जम्मू आणि काश्मीर म्हटलं की दहशतवादी, पाकिस्तान, अनुच्छेद ३७० असेच शब्द नजरेसमोर येतात. परंतु सध्या एका प्राचीन हिंदू मंदिराच्या जिर्णोद्धाराचा विषय गाजत आहे. हे मंदिर म्हणजे अनंतनाग परिसरातील मार्तंड सूर्यमंदिर होय. काश्मीरप्रमाणे याही मंदिराचा इतिहास भग्नच आहे. जम्मू आणि काश्मीरच्या सांस्कृतिक विभागाने प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम लवकर हाती घेण्यात येणार आहे. त्या संदर्भात काल एक उच्चस्तरीय बैठक ही घेण्यात आली. त्यामुळे हे मंदिर विशेष चर्चेत आले. या मंदिराला गेल्या १६०० वर्षांपासूनचा इतिहास आहे. विशेष म्हणजे हे मंदिर काश्मीरसारख्या भागात असून अनेक घाव सोसून आजही आपल्या अस्तित्त्वाने प्राचीन संस्कृतीची साक्ष देत उभे आहे. त्याच निमित्ताने या मंदिराच्या इतिहासाचा घेतलेला हा धांडोळा !

अधिक वाचा: विश्लेषण: एका मिठाईवाल्याच्या विजयाने ब्रिटिश सरकार हादरले; १९२० सालची निवडणूक का ठरली महत्त्वाची?

maneka gandhi varun gandh
भाजपाने वरुण गांधींचं लोकसभेचं तिकीट कापलं, आई मनेका गांधी म्हणाल्या, “या निवडणुकीनंतर…”
japan, a peaceful country, export weapons of mass destruction
विश्लेषण: शांत, युद्धविरोधी जपानकडून विध्वंसक शस्त्रे निर्यात पुन्हा का सुरू होतेय?
Who was Ramses II
विश्लेषण: गेल्या अनेक वर्षांपासूनचे कोडे आता उलगडणार? कोण होता रामसेस दुसरा? का आहे जगाला त्याचे आकर्षण?
Mumbai Women Buys 19 Flats Worth 118 Crores In Malbar Hill
“बंगल्यासमोर बिल्डिंग बांधली, समुद्र कसा बघू?”, म्हणत दक्षिण मुंबईत १९ फ्लॅट्स विकत घेणारी ‘ती’ आहे तरी कोण?

मार्तंड हे सूर्याच्या अनेक नावांपैकी एक. आजपासून सुमारे १६०० वर्षांपूर्वी एका राजाने सूर्यदेवाला समर्पित करणारी ही भव्य वास्तू उभारली. या मंदिराचे रूप म्हणजे शेजारी खळखळत वाहणारे नदीचे पाणी, सभोवतालचे निसर्ग सौंदर्य आणि काळ्या पाषाणातील ही भव्य रचना म्हणजे एखाद्या सौंदर्यवतीच्या रुपाला दागिन्यांची मिळालेली साथच म्हणावी लागेल. इसवी सन १३८९ ते १४१३ या कालखंडात या भागात राज्य करण्याऱ्या सुलतान सिंकदर शाह मिरीच्या आदेशानुसार हे मंदिर पाडण्यात आल्याचे मानले जाते. तरीही या संदर्भात इतिहासकारांमध्ये अनेक मतभेद आहेत.

मंदिर कोणी बांधले?

या मंदिराचे बांधकाम कर्कोटा वंशाचा राजा ललितादित्य मुक्तापीड याच्या कालखंडात झाले. इसवी सन ७२५ ते ७५३ या कालखंडात त्याने काश्मीरवर राज्य केले होते. तरी यापूर्वीही हे मंदिर अस्तित्त्वात असल्याचा काही अभ्यासकांचा दावा आहे. ललितादित्याच्या कालखंडात केवळ या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असावा, असा तर्क मांडला जातो. ललितादित्य याची राजधानी परिहासपोरा (परिहासपुर) येथे होती. आजही आपण येथे त्याच्या राजधानीचे अवशेष पाहू शकतो. काश्मीर विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक आणि सेंट्रल एशियन स्टडीजच्या केंद्राचे माजी संचालक डॉ. ऐजाझ बंदे (Dr. Aijaz Banday) यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, “मूलतः हे मंदिर विष्णू- सूर्याला समर्पित असून या मंदिरात तीन वेगळे भाग आहेत. यात प्रामुख्याने मंडप, गर्भगृह, आणि अंतराळ यांचा समावेश होतो. कदाचित हे काश्मीरमधील अशा स्वरूपाचे तीन भाग असलेले एकमेव मंदिर असावे. या मंदिराची रचना काश्मिरी शैलीतील असून या मंदिराच्या स्थापत्य रचनेवर गांधार शैलीचाही प्रभाव आहे.”

राजतरंगिणी मधील मंदिराचा उल्लेख

राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासाचा प्राचीन स्रोत मानला जातो. यात या मंदिराचा उल्लेख आढळतो. हंगेरियन- ब्रिटिश पुरातत्त्वशास्त्रज्ञ सर मार्क ऑरेल स्टीन, यांनी संपादित केलेल्या कल्हणाच्या राजतरंगिणीमध्ये, ते मार्तंड मंदिराचा उल्लेख करताना लिहितात, “मार्तंड भव्य मंदिर ललितादित्य राजाने त्याच्याच नावाच्या तीर्थाजवळ बांधले होते, ही खोऱ्यातील आजही सर्वात भव्य हिंदू वास्तू आहे.” सर मार्क ऑरेल स्टीन यांच्याप्रमाणे रणजित सीताराम पंडित (पंडित जवाहरलाल नेहरूंचे मेहुणे) यांनीही कल्हणाच्या राजतरंगिणीवर मोलाचे संशोधन केले. त्यांच्या ग्रंथात ते लिहितात,’ एका मोठ्या राजाने मार्तंडाचे अप्रतिम मंदिर बांधले, या वास्तूच्या तटबंदीच्या आत भव्य दगडी भिंती होत्या आणि त्यावर द्राक्षाच्या वेली लटकत होत्या. अशाच स्वरूपाचे वर्णन स्टीन यांनीही केले. ते म्हणतात, “उंच आवारात दगडाच्या मोठ्या भिंती होत्या आणि शहर द्राक्षांच्या वेलींनी फुलले होते.” इतिहासकार जी.एम.डी सुफी, त्यांच्या ‘काशीर’ (Kashir Being A History Of Kashmir) या पुस्तकात लिहितात, “मार्तंड मंदिर हे ६३ फूट लांब आणि त्याच्या कोरीवकामासाठी विशेष उल्लेखनीय आहे.
सुफी नंतर पुढे म्हणतात, “हे मंदिर हिंदू असले तरी, ते नेहमीच्या हिंदू मंदिरांपेक्षा वेगळे आहे, आणि हे त्याच्या काश्मिरी वास्तू शैलीसाठी ओळखले जाते, तसेच या मंदिरावर गांधार शैलीचाही प्रभाव आढळतो. या मंदिरातील शिल्प गुप्त काळातील हिंदू शिल्पांशी जवळचे नाते दर्शवतात.”

स्थापत्य शैलींचा संगम

डॉ. सय्यद गझनफर फारूक यांनी अलीगड मुस्लीम विद्यापीठातून काश्मिरी स्थापत्य या विषयात पीएचडी केली असून ते आता जम्मू आणि काश्मीरच्या शिक्षण विभागात काम करतात. त्यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “हे मूळ हिंदू मंदिर आहे, मुख्य मंदिराची रचना मध्यभागी असून सभोवताली लहान मंदिरांची रचना आढळते. मंदिराचे अंगण सुरुवातीच्या काळात लिद्दर नदीच्या पाण्याने भरलेले होते” अंगणाच्या एका बाजूला असलेल्या रचनेत ८४ खांबांची रचना आढळून येते. या मंदिराच्या रचनेत चुनखडी वापरल्याचे पुरावे सापडतात. उत्तर भारतात साधारण १३ व्या शतकानंतर चुनखडी वापरण्यास सुरुवात झाली होती असे मानले जात होते. त्यामुळे त्या आधी ५०० वर्षे बांधलेल्या मंदिरात या प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अभ्यासकांना आश्चर्यचकित केले. कदाचित ललितादित्य याने स्थलांतरित बायझंटाईन वास्तुविशारदांना कामावर ठेवले होते, असा तर्क अभ्यासक मांडतात. काश्मीरचा गांधार या भागाशी जवळचा संबंध आहे. काश्मीर आणि ग्रीस यांच्यात असलेल्या संबंधांमुळे या मंदिराच्या स्थापत्य रचनेवरही त्याचा परिणाम दिसतो. ललितादित्याने कन्नौजच्या राजाला आपल्या अधिपत्याखाली आणले होते, त्यामुळे या मंदिराच्या बांधकामात उत्तर प्रदेशाच्या कारागिरांचाही हातभार लागल्याची शक्यता वर्तवली जाते. आज मंदिराचे मूळ छत नष्ट झाले आहे. अलेक्झांडर कनिंगहॅम (भारतीय पुरातत्त्व खात्याचे पहिले महासंचालक) यांनी नमूद केल्याप्रमाणे या छताने मूळ मंदिरासह इतर दोन लहान मंदिरेही आच्छादलेली होती.

हे मंदिर कसे नष्ट झाले?

या मंदिराच्या दुरवस्थेला मानवी कट्टरता आणि नैसर्गिक आपदा कारणीभूत असल्याचे अभ्यासक सांगतात. सिकंदर ‘बुतशिकन’ (सिंकदर शाह मिरी) याने हे मंदिर उध्वस्त केल्याचे इतिहासकार मानतात. तर काही अभ्यासक भूकंप हे कारण मानतात. कवी-इतिहासकार जोनराज हा सिकंदरचा मुलगा सुलतान झैन-उल-अबिदिन (१४२०-१४७०) याच्या नोकरीत होता, याने द्वितिया राजतरंगिणी लिहिली. जोनराज याने नमूद केल्याप्रमाणे सिकंदर हा सूफी संत सय्यद मुहम्मद हमदानी यांच्या प्रभावाखाली होता. त्याने काश्मीरचे इस्लामीकरण केले. त्याच्या राजवटीत हिंदूंचा अतोनात छळ झाला. सिकंदर ‘बुतशिकन’ याचा राज्याभिषेक तो लहान असताना झाला होता. त्याने त्याचा मंत्री शुभदत्त म्हणजेच नव्यानेच धर्मांतरित झालेल्या मलिक सैफ उद्दीन याच्या सल्ल्याने हे केले, असे डॉ. सय्यद गझनफर फारूक यांनी नमूद केले आहे. जोनराज याने नमूद केल्याप्रमाणे सिकंदराच्या काळात एकाही गावात हिंदू मंदिर शिल्लक राहिले नाही. परंतु याच कालखंडात मार्तंड मंदिर नष्ट केले की नाही याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. राजतरंगिणीचा चौथा आणि शेवटचा भाग सुकाने लिहिला. सुकाच्या राजतरंगिणीमुळे १५५४ साली आलेल्या भूकंपाविषयी माहिती मिळते. विजयेश्वर, मार्तंड आणि वराहक्षेत्र येथील रहिवाशांना भूकंपाची भीती नव्हती. ते मंदिराला या काळातही भेट देत होते, असा उल्लेख त्यात आढळतो. एकूणच या भूकंपामुळे मंदिर उध्वस्त झाले नसावे असे मत अभ्यासक व्यक्त करतात.

अधिक वाचा: ज्ञानवापी मशिदीचे सत्य ‘या’ ब्रिटिश विद्वानाने आणले समोर? काय सांगते त्याचे संशोधन? 

हर्षाने मंदिरे का तोडली?

ललितादित्य याच्या नंतर तीन शतकांनी आणि सिकंदरच्या दोन शतकांपूर्वी पहिल्या लोहारा घराण्यातील हर्ष (१०८९-११०१) नावाचा एक हिंदू राजा अस्तित्वात होता. हा राजा मंदिरे नष्ट करण्यासाठी ओळखला जातो. हर्षाच्या मंदिर नष्ट करण्याचा आणि धर्माचा काहीही एक संबंध नव्हता. तो एक भ्रष्ट राजा होता. त्याने संपत्तीच्या लोभापायी मंदिरे लुटली असे डॉ.सय्यद गझनफर फारूक यांनी नमूद केले. आर.एस. पंडित लिखित कल्हणाच्या राजतरंगिणीत, “गावात, नगरात किंवा श्रीनगरात असे एकही मंदिर नव्हते ज्याच्या प्रतिमा राजा हर्षाने उद्ध्वस्त केल्या नाहीत” असा उल्लेख आढळतो. श्रीनगरात पवित्र रणस्वमीन आणि मार्तंडा शहरांमध्ये याने उद्धवस्त केलेली मंदिरे आहेत, असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे हे मंदिर नक्की कोणी आणि कोणत्या कारणामुळे उध्वस्त केले याचा आजही संभ्रम अभ्यासकांमध्ये आढळतो.

चित्रपटात दिसलेले मंदिर

१९७० च्या मन की आँखे आणि १९७५ च्या आँधी या जुन्या हिंदी चित्रपटांमध्ये या मंदिराचे ओझरते दर्शन झाले होते. त्यानंतर २०१४ साली आलेल्या हैदर या चित्रपटातील एक गाणं या मंदिराच्या आवारात चित्रित करण्यात आलं होतं. यामुळे हिंदू समुदायाकडून या संदर्भात आक्षेप घेण्यात आला होता. आणि आज पुन्हा एकदा हे मंदिर चर्चेत आले आहे.