How the Dogra Conquest Made Ladakh Part of India: तिबेटी सेनापती रागाशाने श्वास रोखून धरला, कारण धारदार तलवारीचं पातं त्याच्या डोळ्यासमोर होतं. इ.स. १८४२ च्या सुरुवातीच्या शरद ऋतूत चुशुलमध्ये ही घटना घडत होती. थंड हवा त्याच्या बरगड्यांना गोठवत होती, थंडी असूनही त्याच्या कपाळावरून वाहणारा घाम… बर्फ आणि चिखलाच्या थरात मिसळत होता. बाहेर, हाडं गोठवणारा वारा लांडग्यांसारखा डरकाळ्या फोडत होता आणि त्या आवाजात पँगाँग तलावाच्या शांत जलतरंगांची सुरेल लय दडपली जात होती… डोग्रा सैन्याचा सेनापती दिवाण हरिचंद, रागाशाकडे सूडाने पेटलेल्या नजरेने पाहत उभा होता. झोप न लागल्याने लालबुंद झालेले त्याचे डोळे संतापाने चमकत होते. त्याने तलवार उपसली, ती उंच धरली आणि तिच्या मुठीवरील मोत्यांचे कण सूर्यकिरणांत चमकू लागले…
रागाशाने डोळे मिटले, तलवारीचा वार झेलण्यासाठी स्वतःला तयार केले. त्याच्या मनात डोग्रा सेनापती जोरावरसिंह काहलुरियाची आठवण जागती होती, ज्याचे भविष्य अजूनही अनिश्चित होते. परंतु, १९व्या शतकातील ही घटना लडाखच्या भविष्याला आकार देणारी ठरली आणि बौद्ध साम्राज्य भारताचा भाग कसा झाला याची कहाणी सांगणारी ठरली.
हेही वाचा
शंभराहून अधिक वर्षांनंतर, या आठवड्याच्या सुरुवातीला लडाखची राजधानी लेह येथे आंदोलन उसळले. केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा देण्यात होत असलेल्या विलंबामुळे आणि सहाव्या अनुसूचित (Sixth Schedule) समावेश करण्याच्या मागणीमुळे हे आंदोलन पेटलं. ही मागणी पूर्ण झाली असती तर स्थानिक आदिवासी समाजांना अधिक स्वायत्तता आणि संरक्षण मिळालं असतं. तरुणांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. या असंतोषाने हिंसक वळण घेतलं आणि लेहमध्ये उसळलेल्या आंदोलनात चार जणांचा बळी गेला. लडाखमधील या घडामोडींनी पुन्हा एकदा भूतकाळाकडे पाहणं आवश्यक ठरलं… हे साम्राज्य भारताचा भाग कसं झालं, जम्मूच्या डोग्रा फौजांनी ते आपल्या राज्यात कसं सामील करून घेतलं आणि जनरल जोरावरसिंह व त्यांच्या सैनिकांनी या कार्यासाठी कशा प्रकारे लढा देऊन प्राणार्पण केलं, हे या निमित्ताने जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
लडाख : मरयूल वा हिमभूमी
जुलै-ऑगस्ट १८४२ मध्ये, तकलाकोट तळावरून आलेल्या तातडीच्या आर्त हाकेला प्रतिसाद देत, डोग्रा सैन्याचा सेनापती दिवाण हरिचंद ३,००० सैनिकांच्या फौजेसह लडाखमध्ये दाखल झाला. हिमालयाच्या सावलीत विसावलेलं एक साम्राज्य म्हणजे लडाख. जिथे डोंगरशिखरं जणू आकाशाला कवटाळत होती. आज तो भारताचा अविभाज्य भाग आहे. इतिहासात या प्रदेशाला मरयूल (लाल भूमी) आणि खा-पन-चा (हिमभूमी) अशी विविध नावे होती.
लडाखचा ब्राह्मण संबंध
इतिहासकार सुखदेवसिंह चरक आपल्या जनरल जोरावरसिंह (१९८३) या पुस्तकात लिहितात, “फा-हियेन (इ.स. ४१२) या प्रदेशाला ‘केई-च्छा’ म्हणतो, तर युआन-श्वांग (काही जण त्याला झुआन झांग असेही म्हणतात) (इ.स. ६४०) याला ‘मा-लो-फो’ म्हणजेच ‘हिमभूमी’ अशी उपाधी देतो.” चरक नमूद करतात की, लडाखमध्ये प्रामुख्याने तिबेटी वंशाचे बोत-पा लोक राहतात. त्यांचा धर्म तिबेटी बौद्ध असून, त्यांचं नेतृत्व लामा या विशिष्ट भिक्षु-श्रृंखलेतून केलं जात. लडाख हे नाव मूळ ‘ब्राह्मण’ या शब्दावरून निर्माण झालं असून, प्रथम ब्लाह्मा आणि नंतर लामा अशा रुपांत त्याचा प्रवास झाल्याचं चरक नमूद करतात
नैसर्गिक किल्लाच!
शतकानुशतकं लडाख ही विविध संस्कृतींच्या संगमाची भूमी राहिली. यारकंद, काश्गर आणि ल्हासाहून येणाऱ्या कारवाँनी हिमालयातील खिंडींमधून या भूमीला व्यापारी मार्ग म्हणून वापरलं. उंच कड्यावर वसलेल्या मठांनी तिबेटी बौद्ध धर्माच्या स्तोत्रांचं व शहाणपणाचं रक्षण केलं. दऱ्याखोऱ्यांत पश्मिना लोकरीच्या बदल्यात मीठ, रेशीम आणि फिरोझा यांची देवाणघेवाण होत राहिली. १०,००० ते १८,००० फूट उंचीवरील ट्रान्स-हिमालयीन मैदानांवर वसलेलं लडाख हे नैसर्गिक किल्ल्यासारखं होतं. झोजिला (११,५७५ फूट) आणि चांगला (१७,५८६ फूट) यांसारख्या खिंडी मृत्यूचे सापळे म्हणून कुप्रसिद्धी होत्या.
बर्फ व उपासमारी
तिबेटी पठार आणि सिंधू नदीच्या मैदानांदरम्यान असलेलं लडाख सतत सामर्थ्यवान साम्राज्यांच्या नजरेत होतं, पण त्याचा कठोर भूभागच त्याचा सर्वात मोठा संरक्षक ठरला. लेहमधील रक्षणकर्त्यांनी आक्रमकांना परतवून लावलं; बर्फ आणि उपासमारीने अनेक लष्करांचा पराभव केला. इ.स. १८३४ मध्ये, दक्षिणेकडून एक वादळ उठल, जे या आकाशाला भिडलेल्या भूमीचं भविष्य कायमचं बदलून टाकणार होतं.
जम्मूच्या डोग्रा राजाला लडाख जिंकायचं का होतं?
जम्मूचा डोग्रा राजा गुलाबसिंह मरयूल (लाल भूमी) जिंकण्यास कटिबद्ध होता. इतिहासकार आजही गुलाबसिंहाच्या महत्त्वाकांक्षेच्या मुद्द्यांवर वाद घालत असतात. बहुतांशांचे मत आहे की, खालसा साम्राज्याचा मांडलिक असलेला हा राजा तिबेटी पश्मिना व्यापारावर वर्चस्व प्रस्थापित करू इच्छित होता. तर काहींचं मत असं आहे की, त्याचं ध्येय अधिक व्यापक होतं. नेपाळ आणि लडाख यांना जोडणारा भू-मार्ग तयार करून शीख-गोरखा युती निर्माण करणं, जी खालसा साम्राज्याच्या दक्षिणेकडे मुळं रोवून बसलेल्या इंग्रजांविरुद्ध उभी राहील. या स्वप्नपूर्तीसाठी गुलाबसिंहाने किश्तवारचा वजीर जोरावरसिंह काहलुरियाला लडाख जिंकण्याची जबाबदारी सोपवली.
लडाख: अजिंक्य दुर्गावर पहिलं आक्रमण
जोरावरसिंहकडे लडाखच्या संरक्षकभिंती भेदण्याची इच्छाशक्ती आणि साधनं होती. त्याच्या मोहिमेपूर्वी लडाख अशा शत्रूला कधीच सामोरे गेलेले नव्हते. मुघल साम्राज्याचं लक्ष मैदानातल्या मोहिमांवर होतं; हिमालयीन डोंगरदऱ्यांमध्ये लढण्यासाठी त्यांच्याकडे आवश्यक यंत्रणा नव्हती. रणजितसिंहाच्या नेतृत्त्वाखालील शीख साम्राज्य पंजाब व अफगाण युद्धात गुंतलेलं होतं; लडाखकडून मिळणारा कर पुरेसा होता. मध्य आशियातील खानते कधीतरी दरोडे घालायचे, पण सातत्याने आक्रमण करण्याची महत्त्वाकांक्षा त्यांच्यात नव्हती. “जोरावरसिंहाला ठाऊक होतं की उ-त्संग (पश्चिम तिबेट) संपूर्ण तिबेटशी मायूम खिंडीद्वारे जोडलेलं आहे. त्यामुळे त्याची योजना होती की, शत्रूच्या भूमीत झपाट्याने प्रवेश करून, हिवाळ्याआधीच खिंड जिंकून, सैन्यशक्ती वाढवणं आणि उन्हाळ्यात नव्या मोहिमेसाठी सज्ज होणं,” असं मेजर जनरल जी.डी. बक्षी (नि.) यांनी आपल्या फूटप्रिंट्स इन द स्नो (२००२) या पुस्तकात लिहिलं आहे.
जोरावरसिंहाने डोग्रा राजासाठी प्रथम जिंकलेलं लडाख
- दरम्यान, लडाखचा राजा त्शे-दबांग नामग्याल लेहच्या राजवाड्यावर निश्चिंत बसला होता. परंतु त्याचं प्राचीन राज्य विदीर्ण झालं होतं. सामंत आपसांत विभागलेले होते आणि त्याचं सैन्य आधुनिक तोफा आणि दारुगोळ्याने सज्ज अशा शत्रूशी लढण्यास अपुरं ठरत होतं.
- इ.स. १८३४ च्या शरद ऋतूत क्षितिजावर जोरावरसिंहाचे ध्वज दिसू लागले. डोग्रा सैन्याने कठीण डोंगरी खिंडींमधून वाट काढली; त्यांच्या तोफा बर्फाच्छादित दगडांवरून, जीव तोडून झटणाऱ्या सैनिकांच्या खांद्यावर, पुढे सरकत होत्या.
- लेहचे मातीचे भक्कम किल्ले, त्यांनी इतिहासात अनेक आघातांना तोंड दिले होते, तेही डोग्रा तोफखान्याच्या तडाख्याने कोसळले.
- पुढील आठ वर्षं डोग्रांनी लेहमधून लडाखवर राज्य केलं. लडाखचं सार्वभौम साम्राज्य संपलं आणि ते जम्मूच्या वाढत्या सामर्थ्याशी जोडलेलं केवळ एक प्रांत झालं.
- परंतु जोरावरसिंहाची महत्त्वाकांक्षा इथेच थांबली नाही. १८४१ मध्ये त्याने पश्चिम तिबेटवर आक्रमण करून मानसरोवर तलावासह इतर पवित्र प्रदेश जिंकले. मात्र, चिंग (Qing) साम्राज्याने तिथे आपली फौज पाठवली. १२ डिसेंबर १८४१ रोजी जोरावरसिंह पकडले गेले आणि तो-यो येथे त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. त्यांचं मस्तक विजयाची खूण म्हणून प्रदर्शित करण्यात आलं; पण नंतर त्यांच्या शौर्याला सन्मान देत त्यांची समाधी बांधली गेली आणि ते अमर झाले.
चुशुलची लढाई : हरिचंद आणि सूडाची तलवार
- जोरावरसिंह युद्धात मारला गेल्यानंतर तिबेटी सैन्य पश्चिमेकडे लडाख परत मिळवण्यासाठी आणि डोग्रा सामर्थ्याचा पाया उखडण्यासाठी सरसावलं. रुतोक आणि गार्टोकहून निघालेल्या त्यांच्या फौजा लेहकडे सरकत होत्या.
- जम्मूचा डोग्रा राजा गुलाबसिंह यांनी तातडीने आपला पुतण्या, दिवाण हरिचंद, याला ताज्या फौजेसह पाठवलं. डोंगराळ प्रदेशात लढाईचा प्रचंड अनुभव असलेलं पायदळ आणि घोडदळ रवाना केलं.
- १४,००० फूट उंचीवर वसलेली, वाऱ्याने झपाटलेली चुशुलची दरी निर्णायक रणांगण ठरली. जो ती जिंकणार, त्याच्या हाती लेहकडे जाणाऱ्या मार्गाचं नियंत्रण असणार होतं.
- १८४२ साली अनेक आठवडे डोग्रा आणि सायनो-तिबेटी सैन्यात धाडसी हल्ले होत राहिले. अखेर युद्धाची दिशा हरिचंदाच्या युक्तीने बदलली. त्याने लडाखच्या भौगोलिक रचनेचा फायदा घेत, तिबेटी छावणी खालच्या पातळीवर असल्याने, खाली धरण बांधण्याचा आदेश दिला.
- इतिहासकार सुखदेवसिंह चरक लिहितात, “धरण उभारल्यानंतर तीन दिवसांत तिबेटी खड्डेसदृश भाग पाण्याखाली गेला आणि त्यांना किल्लेबंद तळ सोडावा लागला. त्यानंतर बाहेर मोकळ्या मैदानावर ते सज्ज डोग्रांसमोर टिकू शकले नाहीत. तिबेटी माघारी वळताच वजीर रतनू आणि दिवाण हरिचंद यांनी हल्ले चढवले. अनेक तिबेटी सैनिक भीतीने पळून गेले, तर काही पकडले गेले.”
- ब्रिटिशांच्या गुप्तवार्ता नोंदींनुसार, या लढाईत तिबेटी सेनापती रागाशा यांच्यासह अनेक अधिकारी डोग्रांच्या ताब्यात आले.
चुशुलचा तह : युद्ध आणि शांती
- १७ सप्टेंबर १८४२ रोजी चुशुल तहावर स्वाक्षऱ्या झाल्या. या तहात लडाखच्या ऐतिहासिक सीमांची पुनर्निश्चिती करण्यात आली आणि प्राचीन व्यापारी मार्गांवर शांतता राखण्याचं आश्वासन देण्यात आलं.
- गुलाबनामा, जम्मूचा इतिहास, यामध्ये नमूद आहे की, तिबेटींनी लडाखच्या निश्चित सीमांचा स्वीकार केला आणि डोग्रा सार्वभौमत्वाला कधीही आव्हान देणार नाही असं मान्य केलं.
- इतिहासकार सुखदेवसिंह चरक लिहितात, “गुलाबसिंह आणि त्याच्या माध्यमातून लाहोर दरबाराने पश्चिम तिबेटवरील सर्व दावे सोडले. जुन्या निश्चित सीमांची पुनर्निश्चिती झाली आणि दोन्ही पक्षांनी त्यांचा आदर करण्यास मान्यता दिली. डोग्रांविरुद्ध कटकारस्थान केले नाही तर लडाखच्या राजास लडाखमध्ये राहण्याची परवानगी देण्यात येईल, असे ठरले.”
लडाख भारताचा अविभाज्य भाग कसा झाला?
- १८४६ मध्ये पहिल्या आंग्ल-शीख युद्धानंतर ब्रिटिशांनी शीख साम्राज्य आपल्या ताब्यात घेतलं. शीखांना नुकसानभरपाई देता न आल्यामुळे त्यांनी जम्मू-काश्मीर ब्रिटिशांच्या स्वाधीन केलं. त्यानंतर ब्रिटिशांनी जम्मू-काश्मीर गुलाबसिंहाला विकलं आणि अशा रीतीने लडाखची जागा या संस्थानिक राज्यात पक्की झाली.
- शंभर वर्षांनंतर, १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर, महाराजा हरिसिंहांच्या स्वाक्षरीने लडाखचं भारतात औपचारिक विलिनीकरण झालं. हरिसिंह हे गुलाबसिंहांचे पणतू होते. गुलाबसिंहांनी जोरावरसिंहाला लडाख जिंकण्याची जबाबदारी दिली होती.
- हिमालयाच्या कुशीत, जिथे वारा अजूनही जोरावरसिंहाची गाथा गातो, तिथेच इतिहास जिवंत आहे. लडाख भारताच्या भूगोलाचा अविभाज्य भाग आहे. एक अशी कहाणी, जी महत्त्वाकांक्षा, संघर्ष आणि जनतेच्या व नेत्यांच्या अदम्य इच्छाशक्तीने आकारास आली आणि घडलीही.