इस्त्रायलने गाझा शहरात केलेल्या हवाई हल्ल्यात अल-जझीरा अरेबिकचा प्रतिनिधी अनस अल शरीफ याच्यासह इतर चार पत्रकार ठार झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. हे सर्व पत्रकार गाझामधील अल-शिफा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर असलेल्या पत्रकारांसाठीच्या तंबूत विश्रांती घेत होते. हल्ल्यानंतर काही वेळात इस्त्रायली लष्कराने सांगितले की त्यांनी अल-शरीफ यांना लक्ष्य केले होते आणि त्यांना दहशतवादीही म्हटले आहे. इस्त्रायली लष्कराने असा दावा केला आहे की, अनस अल शरीफ हा हमासच्या दहशतवादी गटाचा प्रमुख म्हणून काम करत होता. असं असताना अल-जझीराने या दाव्यांना फेटाळत एका निवेदनात म्हटले की, “गाझातील धाडसी पत्रकारांपैकी एक अनस अल शरीफ यांना त्यांच्या सहकाऱ्यांसह ठार मारण्याचा आदेश हा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. या हत्येला त्यांनी पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर आणखी एक पूर्वनियोजित हल्ला” असे म्हटले आहे. कोण होता अनस अल-शरीफ आणि रविवारी नेमके काय घडले याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

रविवारी इस्त्रायलचा हल्ला

रविवारी रात्री अल-शिफाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर तंबूमध्ये आराम करत असताना इस्त्रायलने पत्रकारांवर हल्ला केला. या हल्ल्यात एकूण सात जणांचा मृत्यू झाला. यामध्ये अल-शरीफ आणि इतर चार पत्रकारांचा मृत्यू झाला. मोहम्मद कुरैकेह, कॅमेरामन इब्राहिम झाहेर, मोहम्मद नौफल आणि मोआमेन अलीवा अशी या पत्रकारांची नावे आहेत. कतारस्थित अल-जझीराने वृत्त दिले की, मृत पत्रकार विश्रांती घेत असताना त्यांना लक्ष्य केले. ते सीमारेषेवरून बातम्या देत नव्हते.” हवाई हल्ल्यानंतर अल-जझीराचे आणखी एक पत्रकार हानी महमूद यांनी त्यावेळची परिस्थिती सांगताना म्हटले की, “गेल्या २२ महिन्यांतील ही खूप वाईट घटना घडली आहे. मी अल-शिफा रुग्णालयापासून फार लांब नाही. मी गेल्या अर्ध्या तासात झालेला मोठा स्फोट ऐकला आहे. हा स्फोट रुग्णालयाजवळच घडला आहे. त्यानंतर काही क्षणांतच आम्हाला कळले की स्फोट रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील पत्रकारांच्या छावणीत झाला.” अल-शरीफ आणि त्यांचे इतर सहकारी इस्त्रायल-गाझा संघर्षाच्या सुरुवातीपासूनच गाझामधून वार्तांकन करत होते. या पत्रकारांचा मृत्यू झाला कारण त्यांनी पॅलेस्टिनी लोक गाझामध्ये भोगत असलेल्या उपासमारी, दुष्काळ आणि कुपोषणाबद्दल सातत्याने बातम्या दिल्या आणि ही परिस्थिती ते जगापर्यंत पोहोचवत होते”, असे महमूद यांनी सांगितले.

अनस अल-शरीफ याला धोका होता

२८ वर्षीय अल-शरीफ हा गाझामधील एक हुशार पत्रकार होता. तो अल-जझीरा अरेबिकसाठी गाझा पट्टीच्या उत्तरेकडील भागातून वार्तांकन करत होता. या वृत्तसंस्थेत काम करण्यापूर्वी त्याने गाझा शहरातील अल-अकसा विद्यापीठातून माध्यम शाखेतून पदवी मिळवली होती. २०१८ मध्ये गाझामधील वार्तांकनासाठी त्याला पॅलेस्टाईनमधील ‘सर्वोत्कृष्ट युवा पत्रकार पुरस्कार’ मिळाला होता. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या इस्त्रायल-गाझा युद्धात अल-शरीफ घटनास्थळावरून वार्तांकन करणारा प्रसिद्ध पत्रकार ठरला होता.

डिसेंबर २०२३ मध्ये इस्त्रायलने गाझा शहरातील जबालिया निर्वासित छावणीवर हवाई हल्ला केला. त्यावेळी अल-शरीफ याने त्या हल्ल्यात वडिलांना गमावले. त्यावेळीही त्याने वार्तांकनाचे काम सुरूच ठेवले. या वर्षाच्या सुरुवातीला हमास आणि इस्त्रायल यांच्यातील युद्धविरामानंतर त्याचे थेट प्रसारण सुरू असताना अल शरीफने त्याच्या अंगावरचे बुलेट प्रूफ जॅकेट काढत आनंद साजरा केला होता, यामुळे त्याने अनेकांचे लक्ष वेधले होते. शरीफ याने मृत्यूपूर्वी काही मिनिटं आधी एक्सवर एक पोस्ट लिहिली होती. त्याने यामध्ये ब्रेकिंग बातमी दिली होती. “ब्रेकिंग- इस्त्रायल गाझा शहराच्या पूर्व आणि दक्षिण भागांवर फायर बेल्ट वापरून जोरदार बॉम्बहल्ले करत आहे.”

अल-शरीफ याच्या मृत्यूनंतर त्याच्या एक्स खात्यावरील एक संदेश अल-जझीराने पोस्ट केला आहे. यात अल-शरीफ याने लिहिले होते की, “मी वेदनेचे सर्व पैलू अनुभवले आहेत. दु:ख आणि नुकसान झेलले आहे. तरीही सत्य जसे आहे तसेच सांगायला मी मागे हटलो नाही. जे गप्प राहिले, आमच्या हत्येला मान्यता दिली, आमचा श्वास रोखला, आमच्या मुलांच्या आणि महिलांच्या विखुरलेल्या शवांकडे पाहून ज्यांचे अंत:करण हादरले नाही. गेल्या दीड वर्षापासून आमच्या लोकांवर सुरू असलेल्या हत्याकांडाला थांबवण्यासाठी ज्यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत त्यांच्याविरुद्ध अल्लाहच साक्ष देईल.” अल-शरीफ याच्या पश्चात त्याची पत्नी आणि दोन मुले असे कुटुंब आहे. महत्त्वाचं म्हणजे शरीफ याच्या हत्येच्या काही दिवसांआधीच कमिटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्ट्स या संस्थेने शरीफ याच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यांना अशी भीती होती की इस्त्रायली लष्कराबाबत सत्य परिस्थिती सांगत असल्याने तो लक्ष्य ठरला आहे आणि त्यामुळे त्याची हत्या होण्याची शक्यता आहे.

Photo: Reuters

अल-शरीफ हमासचा दहशतवादी असल्याचा इस्त्रायलचा आरोप

इस्त्रायलने या हल्ल्यानंतर असा दावा केला आहे की, अल-शरीफ हा हमास या दहशतवादी संघटनेतील एका दहशतवादी गटाचा प्रमुख होता. तसंच इस्त्रायली नागरिक आणि इस्त्रायली संरक्षण दलांवर रॉकेट हल्ले घडवून आणण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. इस्त्रायलने याबाबतचे पुरावेही असल्याचे सांगितले आहे. मात्र, नेमके कोणते पुरावे हे अद्याप त्यांनी स्पष्ट केलेले नाही. एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “पत्रकार ओळखपत्र हे दहशतवादासाठीचे कवच नाही.”

रविवारच्या हल्ल्याआधी इस्त्रायली संरक्षण दलांचे प्रवक्ते अवीचाई ॲद्रई यांनी अल-शरीफचा व्हिडीओ एक्सवर शेअर करून त्याच्यावर हमासच्या लष्करी शाखेचा सदस्य असल्याचा आरोप केला होता. मात्र, अल-शरीफने हे आरोप नाकारत एक्सवर प्रतिक्रिया दिली की, “मी पुन्हा सांगतो, मी कोणत्याही राजकीय गटाशी संलग्न नसलेला पत्रकार आहे. माझे एकमेव ध्येय जमिनीवरील सत्य जसेच्या तसे कोणताही पक्षपात न करता लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. जेव्हा गाझावर संकट कोसळत आहे तेव्हा सत्य सांगणे हे कब्जा करू पाहणाऱ्यांना धोका ठरले आहे.”

रविवारच्या हल्ल्यानंतर इतर पत्रकार आणि संस्थांनी इस्त्रायलविरोधात निषेध व्यक्त केला आहे. अल-शरीफचा हमासशी संबंध जोडणारा कोणताही पुरावा नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. युरो-मेड ह्यूमन राइट्स मॉनिटरचे विश्लेषक मुहम्मद शेहादा यांनी सांगितले की, “अल-शरीफने कोणत्याही चुकीच्या कृत्यात भाग घेतल्याचा पुरावा नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याचा संपूर्ण दिवस कॅमेऱ्यासमोर उभं राहण्यात जातो.”

गाझामधील पत्रकारांना धोका?

अल-शरीफ आणि इतर पत्रकारांचा मृत्यू हा गाझामधील पत्रकारांना भेडसावणाऱ्या धोक्याचं एक उदाहरण आहे. सीपीजेच्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२३ मध्ये इस्त्रायलच्या लष्करी मोहिमेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत जवळपास १८६ पत्रकारांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. “युद्ध सुरू झाल्यापासून गाझामध्ये २००हून अधिक पत्रकार ठार झाले आहेत. यामध्ये अनेक अल-जझीरा पत्रकारांचा समावेश आहे अशी माहिती रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स या मीडिया वॉचडॉग संस्थेने जुलैच्या सुरुवातीला दिली होती. प्रत्यक्षातही अल-जझीराचे अनेक पत्रकार गाझामध्ये ठार झाले आहेत. जुलै महिन्यात इस्माईल अल-घो आणि त्यांचे कॅमेरामन रामी अल-रिफी यांचा रॉकेटहल्ल्यात मृत्यू झाला. मुख्य वार्ताहर वायल अल-दहदूह यांच्या पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातू यांचा ऑक्टोबर २०२३ मध्ये मृत्यू झाला होता आणि काही आठवड्यांनंतरच्या हल्ल्यात ते स्वत: जखमी झाले.