या दोन्ही दहशतवादी संघटनांनी पाकिस्तानचे हे आरोप फेटाळलेले आहेत.