scorecardresearch

Premium

विश्लेषण: मतदारांना गृहित धरल्याचा फटका? कसबा पोटनिवडणुकीत भाजप का हरला?

पोटनिवडणुकीत सत्ताधारी जिंकतात असे सर्वसाधारणपणे मानले जाते. मात्र कसब्यातील हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागणार आहे.

kasba bypoll results
कसब्यामध्ये काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा विजय, भाजपाचे हेमंत रासने पराभूत! (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

कसबा मतदारसंघ तीन दशके भाजपच्या ताब्यात होता. पण नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांना पराभव केला. त्यामुळे मतदारसंघ तर हातचा गेलाच, पण मतदारांना गृहित धरणे भाजपला महागात पडले. तीन दशकांपूर्वी म्हणजे १९९१मध्ये पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांचा पराभव काँग्रेसचे वसंत थोरात यांनी केला होता. आता त्याची पुनरावृत्ती झाली आहे. मात्र यावेळी कारणे वेगळी आहेत. पोटनिवडणुकीत सत्ताधारी जिंकतात असे सर्वसाधारणपणे मानले जाते. मात्र कसब्यातील हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागणार आहे.

लोकसत्ताची ही बातमी वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in

उमेदवार निवडीवरून नाराजी

१९९५पासून कसब्यात सतत भाजप विजयी होत आले आहे. गेल्या वेळी मुक्ता टिळक यांनी मोठा विजय मिळवला होता. मात्र त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत उमेदवारीवरून भाजपची कोंडी झाली होती. टिळक कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी नाकारल्यावरून ब्राह्मण समाज नाराज असल्याची चर्चा होती. या मतदारसंघात ३५ हजार ब्राह्मण मतदार आहेत. काँग्रेसच्या धंगेकर यांना भाजपचे प्रभावक्षेत्र असलेल्या नारायण पेठ, सदाशिव पेठ या पेठांमध्ये चांगली मते मिळाली. त्यावरून उमेदवारीवरून ही नाराजी काही प्रमाणात स्पष्ट झाली. मुळात रासने हे पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती होते. सत्तेत असलेल्या व्यक्तीबद्दल नाराजी असतीच. सर्वच जण कामावर संतुष्ट नसतात. त्याचाही फटका बसला. त्या तुलनेत मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता अशी धंगेकर यांची प्रतीमा येथे कामी आली. त्यामुळे मतदारसंघातील सर्वच परिसरात त्यांनी मते घेतली. रासने यांना पेठांमध्ये काही अधिक मते मिळाली असली तरी, आघाडी तोडण्यात ती अपुरी ठरली. त्या तुलनेत पूर्व भागात धंगेकर अपेक्षेप्रमाणे मोठे मताधिक्य घेतल्याने निकाल स्पष्ट झाला.

पुन्हा जातीचा मुद्दा

१९९१ च्या पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी होती. ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर असा वाद त्यावेळी झाला होता. त्यात बापट यांचा पराभव झाला होता. यंदा टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी नाकारल्यानंतर कोथरुडपाठोपाठ कसब्यातही भाजपने ब्राह्मण उमेदवाराला डावलले असा प्रचार झाला होता. त्याचा परिणामही झाला. धंगेकर यांचा प्रवास शिवसेना, मनसे व आता काँग्रेस असा आहे. त्यामुळे सर्वच पक्षांमधील जुनी मैत्री त्यांना कामी आली. काँग्रेसच्या पारंपरिक मतांबरोबच इतर पक्षातून त्यांना मोठ्या प्रमाणात मते मिळाली. कारण मनसेला प्रचार सुरू असताना आपल्या काही कार्यकर्त्यांना निलंबित करावे लागले. ते धंगेकर यांचा प्रचार करत होते. त्यावरून व्यक्तिगत संबंध किती महत्त्वाचे हे लक्षात येईल. तसेच भाजपने पैसे वाटल्याचा आरोप धंगेकर यांनी मतदानाच्या तोंडावर केला होता. त्याचाही काही प्रमाणात परिणाम झाला.

Kasba Bypoll Result: देवेंद्र फडणवीसांचा नाना पटोलेंना टोला; म्हणाले, “नानाभाऊ, आता तुमच्यावर ही वेळ आलीये की…”!

थेट लढतीत अपयश

कसब्यात नेहमी तिरंगी लढतीत भाजप मोठ्या मतांनी विजयी झाला आहे. मात्र थेट लढत झाल्यावर मतविभाजन टळते. यावेळी भाजपला महाविकास आघाडीतील तीन पक्षांचा सामना करणे आव्हानात्मक ठरले. थेट लढतीत भाजप पराभूत होते हा अनुभव कसब्यातही आला. आगामी महापालिका निवडणुकीत त्याचा परिणाम दिसणार, त्यात बरोबर भाजपची हक्काची जागा गेली असा राज्यभर संदेश जाणार हे निश्चित. राज्यातील सर्वच प्रमुख नेते भाजपने प्रचारात उतरवले होते, तरीही अपयश आले. अगदी निवडणुकीदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा झाला होता. त्यांचा थेट प्रचारात सहभाग घेतला नसला तरी, ते याच दरम्यान पुण्यात अन्य कार्यकमाला येणे एक संदेश मानला जात होता.

चिंचवडने भाजपची पत राखली…

कसब्यात पराभव होत असताना दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी यांच्या विजयाने भाजपला काहीसा दिलासा मिळाला आहे. जगताप कुटुंबाबरोबच भाजपचे चिंचवड गावात पारंपरिक मतदान आहे ते कामी आले. महाविकास आघाडीतील बंडखोरी हा मुद्दा असला तरी, बंडखोराला मिळालेली काही मते जगताप यांच्याकडेही वळाली असती हा मुद्दा आहे. तिरंगी लढतीबरोबरच जगताप यांच्याबाबतची सहानुभूती भाजपच्या पथ्यावर पडली. कसब्यासारखा हुकमी मतदारसंघ हातचा गेल्यानंतर चिंचवडच्या विजयाने भाजपची काही प्रमाणात पत राखली गेली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-03-2023 at 14:15 IST
ताज्या बातम्या