मुळात म्हणजे ते काहीजण सोन्याच्या शोधार्थ निघाले… तशी म्हणा त्या गावाची ख्यातीच होती. या गावात म्हणे एका जुन्या किल्ल्यात पुरलेला खजिना आहे. त्या काहींनी निश्चय केला हा खजिना शोधून काढायचाच. ते खोदत होते, आणि झालं भलतंच चक्क एक जुनं नामशेष झालेले शहर दिसू लागलं. त्यांच्यासाठी कदाचित तो खजिना नव्हता. साधं दगड विटांच जुनं शहर होतं. असं असलं तरी तोच होता भारताच्या समृद्धीचा वारसा सांगणारा खरा खजिना.  

हे शहर नक्की कुठे सापडले?

हे नव्याने उघडकीस आलेले शहर गुजरात मध्ये सापडलं असून जागतिक वारसा स्थळ असलेल्या ढोलावीरा पासून ५१ किमी अंतरावर आहे. या ठिकाणी असणाऱ्या लोणाद्री या गावात सोन्याचे तुकडे गाढले गेल्याची आख्यायिका आहे. म्हणूनच काही ग्रामस्थांनी एकत्र येवून त्या सोन्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. याच सोन्याच्या शोधात एका शहराची तटबंदी असलेली वस्ती समोर आली. हे शहर सिंधू संस्कृतीचे आहे. अजय यादव हे या विषयावर त्यांच्या ऑक्सफर्ड स्कूल ऑफ आर्किऑलॉजीचे प्राध्यापक, डॅमियन रॉबिन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करत आहेत. या नव्याने समोर आलेल्या शहराच्या शोधात त्यांचा प्रमुख सहभाग होता. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या नवीन समोर आलेल्या शहराची रचना जगप्रसिद्ध ढोलावीरा या शहरासारखी आहे. यादव यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या माहितीनुसार ही जागा पूर्वी पडीक होती. कचरा, दगड यांचा ढीग येथे होता. गावकऱ्यांच्या माहितीनुसार पूर्वी येथे एक मध्ययुगीन किल्ला होता. आणि त्यात खजिना पुरला गेल्याची दंतकथा आहे. परंतु जे शहर समोर आले आहे, त्या शहरात सुमारे ४५०० वर्षांपूर्वी भरभराट नांदत होती,  असे तज्ज्ञांना लक्षात आले आहे. 

46 lakhs in the bungalow and house of the corrupt Tehsildar
नोटांचे ढीग पाहून एसीबी अधिकारीही चक्रावले; लाचखोर तहसीलदाराच्या बंगला व घरात ४६ लाखाचे घबाड, कॅश मोजायला…
Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
navi mumbai municipal administration playing hide and seek with tenders amount
कामांच्या निविदा रकमांबाबत लपवाछपवी; नवी मुंबई शहरातील ठेकेदार महापालिका प्रशासनाच्या संगनमताची शंका
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा

अधिक वाचा: सिंधू लिपी नवीन संशोधनावरून पुन्हा खळबळ का? खरंच आहे का ही लिपी भारतीयांच्या लेखनकलेचा आद्यपुरावा?

शहराचे नामकरण 

या नव्याने उघडकीस आलेल्या स्थळाचे नाव जानेवारी महिन्यात ‘मोरोधरो’ असे ठेवण्यात आले. हा गुजराती शब्द असून कमी खारट आणि पिण्यायोग्य पाण्यासाठी हा शब्द वापरला जातो. या ठिकाणाहूनही अनेक सिंधूकालीन मातीची भांडी मिळाली आहेत. त्यांचे स्वरूप ढोलावीरा येथे सापडलेल्या भांड्यांसारखेच आहे. प्रथमदर्शी या स्थळावर सापडलेले अवशेष ही वस्ती प्रगत (मॅच्युअर: २,६००-१,९००) ते ऱ्हास (लेट: १,९००-१,३००) या कालखंडातील असावी असे सुचवितात. सविस्तर उत्खननातून अनेक गोष्टी स्पष्ट होऊ शकतात असेही यादव नमूद करतात. यादव यांनी म्हटल्याप्रमाणे ढोलावीरा आणि  मोरोधरो ही दोन्ही स्थळे समुद्राजवळ आहेत. त्यामुळे तत्कालीन व्यापारात या स्थळाने महत्त्वाची भूमिका बजावली असणार. १९६७-७८ या कालखंडात पुरातत्वशास्त्रज्ञ जे.पी.जोशी यांनी या भागात सर्वेक्षण केले होते. त्यांनी या ठिकाणी सिंधू संस्कृतीशी संबंधित पुरावे असल्याचे नमूद केले होते. परंतु त्यानंतर काही ठोस पुरावे सापडले नाही. १९८९-२००५ या दरम्यान धोलावीराचे उत्खनन झाले. तज्ज्ञांनी त्या कालखंडात या स्थळाला भेट दिली होती, परंतु त्यानंतर फारसे काही झाले नाही. परंतु ग्रामस्थांच्या सोन्याच्या शोधाने इतिहासातील गाडला गेलेला खजिना जगासमोर आला हे निश्चित. या नव्याने समोर आलेल्या पुरातत्वीय स्थळावर भविष्यात सखोल संशोधन आणि उत्खनन होण्याची प्रतीक्षा आहे. त्याच पार्श्वभूमीवर मोरोधरोचा इतिहास सांगणाऱ्या ढोलावीरा या स्थळाविषयी जाणून घेणे समयोचित ठरणारे आहे. 

ढोलावीरा 

हडप्पाकालीन तटबंदीयुक्त शहर ढोलावीरा हे शहर कच्छ जिल्ह्यातील ढोलावीरा गावानजीक एका टेकडीवर आहे, ढोलावीरा या गावामुळे हे प्राचीन शहर त्याच नावाने ओळखले गेले, १९६८ मध्ये पुरातत्व अभ्यासक जगतपती जोशी यांनी या शहराचा शोध लावला. पुरातत्व अभ्यासक  रवींद्र सिंग बिश्त यांच्या देखरेखीखाली १९८९ ते २००५ या कालखंडा दरम्यान या जागेच्या उत्खननात प्राचीन शहराचा उलगडा झाला, हे सिंधू संस्कृतीचे प्रसिद्ध शहर असून इसवी सन पूर्व १५०० मध्ये या शहराचा ऱ्हास झाला होता.

अधिक वाचा: सिंधू लिपीचा द्रविडीयन लिपीशी संबंध आहे का? काय सांगते नवीन संशोधन?

ढोलावीरा (Photo : Twitter/Narendra Modi)

या शहराची वैशिष्ट्ये

मोहेन-जो-दारो, पाकिस्तानातील गणवेरीवाला आणि हडप्पा, भारताच्या हरियाणातील राखीगढी नंतर ढोलावीरा हे सिंधू संस्कृतीचे पाचवे मोठे महानगर आहे. इतर अनेक हडप्पा स्थळांमध्ये मातीच्या विटांचेच बांधकाम आढळते, तर या महानगरात वाळू किंवा चुनखडीपासून तयार केलेल्या भिंती असून नगर रचना तटबंदी, मिडल टाऊन, लोअर टाऊन या तीन भागात विभागली गेली आहे. पुरातज्ज्ञ बिश्त यांनी पाण्याचे साठे, बाह्य तटबंदी, दोन बहुउद्देशीय मैदाने (त्यांपैकी एक उत्सवासाठी, तर दुसरे बाजारपेठ म्हणून वापरले जात असे) , वेगळ्या रचनेचे नऊ दरवाजे, आणि बौद्ध स्तूप सारख्या अर्धगोलाकार संरचना इत्यादी काही खास वैशिष्ट्ये नमूद केली आहेत. ते म्हणतात की बौद्ध स्तूपांचा उगम ढोलावीरा येथील स्मारकांमध्ये आढळतो. या स्तूप सारख्या अर्धगोलाकार संरचनेत मानवाचे कोणतेही मृत अवशेष सापडलेले नाहीत. 

ऱ्हास 

ढोलावीरा येथे तयार करण्यात आलेले मणी मेसोपोटेमियाच्या शाही थडग्यांमध्ये सापडले आहेत. यावरूनच मेसोपोटेमिया आणि सिंधू संस्कृती यांच्यात व्यापारी संबंध असल्याचे स्पष्ट होते. किंबहुना बिश्त हे ढोलावीराच्या ऱ्हासाचा संबध मेसोपोटेमियाच्या ऱ्हासाशी जोडतात. त्यांच्या मते हडप्पा संस्कृतीचे लोक सागरी व्यापारात अग्रगण्य होते. मेसोपोटेमिया त्यांची महत्त्वाची बाजारपेठ होती. मेसोपोटेमियाच्या ऱ्हासानंतर ढोलावीराची अर्थव्यवस्था ढासळल्याचे दिसते. त्यामुळे स्थानिक खाणकाम, उत्पादन, विपणन आणि निर्यात व्यवसायांवर परिणाम झाला. ते पुढे म्हणतात इसवी सन पूर्व २००० पासून ढोलावीरा हवामान बदल तसेच सरस्वती सारख्या नद्या कोरड्या पडल्यामुळे भीषण दुष्काळाला सामोऱ्या गेल्या. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे लोक गंगेच्या खोऱ्याकडे किंवा दक्षिण गुजरातच्या दिशेने आणि पुढे महाराष्ट्रात स्थलांतर करू लागले. बिश्त म्हणतात, “कधीकाळी समुद्राने वेढलेल्या या भागाचे रूपांतर चिखलात झाले”.

ढोलावीरा (Photo : Twitter/Narendra Modi)

ढोलावीरा (Photo : Twitter/Narendra Modi)

अधिक वाचा: प्राचीन भारताची सिंधू संस्कृती निरक्षर होती का?

गुजरातमधील इतर हडप्पाकालीन स्थळे 

अहमदाबाद जिल्ह्यातील ढोलका तालुक्यात साबरमतीच्या काठावर सारगवाला गावातील लोथल हे ठिकाण गुजरातमधील सिंधू संस्कृतीच्या स्थळांपैकी सर्वात प्राचीन स्थळ आहे. १९५५ ते १९६० या कालखंडादरम्यान या स्थळावर उत्खनन झाले. हे प्राचीन बंदर असून या स्थळावर मातीच्या विटांनी तयार केलेल्या रचना होत्या. लोथल येथील स्मशानभूमीतून २१ मानवी सांगाडे सापडले. तांब्याची भांडी तयार करण्याच्या फाऊंड्रीही सापडल्या. घटनास्थळावरून अर्ध-मौल्यवान दगड, सोने इत्यादींचे दागिनेही सापडले आहेत. लोथल व्यतिरिक्त, सुरेंद्रनगर जिल्ह्यातील भादर नदीच्या काठी असलेले रंगपूर हे उत्खनन झालेले राज्यातील पहिले हडप्पा ठिकाण होते. राजकोट जिल्ह्यातील रोजडी, गीर सोमनाथ जिल्ह्यातील वेरावळजवळील प्रभास, जामनगरमधील लखाबावल आणि कच्छमधील भुज तालुक्यातील देशलपार ही राज्यातील इतर हडप्पा ठिकाणे आहेत.

ढोलावीरा (Photo : Twitter/Narendra Modi)

ढोलावीरा (Photo : Twitter/Narendra Modi)

संवर्धन

ढोलावीरा हे जागतिक वारसा स्थळ म्हणून UNESCO कडून नोंदविण्यात आले आहे. UNESCO ने ढोलावीराला दक्षिण आशियातील सर्वात उल्लेखनीय आणि संरक्षित नागरी वसाहतींपैकी एक म्हणून संबोधले आहे.  म्हणूनच या ठिकाणी उत्खनन झाल्यापासून एएसआयने येथे एक संग्रहालय विकसित केले आहे. सुमारे २००० लोकसंख्या असलेले ढोलावीरा हे गाव सध्या या स्थळाजवळची मानवी वस्ती आहे. प्राचीन शहराजवळ एक जीवाश्म उद्यान देखील आहे जेथे लाकडाचे जीवाश्म जतन केले जातात.