Kolhapuri chappals vs Prada: इटालियन लक्झरी फॅशन हाऊस प्राडाने २०२६ साठी त्यांचे स्प्रिंग समर कलेक्शन नुकतेच लाँच केले. या लाँचिंगच्या कार्यक्रमावेळी हुबेहूब कोल्हापुरीसारखी दिसणारी चप्पल प्राडाच्या मेन्स कलेक्शनच्या नावाखाली विकत असल्याचे दिसून आले. कोल्हापूरची ही चप्पल इटालियन असल्याचे यावेळी भासवण्यात आले.
कोल्हापुरी चप्पलवर जीआय टॅग असतो, जो एखाद्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातून येणाऱ्या उत्पादनासाठी वापरला जातो. विशिष्ट भागातील गुणवत्ता आणि पारंपरिक उत्पादन प्रमाणित करण्यासाठी जीआय टॅग वापरला जातो, त्यामुळे संबंधित क्षेत्रातील स्थानिक व्यावसायिकांसाठी हा खूप फायदेशीर ठरतो. प्राडाने त्यांच्या उत्पादनांना कोल्हापुरी पादत्राणे किंवा त्यांच्या मूळ संकल्पनेचे श्रेय कुणालाही दिलेले नाही, यामुळे प्राडावर भारतीय सांस्कृतिक वारशाचा फायदा उठवण्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्राडा कोल्हापुरीसारखी ही चप्पल एक लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकत आहे, तर भारतीय कारागीर तीच चप्पल ४०० रुपयांत बनवतात. या संदर्भात कोल्हापुरातील चप्पल बनवणाऱ्या कारागीरांमध्ये नाराजी आहे. महाराष्ट्रातील काही कारागीरांनी या प्रकरणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सकडे लक्ष घालण्याची विनंती केली होती, त्यानुसार महाराष्ट्र चेंबर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्राडा कंपनीकडे पत्रव्यवहार केला आहे.
दरम्यान, कोल्हापुरी चप्पलचे उत्पादक प्राडाच्या कथित अनैतिक कृतीविरुद्ध न्यायालयात जाण्याची योजना आखत आहेत. चप्पल उत्पादकांचा युक्तिवाद असा आहे की, प्राडाच्या पादत्राणांची रचना सांस्कृतिक विनियोग आहे आणि जीआय टॅगचे उल्लंघन आहे, कारण ती मूळ कोल्हापुरीसारखीच आहे.
सांस्कृतिक विनियोग म्हणजे काय?
सध्याच्या संदर्भात सांस्कृतिक विनियोग म्हणजे डिझायनर किंवा फॅशन हाऊस दुसऱ्या संस्कृतीतील एखादा घटक त्यांच्या उत्पादनात समाविष्ट करण्याची पद्धत. अनेकदा हा प्रकार नकळत केला जात असल्याचा दावा अशा कंपनींकडून करण्यात येतो. पाश्चात्य फॅशन हाऊस असं काही करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, असे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी लॉ फर्मचे सफिर आनंद यांनी म्हटले आहे. याचं एक उदाहरण म्हणजे, गुची नावाच्या एका फॅशन हाऊसने फुलांची एम्ब्रॉयडरी असलेला कुर्त्यासारखा दिसणारा लिननचा कफ्तान हजारो डॉलर्सना विकला होता.
“एखाद्या संस्कृतीतील काही घटक किंवा कल्पना वापरणे हा निश्चितच एका क्रिएटिव्ह प्रोसेसचा भाग आहे. मात्र, पारंपरिक कारागीर केलेल्या उत्पादनांचा वापर करताना कोणत्याही ब्रँड किंवा डिझायनरने कल्पना वापरण्यापूर्वी संमती घेतली पाहिजे आणि त्याची भरपाई वा श्रेय दिले पाहिजे”, असेही आनंद म्हणाले.
GI टॅग कोणत्या आधारावर दिला जातो?
जीआय टॅगबाबत बोलताना आनंद यांनी खालील मुद्दे मांडले आहेत.
- भौगोलिकरित्या मूळ- उत्पादन एखाद्या विशिष्ट ठिकाणाहून असले पाहिजे. तसंच त्याची गुणवत्ता, प्रतिष्ठा किंवा वैशिष्ट्ये त्या भौगोलिक मुळाशी संबंधित असली पाहिजे.
- परिभाषित उत्पादन मानके- अर्जात सविस्तर उत्पादन पद्धती, साहित्य आणि गुणवत्ता मानक निर्दिष्ट करणे आवश्यक आहे.
- नोंदणीकृत मालक आणि अधिकृत वापरकर्ते- अधिकृत वापरकर्ते म्हणून नोंदणी असलेल्या संस्था (उत्पादक गट, संघटना किंवा सहकारी संस्था) कायदेशीररित्या जीआय वापरू शकतात.
- हस्तांतरणावर बंदी- जीआय टॅगचे हस्तांतरण करता येत नाही आणि ते ट्रेडमार्कसारखे परवानाकृत केले जाऊ शकत नाही
- अमंलबजावणी आणि देखरेख- मालक आणि सरकारकडून गैरवापरावर लक्ष ठेवणे तसंच बनावट किंवा खोट्या वापरावर कायदेशीर कारवाई सुरू करणे अपेक्षित आहे.
- सामान्य शब्दाचा वापर नाही- उत्पादनाचे नाव सामान्य असू नये.
कोल्हापुरी उत्पादक जीआय टॅगचे उल्लंघन केल्याचा दावा करू शकतात का?
“कोल्हापुरी उत्पादक दावा दाखल करू शकतात. मात्र, ते फक्त श्रेय मिळवण्यापुरते मर्यादित आहे. ते आर्थिक भरपाईचा दावा करू शकत नाहीत”, अशी माहिती आनंद यांनी दिली. प्राडा असा युक्तिवाद करू शकते की, त्यांनी कोल्हापुरी हा शब्द वापरलेला नाही किंवा त्यांच्या उत्पादन प्रक्रियेचा दावा केलेला नाही.
सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील डिझायनर किंवा ब्रँडने त्यांच्या डिझाइनमागील वारसा मान्य केला पाहिजे आणि आर्थिक तसंच इतर पारंपरिक प्रकारे संबंधितांना योग्य श्रेय दिले पाहिजे, असे मतही आनंद यांनी व्यक्त केले.
महत्त्वाचं म्हणजे, तुमच्या डिझाइन किंवा संग्रहाचा भाग म्हणून कोणताही सांस्कृतिक घटक मग तो आकृतीबंध असो वा छायाचित्र स्वरूपात किंवा आणखी कोणत्या स्वरूपात, तर तो वापरण्यापूर्वी परवानगी घेणे आवश्यक आहे, असे आनंद यांनी सांगितले.
पारंपरिक कलेचे संरक्षण करणे इतके कठीण आहे का?
पारंपरिक कलेचे संरक्षण करणे खरंच कठीण आहे, कारण आज अस्तित्वात असलेल्या बौद्धिक संपदा प्रणाली अर्थात पेटंट, ट्रेडमार्क किंवा कॉपीराइट हे सामूहिक वारशासाठी नाही तर वैयक्तिक नवीन उपक्रमासाठी डिझाइन केल्या गेल्या आहेत. “बौद्धिक संपदेचं संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्याशी निगडीत प्रणालींसाठी एक ज्ञात, ओळखण्याजोगे क्रिएटर किंवा शोधक आवश्यक असतात. पारंपरिक हस्तकला या साधारणपणे सामुदायिकरित्या एकत्रितपणे तयार केल्या जातात. पारंपरिक हस्तकला प्राचीन, व्यापकपणे ज्ञात आणि आधीच सार्वजनिक क्षेत्रात आहेत. अनेक पारंपरिक हस्तकला रेकॉर्ड, रेखाचित्रे किंवा तांत्रिक तपशिलांशिवाय तोंडी प्रसारित केल्या जातात. अधिकारांची पडताळणी आणि संरक्षण करण्यासाठी बौद्धिक संपदा प्रणाली कागदपत्रांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. ट्रेडमार्क वगळता बहुतेक बौद्धिक संपदा संरक्षणांना संरक्षणाचे आयुष्य कमी असते, तर पारंपरिक हस्तकलांना शाश्वत संरक्षणाची आवश्यकता असते, जे अशा मर्यादांशी विसंगत आहे असे आनंद यांनी म्हटले.