मागील जवळपास अडीच वर्षांपासून जगभरात करोना विषाणूनं थैमान घातलं आहे. दरम्यानच्या काळात जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. करोना विषाणूचा उगम नेमका कुठे झाला? याबाबत लोकांमध्ये अद्याप संभ्रम कायम आहे. पण आता करोना विषाणूच्या स्रोताबाबतचा मोठा खुलासा संशोधनातून समोर आला आहे. चीनमधील वुहान बाजारपेठेत थेट विक्री केलेल्या जिवंत प्राण्यांमध्ये दोन प्रकारचे करोना विषाणू आढळल्याचा दावा, संबंधित संशोधनात करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वुहानमधील याच मार्केटमधून करोना विषाणूचा मानवांमध्ये फैलाव झाल्याची शक्यता संशोधकानं वर्तवली आहे. शास्त्रज्ञांनी वुहानमधील प्रयोगशाळेतून विषाणूची गळती होण्यापासून करोना विषाणूचे सर्व संभाव्य स्त्रोत शोधण्यासाठी संशोधन सुरू ठेवावं, अशी शिफारस जागतिक आरोग्य संघटनेनं जून महिन्याच्या सुरुवातीला केली होती.

करोना विषाणूची उत्पत्ती कुठे झाली?
दरम्यान, दोन वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या संसोधनाचा निष्कर्ष एकच निघाला आहे. दोन्ही संसोधनानुसार करोना विषाणूच्या उगमाचा केंद्रबिंदू हा चीनमधील वुहान शहरातील ‘हुआनन सीफूड मार्केट’ (Huanan Seafood Wholesale Market) हाच असल्याचं समोर आलं आहे. हेच मार्केट करोना विषाणूचं केंद्रबिंदू असल्याचं दोन्ही संशोधनात म्हटलं आहे.

हे संशोधन सायन्स जर्नलमध्ये मंगळवारी प्रकाशित झालं आहे. संबंधित एका संशोधनात जगभरातील शास्त्रज्ञांनी मॅपिंग टूल्स आणि सोशल मीडिया रिपोर्ट्सचा वापर केला. यावरून नेमक्या परिस्थितीचं विश्लेषण करणं कठीण असलं तरी, २०१९ सालच्या शेवटी वुहानमधील या मार्केटमध्ये जिवंत विकल्या गेलेल्या प्राण्यांमध्ये हा विषाणू आढळल्याचं निष्पन्न झालं आहे.

सुरुवातीला वुहान मार्केटमधील विक्रेत्यांमध्ये करोनाचा संसर्ग
संबंधित संसोधनानुसार, हुआनन सीफूड मार्केटमध्ये प्राण्यांना एकमेकांच्या अगदी जवळ-जवळ ठेवण्यात येत होतं. त्यामुळे संबंधित प्राण्यांमध्ये अगदी सहजपणे विषाणूची देवाणघेवाण होऊ शकत होती. या विषाणूचा सर्वात आधी कोणत्या प्राण्याला संसर्ग झाला? याची माहिती संसोधनातून समोर येऊ शकली नाही. सुरुवातीला वुहानमधील या मार्केटमधील विक्रेत्यांना करोना विषाणूची लागण झाली होती. हे विक्रेते विविध प्रकारचे जिवंत प्राणी विकायचे. यानंतर या बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनाही करोना विषाणूची बाधा झाल्याचे निष्कर्ष संशोधनातून समोर आले आहेत. दरम्यान, दोन भिन्न प्रकारचे विषाणू प्राण्यांमध्ये संक्रमित होत होते, असा दावाही संशोधकांनी केला आहे.

करोनाचे सुरुवातीचे रुग्ण कुठे आढळले
२० डिसेंबर २०१९ पूर्वी आढळलेले सर्व ८ रुग्ण हुआनन मार्केटच्या पश्चिमेकडील होते, असं संशोधनात म्हटलं आहे. या भागात जिवंत जनावरांचीही विक्री होते. संशोधनानुसार, या परिसरात पाच अशी दुकाने होती, जिथे प्राणी जिवंत किंवा कापून विकले जातात. येथूनच करोना विषाणू प्रसार माणसांमध्ये झाल्याचं मानलं जात आहे.

संशोधन कसं झालं?
संशोधकांनी वुहान मार्केटशी कोणताही संबंध नसलेल्या लोकांची आणि वुहान मार्केटमध्ये काम करणाऱ्या किंवा त्याजवळ राहणाऱ्या लोकांचे नमुने तपासले. यावेळी असं आढळून आलं की हा विषाणू सर्वप्रथम मार्केटमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये पसरला होता. त्यानंतर त्याचा स्थानिक समुदायात सर्वत्र फैलाव झाला. पुढे संपूर्ण वुहान शहर आणि जगभरातील अनेकांना करोना विषाणूची बाधा झाली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is corona virus origin from chinas wuhan new research published science journal rmm
First published on: 28-07-2022 at 17:27 IST