Keeladi: भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण ASI विभागाने आजतागायत उत्तर भारताच्या इतिहासावर अधिक भर दिला आहे. परंतु, दक्षिणेतही मानवी जीवनाचे ठोस पुरावे शोधले पाहिजेत,” असे खिलाडी उत्खननाशी संबंधित पुरातत्त्व अभ्यासक के. अमरनाथ रामकृष्ण यांनी सांगितले. रामकृष्ण यांनी २०२३ साली न्यायालयाच्या आदेशामुळे दोन वर्षांच्या विलंबानंतर खिलाडी या स्थळाच्या उत्खननाचा अहवाल सादर केला. मात्र, त्यानंतर भारतीय पुरातत्त्व खात्याने रामकृष्ण यांना त्या अहवालात पुन्हा सुधारणा करण्यास सांगितली.
रामकृष्ण यांनी सांगितलं की, उत्तर भारतातील शहरी वस्तींच्या स्थळाचा शोध घेऊन त्यावर सखोल संशोधन करण्यात आले, त्याप्रमाणे दक्षिणेत झाले नाही. दक्षिण भारतात मुख्यतः महाश्मयुगीन प्राचीन दफनं तसेच समाधी स्थळांवर संशोधन करण्यात आले आहे. परंतु, प्रत्यक्ष वस्तीचे ठसे आणि प्राचीन जीवनशैलीचे पुरावे शोधण्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. रामकृष्ण यांचे २०१४ ते २०१६ या काळात झालेले खिलाडी उत्खनन मात्र या पारंपरिक समजुतीला आव्हान देणारे ठरले. आतापर्यंत असा समज होता की, भारताची शहरी संस्कृती उत्तर भारतातून दक्षिणेकडे गेली. पण खिलाडीतील पुरावे मात्र वेगळंच चित्र दाखवतात.
खिलाडी अहवाल आणि रामकृष्ण यांची बदली
रामकृष्ण यांनी खिलाडी उत्खननावर आपला अहवाल दोन वर्षांपूर्वीच सादर केला होता. पण त्यानंतर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (ASI) त्यात सुधारणा करण्यास सांगितले होते. मात्र, रामकृष्ण यांनी नकार दिला आणि “मी माझ्या अहवालावर ठाम आहे” असे स्पष्ट केले. गेल्या दहा वर्षांत त्यांची अनेकदा बदली झाली आहे. १७ जूनला त्यांना ग्रेटर नोएडामध्ये ‘नॅशनल मिशन ऑन मॉन्युमेंट्स अँड अँटिक्विटीज’ (NMMA) या संस्थेच्या संचालकपदी नेमण्यात आले.
दक्षिणेकडील उत्खननांचा मर्यादित फोकस
रामकृष्ण यांनी सांगितले की, १९४५ साली अरिकामेडू आणि १९६५ साली कावेरी पूंपुहार येथील उत्खनन वगळता दक्षिणेत मानवी वस्ती शोधण्याच्या संदर्भात मोठे उत्खनन झालेले नाही. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अलेक्झांडर रे यांनी आदिचनल्लूर येथे उत्खनन केले. अशाच स्वरूपाची बहुतांश उत्खनन दक्षिणेत झाली आहे. जी महाश्मयुगीन संस्कृतीतील समाधी स्थळं/ दफनं दर्शवणारी आहे. तरीही यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न मागे उरतो, ही समाधी स्थळ कोणी निर्माण केली. कारण या दफनांमुळे आपल्याला अंत्यसंस्कारांविषयी माहिती मिळते, परंतु, त्यांचं दैनंदिन जीवन कसं होतं, हे समजत नाही. त्यामुळे किलाडीच्या उत्खननातून हेच शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
वैगई नदीकाठी संशोधन आणि किलाडीची निवड
रामकृष्ण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जवळपास एक वर्ष वैगई नदीच्या दोन्ही काठांवर तब्बल २९३ स्थळांचं सर्वेक्षण केलं. त्यानंतर त्यांनी मदुराईजवळच्या किलाडी या गावावर लक्ष केंद्रित केलं. येथे २०१४ ते २०१६ या दोन हंगामांत उत्खनन करण्यात आलं. जवळपास ४० वर्षं नारळाची बाग असलेल्या टेकाडावर उत्खननास सुरुवात झाली. या ठिकाणी पहिल्यांदाच मानवी वस्तीचे पुरावे सापडले. या ठिकाणी भाजलेल्या विटांच्या बांधकामाचे अवशेष सापडले. अरिकामेडूनंतर पहिल्यांदा असे बांधकामाचे पुरावे सापडले. यावरूनच किलाडीत एक प्रगत नागरी संस्कृती अस्तित्त्वात होती, असं समजतं.
इतिहास बदलवणारी नवी मांडणी
रामकृष्ण यांनी २०२३ साली सादर केलेल्या अहवालात म्हटलं आहे की, किलाडीतील सर्वात प्राचीन वस्तीचे पुरावे इ.स.पू. ८ व्या ते ५ व्या शतकातील असू शकतात. जर हे खरे ठरले, तर किलाडी गंगेच्या खोऱ्यात असलेल्या प्राचीन शहरांबरोबर समकालीन ठरेल. ही मांडणी इतकी महत्वाची आहे की, ती इतिहासाबरोबर राजकारणालाही हादरा देऊ शकते.
दक्षिणेकडील सर्वात मोठं उत्खनन
रामकृष्ण म्हणतात, “दक्षिणेत एवढं मोठं उत्खनन पहिल्यांदाच झालं. यातून दिसून आलं की ‘दुसरं नागरीकरण’ म्हणजे इ.स.पू. ६व्या शतकाच्या सुमारास (हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासानंतर) निर्माण झालेली नवी शहरे दक्षिणेतही उदयाला आली होती. प्रारंभीचं आणि नंतरचं संगम साहित्य (इ.स.पू. ३ रे शतक मानलं जाणारं सर्वात जुनं तमिळ साहित्य) मानवी वस्तीचं वर्णन करतं. याचा अर्थ, हे लोक काही पोकळ जागेत राहत नव्हते, तर त्यांचं ठोस जीवन होतं.”
वाद आणि राजकीय वादळ
२०१७ साली दुसरा टप्पा संपल्यानंतर रामकृष्ण यांची बदली आसामला झाली. त्यानंतर तिसरं उत्खनन एएसआयचे पुरातत्त्वज्ञ पी. श्रीरामन यांनी केलं. पण त्यांनी “किलाडीत विशेष असं काही नाही” असं जाहीर केलं. यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला. केंद्र सरकार तमिळनाडूच्या प्राचीनतेला कमी लेखत आहे, असा आरोप झाला. शेवटी प्रकरण उच्च न्यायालयात गेलं. न्यायालयाने रामकृष्ण यांना त्यांचा अहवाल पूर्ण करायला सांगितलं आणि तामिळनाडू पुरातत्त्व विभागालाही पुढील उत्खननाची परवानगी दिली.
राज्य पथकाचे निष्कर्ष
२०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन हंगामांत राज्य पथकाने सोन्याच्या दागिन्यांचे तुकडे, लोखंडी साधने आणि मातीच्या विहिरी (terracotta ring wells) अशा अनेक वस्तू सापडल्याचं नोंदवलं. त्यांच्या अहवालात किलाडीचं स्वरूप इ.स.पू. ६ व्या शतकातील किंवा त्याही आधीचं नागरी वस्तीचं असल्याचं नमूद करण्यात आलं.
पुन्हा वाद; अहवाल सुधारण्याची मागणी
२०२३ साली, रामकृष्ण यांनी न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर आपला अहवाल सादर केला. पण त्यानंतर दोन वर्षांनी भारतीय पुरातत्त्व विभागाने त्यांना पुन्हा सुधारण्यास करण्यास सांगितली.
रामकृष्ण यांची ठाम भूमिका
रामकृष्ण म्हणतात, “मी अहवाल सुधारण्यास नकार दिला. माझ्या निष्कर्षांवर मी ठाम आहे. किलाडी हे दर्शवते की, सर्व संस्कृती स्वतंत्ररित्या विकसित झाल्या. पण आत्तापर्यंत आपण फक्त २ टक्के टेकाड खोदले आहे. अजून खूप काही किलडीत दडलं आहे. त्यामुळे दक्षिणेत आणखी उत्खननं व शोधकार्य होणं आवश्यक आहे.”
भारतीय पुरातत्त्व विभागाच्या शाखा आणि त्यांचा फोकस
सध्या दिल्ली, नागपूर, बडोदा, पटना, भुवनेश्वर आणि म्हैसूर येथे भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सहा उत्खनन शाखा आहे. त्यांचं काम म्हणजे पुरातत्त्वीय शोध व उत्खनन करणे.
उत्तरकडे झुकलेलं संशोधन
रामकृष्ण पुढे सांगतात, “भारतीय पुरातत्त्व विभागाने नेहमी उत्तर भारतावर जास्त लक्ष केंद्रित केलं आहे. दक्षिणेकडील ऐतिहासिक मांडणी कधीही ठोस पुरातत्त्वीय पुराव्यांनी सिद्ध केलेली नाही. हडप्पा आणि मोहेंजोदडो हे ठिकाण पाकिस्तानात गेलं, त्यामुळे आपण उत्तरेकडे इतकं उत्खनन केलं. जे हरवलं आहे, ते आपण शोधतो. आता दक्षिणेकडे तेवढंच लक्ष देण्याची वेळ आली आहे. इतिहास म्हणजे संशोधन आणि त्याकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहायला हवं.”