Ketogenic Diet Side Effects : झटपट वजन कमी करण्यासाठी गूगलवर माहिती शोधणाऱ्यांची संख्या या जगात कमी नाही. लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या डाएटबद्दलची माहिती शोधत असतात. सध्या महिला, तसेच तरुणींमध्ये केटोजेनिक आहाराला (केटो डाएट) मोठी लोकप्रियता मिळत आहे. आहाराची ही पद्धती वापरल्यास वजन कमी होण्यात मदत होत असल्याचा दावा अनेकांकडून केला जात आहे. मात्र, नुकत्याच केलेल्या एका संशोधनातून केटो डाएटबद्दल एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे. आहाराच्या या पद्धतीमुळे स्तनांचा कर्करोग बळावण्याचा धोका वाढतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. अभ्यासात नेमके काय म्हटलेय? त्याचाच हा आढावा…
- केटो डाएटचा उगम १९ व्या शतकाच्या उतरार्धात झाल्याचे सांगितले जाते.
- सुरुवातीला मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहाराची ही पद्धती वापरण्यात आली.
- १९२० पासून आधुनिक वैद्यांनी लहान मुलांना होणाऱ्या अपस्मारावर (अपस्मार) उपचार करण्यासाठी त्याचा वापर सुरू केला.
- केटोजेनिक आहार हा एक अतिशय कमी कर्बोदक व उच्च चरबीयुक्त आहार आहे.
- त्यात कर्बोदकांचे सेवन तीव्रपणे कमी करणे आणि चरबीने बदलणे समाविष्ट आहे.
- कर्बोदकांमधील ही घट मानवी शरीराला केटोसिस नावाच्या चयापचय अवस्थेत आणते.
- केटो डाएट हा एक लोकप्रिय कमी कर्बोदके खाण्याचा प्रकार आहे, जो १९६० च्या दशकात हृदयरोग तज्ज्ञ रॉबर्ट सी. अॅटकिन्स यांनी विकसित केलेला आहे.
- अल्प कालावधीतच हा आहार वजन कमी करण्यासाठी, तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब सुधारण्यासाठी यशस्वी ठरला आहे.
- मात्र, दीर्घकाळ हा आहार घेतल्यास त्याचा शरीरावर काय परिणाम होतो, याबद्दल अजूनही ठोस उत्तरे मिळालेली नाहीत.
संशोधनातून काय समोर आले?
अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ युटा येथील हंट्समन कॅन्सर इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांनी काही महिन्यांपूर्वी केटो डाएट पद्धतीवर एक संशोधन केले. ‘Hyperlipidemia drives tumour growth in a mouse model of obesity-accelerated breast cancer’ या विषयावर हे संशोधन करण्यात आले. ‘Cancer & Metabolism’ या जर्नलमध्ये नुकताच या संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. संशोधकांना अभ्यासात असे आढळून आले की, शरीरातील अनियंत्रित चरबीमुळे महिला, तसेच तरुणींमध्ये ट्रिपल-निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो. लठ्ठ असलेल्या व्यक्तींमध्ये या चरबीच्या पेशी मोठ्या प्रमाणात आढळतात. ‘हायपरलिपिडेमिया’ नावाच्या स्थितीशी जोडलेल्या रक्तातील चरबीची उच्च पातळी स्तनांच्या कर्करोगासाठी कारणीभूत ठरू शकते.
संशोधकांनी काय सांगितले?
जेव्हा स्तनाचा कर्करोग निर्माण करणाऱ्या पेशींचे विभाजन होऊन त्यात वाढ होते, तेव्हा शरीरातील अतिरिक्त चरबी या पेशींसाठी ‘बिल्डिंग ब्लॉक्स’ म्हणून काम करतात, असे या संशोधनात सहभागी झालेल्या डॉ. अमांडिन चेक्स यांनी सांगितले. या प्रक्रियेमुळे महिलांमधील स्तनाच्या कर्करोगाचा धोका झपाट्याने वाढतो, असेही त्या म्हणाल्या. संशोधकांनी हा प्रयोग उच्च चरबीयुक्त आहार घेणाऱ्या आणि आनुवंशिकरीत्या रक्तात चरबीची उच्च पातळी असलेल्या उंदरांवर केला. या अभ्यासात त्यांना चरबीचे प्रमाण आणि स्तनांचा कर्करोग यांच्यात थेट संबंध असल्याचे आढळून आले. उंदरांच्या शरीरातील चरबीचे प्रमाण कमी केल्यानंतर त्यांच्या शरीरात कर्करोगाचा धोका वाढल्याचे दिसून आले.
स्तनांच्या कर्करोगाचा धोका कशामुळे वाढतो?
डॉ. चेक्स पुढे म्हणतात, “शरीरातील पेशींच्या बाहेरील रक्ताचे चरबीचे प्रमाण म्हणजे जणू बांधकामाचे वीट-दगडच. जर एखाद्या पेशीला वाढ किंवा विभाजनाचा सिग्नल मिळाला आणि त्या वाढीसाठी शरीरात चरबीचे प्रमाण उपलब्ध असेल, तर कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. आमच्या लक्षात आले आहे की, रक्तातील चरबीचे जास्त प्रमाण हे पेशींच्या वाढीला मदत करते.” या संशोधनाचे सह-प्रमुख अभ्यासक डॉ. केरेन हिलगेंडॉर्फ म्हणाले, “लोकांनी लठ्ठपणात फॅट आणि लिपिड्सचे महत्त्व कमी लेखले आहे. आमच्या संशोधनानुसार, स्तनाच्या कर्करोगाच्या पेशी प्रत्यक्षात लिपिड्सवर चालतात. त्यामुळेच हा आजार लठ्ठ व्यक्तींमध्ये अधिक आक्रमक स्वरूपात दिसतो.”
केटो डाएट घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!
संशोधक डॉ. ग्रेग डकर यांनी उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या व्यक्तींना केटो डाएटपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. “जर तुमच्या शरीरात आधीच उच्च कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण जास्त असेल, केटोसारखा उच्च प्रमाणातील चरबीयुक्त आहारामुळे तुमच्या समस्येत अधिकच वाढ होऊ शकते”, असे त्यांनी म्हटले आहे. संशोधकांनी लठ्ठपणाने त्रस्त असलेल्या महिलांना कोणताही नवीन आहार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे. औषधोपचार किंवा आहारातील बदलांच्या मदतीने शरीरातील अतिरिक्त चरबीचे प्रमाण कमी करणे गरजेचे असल्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
या संशोधनाच्या मर्यादा नमूद करताना शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले की, हा अभ्यास अजूनही प्राथमिक टप्प्यात आहे आणि उंदरांचे चयापचय मानवापेक्षा वेगळे असते. तरीही या अभ्यासाच्या सकारात्मक परिणामांमुळे त्याकडे उपचाराच्या दृष्टीने आशादायी म्हणून पाहिले जात आहे. डॉ. हिलगेंडॉर्फ यांनी केटो डाएटबद्दल अधिक संशोधनाची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे. “आमचे उंदरांवरील परिणाम प्रभावी असले तरी ते थेट माणसांवर लागू करणे अद्याप शक्य नाही. त्यासाठी मानवी पेशींवर आणि रुग्णांवर आधारित अधिक संशोधनाची गरज आहे,” असे डॉ. हिलगेंडॉर्फ यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे केटो डाएट करणाऱ्यांना सध्या तरी कोणतीही भीती बाळण्याची गरज नसल्याचे स्पष्ट झाले आहे.