भारताच्या ईशान्येकडील राज्यांना जोडणारा पश्चिम बंगाल राज्यामधील सिलिगुडी कॉरिडॉर किंवा ‘चिकन नेक’, ही एकमेव अरुंद अशी चिंचोळी पट्टी बांगलादेशचे हंगामी सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांच्या वक्तव्याने चर्चेत आली आहे. भारताच्या दृष्टीने सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या भागासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर भारतातूनही जोरदार टीका होत आहे.

युनूस यांचे वादग्रस्त वक्तव्य

‘भारतातील ईशान्येकडील सात राज्ये असलेला भाग ‘लँडलॉक्ड’ (जमिनीने वेढलेला) आहे. त्यांना महासागराकडे जाण्यासाठी दुसरा कुठलाही रस्ता नाही,’ असे आक्षेपार्ह वक्तव्य युनूस यांनी त्यांच्या चीन दौऱ्यात केले. ‘त्यामुळे या सर्व भागात आम्हीच महासागराचे स्वामी (गार्डियन ऑफ ओशन्स) आहोत. याने खूप संधी निर्माण होत असून, चीनचा आर्थिक विस्तार या ठिकाणी शक्य आहे,’ असे ते म्हणाले.

भारतातून तीव्र प्रतिक्रिया

युनूस यांच्या वक्तव्यावर भारतातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भारतातील अर्थतज्ज्ञ संजीव सन्याल यांनी लँडलॉक्ड या संदर्भाचे महत्त्व काय, असे विचारले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा यांनीही युनूस यांचे हे वक्तव्यकिरकोळीत घेऊ नये, असे म्हटले आहे. काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली आहे. मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनीही युनूस यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.

वक्तव्याचे सामरिक महत्त्व

युनूस यांच्या वक्तव्याचे देशाच्या सुरक्षेच्या आणि भूराजकीय दृष्टिकोनातून खूप मोठे महत्त्व आहे. हिंदी महासागर क्षेत्र हा भारतासाठी, भारताच्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने गाभा आहे. नौदलाच्या सामरिक नीतीमध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. हिंदी महासागर आणि भारत हे अतूट नाते असताना बांगलादेशने आता चीनच्या कच्छपि लागून भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. बांगलादेशच्या प्रमुखांच्या वक्तव्यामुळे खरे तर चीनचे मनसुबे उघड झाले आहेत. बांगलादेशला पुढे करून चीन त्याचे हित साधण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच भारतीय सामरिक धुरिणांमध्ये यावरून खल होत आहे. दुसरीकडे सिलिगुडी कॉरिडॉर हा एकमेव असा अरुंद, चिंचोळा भाग ईशान्येकडील सात राज्यांना जोडतो. हा भाग बंद झाला, तर भारताचे ईशान्येकडील राज्यांशी संपर्कच तुटेल. चीनबरोबर झालेला डोकलाममधील तिढा हा या भागाला उद्भवलेल्या धोक्यातूनच झाला होता.

सिलिगुडी कॉरिडॉरचे महत्त्व

नेपाळ आणि बांगलादेशला लागून, भूतान आणि चीनपासून काहीच किलोमीटर अंतरावर असलेली ही चिंचोळी पट्टी आहे. केवळ लष्करासाठीच नव्हे, तर सामान्य नागरिकांसाठी आणि इतर प्रकारच्या संपर्कयंत्रणेसाठी हा भाग महत्त्वाचा आहे. सिलिगडी कॉरिडॉरपासून जवळ चीनने पायाभूत प्रकल्पांच्या विकासाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू केले आहे. या संदर्भातील वृत्ते सातत्याने प्रकाशित होत आहेत. भारताला सुरक्षेच्या आणि राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. या भागातून एकमेव असा रेल्वे मार्ग असून, संपर्कयंत्रणेसाठी तो अतिशय महत्त्वाचा आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने पावले

सिलिगुडी कॉरिडॉरच्या सुरक्षेसाठी भारताने कायमच प्राधान्य दिले आहे. डोकलाम संकटावेळी भारताने इतिहासात प्रथमच अन्य देशाच्या (भूतानच्या) सीमेवर जाऊन भारताचे राष्ट्रीय हित जपले होते. याखेरीज हवाई दलातील अत्याधुनिक राफेल विमाने, ब्रह्मोस आणि इतर क्षेपणास्त्रे, रशियाकडून घेतलेली एस-४०० ही क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा या प्रदेशात तैनात आहे. लष्कराचीही बारीक नजर या भागावर असते. चीनने सिलिगुडी कॉरिडॉरजवळ हवाई तळ उभारण्याचे वृत्त आहे. भारताने चीनचे आव्हान लक्षात घेता आण्विक पाणबुड्यांच्या सुरक्षेसाठी नौदलाचा सुसज्ज असा तळ आंध्र प्रदेशजवळ उभारला आहे. लवकरच तो नौदलात दाखल होईल. उपग्रहांनाही पकडता येणार नाही, असे तंत्रज्ञान यामध्ये असून, आण्विक पाणबुड्या इच्छित स्थळी निर्धोक जातील, याला महत्त्व दिले आहे.

खरा धोका चीनचा

पाकिस्तान-चीन अभद्र युतीमध्ये आता बांगलादेशचाही समावेश झाला आहे, असे म्हटले, तर चुकीचे ठरणार नाही. युनूस यांनी चीनला दिलेल्या आर्थिक विस्ताराच्या आमंत्रणाने आणि पाकिस्तानबरोबर जवळीक साधण्याच्या इराद्याने केलेली वक्तव्ये याचे पुरेसे संकेत देतात. चीनचा या भागात संभाव्य विस्तार करण्याचा हेतू लपून राहिलेला नाही. भारताबरोबरील सीमावाद चीनने जाणीवपूर्वक कायम ठेवला आहे. भारतानेही या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशबरोबरील संबंध नव्याने तपासून घेण्याची गरज आहे. शेख हसीना यांच्या गच्छंतीनंतर बांगलादेश सातत्याने चीन आणि पाकिस्तानच्या जवळ जाताना दिसत आहे. बांगलादेशची निर्मिती ज्या भारतामुळे झाली, त्या भारताच्या हितसंबंधांना तेथील भूराजकीय स्थितीमुळे धोका निर्माण होत असेल, तर तशी प्रतिरणनीती आपली तयार असायला हवी. बांगलादेशमधूनही ईशान्य भारताकडे जाण्याच्या पर्यायाचा विचार होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय राजकारणात राष्ट्रीय शक्ती (नॅशनल पॉवर) नावाची संकल्पना आहे. तिचे प्रदर्शन करण्याची वेळ आता आली असल्याचे सध्याचे चित्र आहे. बांगलादेश हा पुन्हा ‘पूर्व पाकिस्तान’ होऊ नये आणि पश्चिमेसारखे संकट पूर्वेकडे होऊ नये, यासाठी असे संकट उभे राहण्यापूर्वीच त्याचा नायनाट करणे गरजेचे आहे. येत्या काळात सामरिक दृष्टिकोनातून आवश्यक पावले उचलण्याची गरज आहे.

prasad.kulkarni@expressindia.com