चॉकोलेट तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या कोको बियांच्या झाडांची लागवड गेल्या तीन वर्षांपासून घटली आहे. त्यामुळे चॉकोलेटचे उत्पादनही कमी होत असून आता जगभरात लहानथोरांना प्रिय असलेल्या चॉकोलेटच्या किमती वाढण्याचे संकट ओढवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चॉकोलेट उत्पादनाची सद्यःस्थिती काय आहे?

आयव्हरी कोस्ट आणि घाना या दोन देशांमध्ये चॉकोलेटचा सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या कोकोचे उत्पादन करणारे कारखाने सर्वाधिक प्रमाणात आहेत. त्यासाठी आवश्यक असलेल्या कोको बियांची खरेदी मात्र त्यांना परवडेनाशी झाली आहे. त्यामुळे त्यांनी कोको प्रक्रिया एकतर पूर्णतः थांबवली आहे किंवा त्यात कपात केली आहे. यामुळे उत्पादन कमी होऊन चॉकोलेट महागले आहेत.

कोकोचे उत्पादन का घटले?

जगातील ६० टक्के कोकोचे उत्पादन आयव्हरी कोस्ट आणि घाना या दोन देशांमध्ये होते. तिथे सलग तीन वर्षांपासून कोको झाडांची लागवड कमी झाली आहे. यंदाच्या चौथ्या वर्षीही लागवड कमीच राहण्याची अपेक्षा आहे. चॉकोलेट तयार करण्यासाठी प्रक्रिया केलेला कोकोच आवश्यक असतो. कच्चा कोको वापरून चॉकोलेट तयार करता येत नाही. तर, प्रक्रिया करणारे आपल्याला कोकोच्या शेंगा खरेदी करणे परवडत नसल्याचे सांगत आहेत. आयव्हरी कोस्टमधील ‘ट्रान्सको’ ही सरकारी मालकीची कंपनी आहे, त्यांनीही किमती वाढल्यामुळे शेंगांची खरेदी थांबवल्याचे सांगितले आहे. आयव्हरी कोस्टमध्ये एकूण नऊ मोठे प्रकल्प आहेत. त्यापैकी काही कारखान्यांकडे कोको शिल्लक आहे. पण तो किती पुरेल हाही प्रश्न आहे. त्याशिवाय दोन कारखाने पूर्ण बंद आहेत.

हेही वाचा : रिझर्व्ह बँकेची ध्येयधोरणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेमका संबंध काय?

उत्पादनात किती घट झाली आहे?

आयव्हरी कोस्टमध्ये २०२३-२४ या वर्षात कोकोचे उत्पादन १८ लाख टनांनी कमी होण्याचा अंदाज होता. २०२२-२३मध्ये ते २३ लाख इतके होते. घानामध्ये २०२३-२४मध्ये अंदाजित ६,५४,००० टनांपेक्षा ११ टक्क्यांनी कमी म्हणजे ५,८०,००० टन इतके झाले.

याचा परिणाम काय?

कोकोचे उत्पादन घटल्यामुळे गेल्या वर्षी कोकोच्या किमती दुपटीपेक्षा जास्त वाढल्या आहेत. त्याचा परिणाम चॉकोलेट उत्पादनावर झाला आहे. कोकोसंबंधी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ, ‘ट्रॉपिकल रिसर्च सर्व्हिसेस’चे स्टीव्ह वॉटरिज यांनी रॉयटर्सला सांगितले की, “आम्हाला पुरवठा कमी होत असल्यामुळे मागणीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे”. कार्गिल या जागतिक व्यापार कंपनीलाही गेल्या महिन्यात एक आठवडाभर आपला प्रक्रिया कारखाना बंद ठेवावा लागल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : विश्लेषण : राज्यात दोन्ही आघाड्यांची कोंडी का होत्येय? विधानसभेच्या गणितांमुळे लोकसभेच्या जागावाटपात अडचण? 

कोको उत्पादकांसमोर कोणते आव्हान?

प्रतिकूल हवामानाबरोबर कोको झाडांवर झपाट्याने वाढणाऱ्या रोगाचे आव्हान कोको उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. या रोगामुळे कोको उत्पादनावर चांगलाच परिणाम झाला आहे. कोको झाडांवर पडणाऱ्या रोगावर सध्या उपाय नाही. संसर्ग झालेली झाडे काढून टाकल्यानंतर त्या जमिनीवर पाच वर्षे लागवड करता येत नाही. पूर्वी शेतकरी नवीन जंगलभागात जाऊन कोको झाडांची लागवड करत. आता मात्र त्यावर पर्यावरणीय निर्बंध आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वनजमिनीचा कोकोच्या लागवडीसाठी वापर करता येणार नाही.

कोकोची खरेदी-विक्री कशी होते?

कोकोच्या व्यापारासाठी दीर्घ काळापासून एक यंत्रणा विकसित झाली आहे. त्यामार्फत शेतकरी स्थानिक व्यापाऱ्यांना कोकोच्या शेंगा विकतात. स्थानिक व्यापारी प्रक्रिया कारखाने किंवा जागतिक व्यापाऱ्यांना या शेंगांची विक्री करतात. ते व्यापारी शेंगा किंवा बटर, पावडर आणि कोको लिकर यासारखे पदार्थ ‘नेस्ले’, ‘हर्शे’ आणि ‘मोंडेलेझ’ यासारख्या बड्या चॉकोलेट कंपन्यांना विकतात. सध्या कोको शेंगांचा तुटवडा भासत असल्यामुळे ही सर्व साखळी विस्कळीत झाली आहे.

हेही वाचा : अरविंद केजरीवाल यांना १४ दिवस तुरुंगात राहावे लागणार; तिहारमध्ये काय मिळणार? कोणाला भेटण्याची परवानगी?

पुरवठा आणि मागणीचे प्रमाण कसे?

अमेरिकेमध्ये २०२२च्या तुलनेत २०२३मध्ये चॉकोलेटच्या किमतींमध्ये ११.६ टक्के वाढ झाली. या हंगामात जागतिक कोको उत्पादन १०.९ टक्के कमी होईल असा ‘इंटरनॅशनल कोको ऑर्गनायझेशन’चा (आयसीसीओ) अंदाज आहे. कारखान्यांना शेंगा मिळत नसल्यामुळे मागणीमध्ये ४.८ टक्के घट होईल आणि ते चॉकोलेटच्या निर्मात्यांना जास्त किमतींना कमी बटर विकतील. परिणामी किंमत आणखी वाढेल. पुरवठा आणि मागणीच्या प्रमाणात विसंगती असून या हंगामात ही तूट ३,७४,००० टन इतकी असेल. ‘आयसीसीओ’च्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ही तूट ७४ हजार टन इतकी होती. याचाच अर्थ गरजा पूर्ण करण्यासाठी साठवणीतील कोको बाहेर काढावा लागेल.

हेही वाचा : विश्लेषण : पोर्तुगीज आणि ब्रिटिश… भारत आणि श्रीलंका… भाजप नि काँग्रेस… ऐतिहासिक कचाथीवू बेट बनले राजकीय वादभूमी… 

सामान्य खरेदी-विक्री आणि सद्यःस्थिती यामध्ये काय फरक आहे?

सामान्य वेळेत या बाजारपेठेचे मोठ्या प्रमाणात नियमन केले जाते. व्यापारी आणि प्रक्रिया करणारे स्थानिक व्यापाऱ्यांकडून पूर्वनिर्धारित किमतींना खरेदी करतात. हे व्यवहार एक वर्ष आधीपर्यंत ठरतात. स्थानिक नियामक यंत्रणा शेतकरी शेंगांसाठी किती किंमत आकारू शकतात यासाठी कमाल किंमत आखून देतात. मात्र, सध्या जाणवत आहे तसा कोको शेंगांचा तुटवडा निर्माण झाला तर, खरेदी-विक्रीची ही यंत्रणा बिघडते. त्यानंतर शेंगा मिळण्याच्या खात्रीसाठी स्थानिक व्यापारी अनेकदा शेतकऱ्यांना जास्त पैसे देतात. त्यानंतर ते बाजारात पूर्वनिर्धारित किमतीऐवजी जास्त पैशांना या शेंगांची विक्री करतात. चॉकोलेट कंपन्यांना दिलेली हमी पूर्ण करण्यासाठी जागतिक व्यापारी कोणत्याही किमतीला या शेंगा खरेदी करण्यासाठी धावपळ करतात. त्यामुळे स्थानिक प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांना पुरेशा शेंगा मिळत नाहीत. सरकार स्थानिक कारखानदारांना स्वस्तात कर्जे उपलब्ध करून देते किंवा जागतिक व्यापाऱ्यांना शेंगा खरेदी करण्यावर मर्यादा घालते. यावर्षी कारखान्यांना त्यांनी आधीच ऑर्डर केलेला कोको मिळत नाही आणि त्यांना तो जागेवर जास्त पैसे मोजून खरेदी करणे परवडत नाही. या सर्व घटनाक्रमांचा एकत्रित परिणाम होऊन कोको उत्पादन कमी होऊन चॉकोलेटच्या किमती वाढत आहेत.

nima.patil@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is chocolate expensive around the world due to decline in cocoa production print exp css
First published on: 02-04-2024 at 08:26 IST