अमोल परांजपे
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत पुन्हा एकदा जो बायडेन विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प अशीच लढत होणार, हे जवळपास निश्चित आहे. अशा परिस्थितीत ट्रम्प यांच्यापेक्षा बायडेन अध्यक्ष असणे रशियासाठी अधिक योग्य ठरेल, असे सांगून व्लादिमिर पुतिन यांनी मोठी खेळी खेळली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या निवडणूक प्रचारात ‘पुतिन फॅक्टर’चा प्रवेश झाला असून त्यामुळे २०१६ सालच्या निवडणुकीनंतर झालेल्या आरोपांची आठवण ताजी झाली आहे.
पुतिन नेमके काय म्हणाले?
रशियातील एका पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत पुतिन यांना ‘बायडेन आणि ट्रम्प यांच्यात निवड करायची झाली, तर तुम्हाला कोण अधिक योग्य वाटतो?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर क्षणाचाही विचार न करता पुतिन यांनी बायडेन यांचे नाव घेतले. ‘बायडेन हे अधिक अनुभवी, बेभरवशाचे नसलेले आणि जुन्या जमान्यातील राजकारणी आहेत. अर्थात, अमेरिकेच्या जनतेचा ज्यांच्यावर विश्वास असेल, अशा कोणाहीबरोबर काम करण्याची रशियाची तयारी आहे,’ अशी पुस्तीही पुतिन यांनी जोडली. बायडेन यांचे वय आणि मानसिक स्वास्थ्याबद्दल चिंता करण्याजोगे काही नसल्याचे ते म्हणाले. २०२१ साली झालेल्या भेटीदरम्यान असे काही जाणवले नाही, असे पुतिन यांनी सांगितले. सध्या ट्रम्प समर्थक रिपब्लिकन सदस्यांनी अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहात युक्रेनला ६० अब्ज डॉलर मदत अडवून धरली आहे. यावर टीका करताना बायडेन यांनी ‘ट्रम्प हे रशियाच्या हुकूमशहासमोर नतमस्तक झाले आहेत,’ असा हल्ला बायडेन यांनी चढविला होता. त्यामुळेच ट्रम्प यांच्यापासून फारकत घेण्याचा पुतिन यांचा प्रयत्न या मुलाखतीतून केला गेला असावा, असे विश्लेषकांचे मत आहे.
यावर अमेरिकेचे म्हणणे काय?
‘व्हाईट हाऊस’चे प्रवक्ता जॉन किर्बी यांनी पुतिन यांच्या विधानावर टीका केली. बायडेन प्रशासन रशियाचा जगभरातील घातक प्रभाव कमी करण्यासाठी काय पावले उचलत आहे, याची पुतिन यांना चांगलीच कल्पना असल्याचे सांगत त्यांनी अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहावे, असा सल्ला किर्बी यांनी दिला. तर सॅन फ्रान्सिस्को येथील एका निधीउभारणी कार्यक्रमात बायडेन यांनी पुतिन आणि ट्रम्प यांना लक्ष्य केले. ‘पुतिन हे क्रेझी एस.ओ.बी. (सन ऑफ ए बि**) आहेत, असे म्हणत त्यांनी आपला टोकाचा राग व्यक्त केला. ट्रम्प यांनी अलिकडेच स्वत:ची तुलना दिवंगत पुतिन-विरोधक अलेक्सी नवाल्नी यांच्याबरोबर केली होती. ज्याप्रमाणे पुतिन यांनी नवाल्नींना भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगात डांबले, तसेच खटले आपल्यावरही लादले गेले आहेत असा अजब युक्तिवाद ट्रम्प यांनी केला होता. यावर बायडेन यांनी टीकेची झोड उठविली नसती तरच नवल. या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी केलेले विधान हा पाताळयंत्रीपणाचा अस्सल नमुना असल्याचे मानले जात आहे.
पुतिन यांची राजकीय खेळी काय?
युक्रेनवर युद्ध लादल्यामुळे पुतिन हे सध्या अमेरिकेतील जनतेसाठी ‘खलनायक’ आहेत किंवा किमान तसे चित्र रंगविले गेले आहे. बायडेन प्रशासनाने युक्रेनला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू ठेवला आहे. उलट त्यात ट्रम्प यांचे रिपब्लिकन समर्थकच अडथळे निर्माण करीत आहेत. काही दिवसांपूर्वी तर ट्रम्प यांनी स्वत: ‘नेटोमधील देश उधारी चुकती करीत नसतील, तर रशियाने ठोस पावले उचलेली पाहिजेत,’ असा सल्ला देऊन संपूर्ण युरोपला धक्का दिला होता. असे असताना ट्रम्प यांच्यापेक्षा बायडेन व्हाईट हाऊसमध्ये असणे अधिक चांगले, हे रशियाच्या अध्यक्षांचे विधान म्हणजे आपल्याला ट्रम्प नको असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न मानला जात आहे. मात्र २०१६ सालच्या हिलरी क्लिंटन विरुद्ध ट्रम्प निवडणुकीत झालेले आरोप अमेरिकेची जनता अद्याप विसरली नसेल.
हेही वाचा >>>‘ओरिजिन’च्या निमित्ताने: भारतीय सिनेसृष्टीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्रण केव्हा व कुणी केले?
२०१६च्या निवडणुकीबाबत आरोप काय?
अमेरिकेतील गुप्तहेर यंत्रणांच्या मते २०१६ साली ट्रम्प विजयी व्हावेत, यासाठी रशियाच्या गुप्तहेर संघटनांनी योजना आखली होती. ‘प्रोजेक्ट लख्ता’ या नावाच्या या कथित योजनेत ट्रम्प यांच्या प्रचाराला चालना मिळावी या उद्देशाने बातम्या पेरणे, तथ्यांची मोडतोड करून समाजमाध्यमांमध्ये पसरविणे, अमेरिकेत राजकीय व सामाजिक मतभेद वाढविणे अशा गोष्टी केल्याचा संशय आहे. २०१९मध्ये सार्वजनिक झालेल्या ४४८ पानांच्या ‘म्युलर अहवाला’त पुतिन यांनी स्वत: या मोहिमेचे आदेश दिल्याचा दावा करण्यात आला आहे. ट्रम्प यांची तेव्हाची प्रचारयंत्रणा आणि रशियन अधिकाऱ्यांमध्ये २००पेक्षा जास्त संभाषणांचा या अहवालात उल्लेख आहे. मात्र पुराव्यांआभावी ‘प्रोजेक्ट लख्ता’बरोबर ट्रम्प यांचा संबंध जोडणे तपास यंत्रणांना शक्य झाले नाही आणि हा अहवाल बासनात गुंडाळला गेला. २०२०च्या बायडेन-ट्रम्प लढतीत पुतिन यांनी असे काही केल्याचे पुरावे नाहीत. मात्र आता पुन्हा अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत ‘पुतिन’ हा विषय ऐरणीवर येणे हा योगायोग नक्कीच नसावा…
– amol.paranjpe@expressindia.com