डार्क वेबची चर्चा आपण अनेकदा ऐकली असेल. सामान्यतः तस्करीसाठी याचा वापर केला जात असल्याच्या अनेक बातम्या सातत्याने समोर येत असतात. नुकतंच डार्क वेबचा वापर करून ड्रग्ज विकल्याप्रकरणी एका अभियंत्याला अटक करण्यात आली आहे. केरळच्या मुवट्टुपुझा शहरातील एका ३५ वर्षीय मेकॅनिकल इंजिनीयरला डार्क वेबवर ड्रग्ज विकल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलायमकोटिल एडिसन हा ‘लेव्हल-फोर डार्कनेट विक्रेता’ होता आणि त्याच्याकडे एलएसडी ब्लॉटर्स – हॅलुसिनोजेनिक लायसर्जिक अॅसिड डायथाइलमाइड (एलएसडी) केटामाइनने भरलेले ब्लॉटर पेपर (विशेष प्रकारचा कागद, जो शाई किंवा इतर द्रवांना शोषून घेण्यासाठी वापरला जातो) आणि सुमारे एक कोटी रुपयांची क्रिप्टोकरन्सी असल्याचे आढळून आले. डार्क वेब म्हणजे काय? त्याचा वापर गुन्ह्यांसाठी का केला जातो? लेव्हल-फोर विक्रेता म्हणजे नक्की काय? त्याविषयी जाणून घेऊयात.

डार्क वेब म्हणजे काय?

  • डार्क वेब हा इंटरनेटचाच एक भाग आहे, जिथे कायदेशीर आणि बेकायदा अशा दोन्ही प्रकारची कामे चालतात; पण त्यात कोणीही प्रवेश करू शकत नाही किंवा याला सर्च इंजिनद्वारे शोधता येत नाही.
  • डार्क वेबमध्ये प्रवेश करण्यासाठी विशेष साधने किंवा ब्राउझरची आवश्यकता असते. हे वेब ब्राउझर फायरफॉक्स, गूगल किंवा याहू यांसारख्या वेब ब्राउझरप्रमाणे नसते. कारण- या वेब ब्राउझरवर वापरकर्त्यांच्या क्रियाकलापांचे आयपी अॅड्रेसद्वारे निरीक्षण केले जाऊ शकते.
  • परंतु, डार्क वेबमध्ये वापरकर्त्याची ओळख लपलेली असते. कारण, डार्क वेब ओनियन राउटिंग तंत्रज्ञानावर काम करते.
डार्क वेबची चर्चा आपण अनेकदा ऐकली असेल. सामान्यतः तस्करीसाठी याचा वापर केला जातो. (छायाचित्र-रॉयटर्स)

इंटरनेटच्या एन्क्रिप्टेड आणि एका गुप्त भागाची कल्पना १९९० च्या दशकात आली. यूएस नेव्हल रिसर्च लॅबोरेटरीने द ओनियन राउटिंग प्रकल्पाच्या काही प्राथमिक आवृत्त्या तयार केल्या आणि त्यानंतरच याला टॉर म्हटले गेले. टॉरमध्ये कांद्याच्या थरांप्रमाणे ओनियन कम्युनिकेशन नेटवर्कमध्ये एन्क्रिप्शन एम्बेड केले जाते. प्रामुख्याने इंटरनेटवर शेअर केलेल्या महत्त्वाच्या सरकारी संप्रेषणांचे संरक्षण करणे, अमेरिकी लष्कराने त्यांची गोपनीय माहिती कुणाच्या हाती लागू नये यासाठी डार्क वेबची सुरुवात केली होती. २००० च्या दशकाच्या सुरुवातीला रॉजर डिंगलेडाइन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी टॉर विकसित केले. त्यांचा उद्देश स्वयंसेवक संचालित सर्व्हरद्वारे ट्रॅफिक राउट करून आणि वापरकर्त्यांची ओळख समोर येऊ नये म्हणून डेटा एन्क्रिप्ट करणे आणि ऑनलाइन गोपनीयता वाढवणे हा होता.

गेल्या काही वर्षांत बेकायदा वस्तूंचा व्यापार आणि सायबर गुन्ह्यांसह बेकायदा कामांसाठी याचा वापर लक्षणीयरीत्या वाढला आहे. डीप वेबमध्ये अशा सर्व प्रकारच्या अनेक वेबपेजचा समावेश आहे; जे सर्च इंजिन शोधू शकत नाही. उदाहरणात डेटाबेस, पेमेंट गेटवे इत्यादी. मुख्य म्हणजे त्यावर किती वेबसाईट आहेत, किती डीलर आहेत, खरेदी करणारे किती आहेत याची माहिती मिळवणे अत्यंत अवघड आहे. त्यामुळेच डार्क वेबवर चालणाऱ्या गुन्हेगारीचा लवकर छडा लागत नाही.

डार्क वेब कसे काम करते?

वापरकर्त्यांना टॉर डाउनलोड करावा लागतो, जो वापरकर्त्याच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी ओळखला जातो. टॉर जगभरातील अनेक सर्व्हर (नोड्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या) द्वारे कनेक्शन रूट म्हणून करतो आणि प्रत्येक टप्प्यावर डेटा एन्क्रिप्ट करतो. डार्क वेब अनेक आयपी अॅड्रेसमधून कनेक्ट आणि डिस्कनेक्ट होते. त्यामुळे या नेटवर्कला ट्रेस करणे जवळजवळ अशक्य असते. डार्क वेबवरील वेबसाइट्स ‘ओनियन’ डोमेनचा वापर करतात. त्याद्वारे कोड एन्क्रिप्ट होतात. डार्क वेब मार्केटप्लेस, फोरम आणि अगदी लायब्ररीदेखील अस्तित्वात आहेत. तसेच त्यावर ड्रग्ज, शस्त्रे, चोरीचा डेटा व हॅकिंग सेवा विकणारे काळाबाजारीदेखील सक्रिय आहेत.

ई-कॉमर्स वेबसाइटवर ज्या प्रकारे विविध ऑफर दिल्या जातात, अगदी तशाच ऑफर डार्क वेबवरही दिल्या जातात. त्यावरील व्यवहारांसाठी पैशांची देवाणघेवाण क्रिप्टोकरन्सीमार्फत केली जाते. क्रिप्टोकरन्सी हे एक डिजिटल चलन आहे.

डार्क वेबवर बेकायदा व्यवहार कसा चालतो?

डार्क वेब बेकायदा व्यवहारांसाठी कायम चर्चेत असते. मात्र, असे असले तरीही कायदेशीर उद्देशांसाठीदेखील याचा वापर केला जातो. काही गुप्त माहितीसंदर्भात पत्रकार आणि कार्यकर्ते सुरक्षितपणे संवाद साधण्यासाठी याचा वापर करतात. इंटरनेटवर जास्त सेन्सॉरशिप असलेल्या देशांमध्ये डार्क वेब सेन्सॉर नसलेल्या माहितीसाठी महत्त्वाचे ठरते. रुग्णालये किंवा इतर संस्था त्यांचा डेटा संरक्षित करण्यासाठीदेखील याचा वापर करतात. परंतु, त्यात गुप्तता असल्याने सायबर गुन्ह्यांनाही चालना देते.

आता बंद पडलेल्या सिल्क रोडसारखे काळाबाजारी येथे कार्यरत आहेत. ते अमली पदार्थ, बनावट चलन आणि मालवेअरचा व्यापार करतात. या प्लॅटफॉर्मवर चोरीला गेलेला आर्थिक डेटा, हॅकिंग टूल्स आणि अगदी कॉन्ट्रॅक्ट किलर्सची जाहिरातदेखील केली जाते. जगभरातील कायदा अंमलबजावणी संस्था डार्क वेब क्रियाकलापांवर लक्ष ठेवतात; परंतु सतत विकसित होत असलेल्या एन्क्रिप्शन पद्धतीमुळे गुन्हेगारांना ट्रॅक करणे आव्हानात्मक ठरते. डार्क वेबवर असेही अनेक जण आहेत, जे अत्यंत स्वस्तात बंदी असलेल्या वस्तू विकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘लेव्हल-फोर विक्रेता’ म्हणजे काय?

‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीमधील सूत्रांनुसार, विक्रेत्याची श्रेणी विकल्या जाणाऱ्या औषधांच्या क्षमतेवर आणि देऊ केलेल्या ग्राहक सेवेवर अवलंबून असते. एडिसन हा भारतातील एकमेव लेव्हल-फोर विक्रेता होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.