Language conflict lessons from Bangladesh: सध्या मराठी विरुद्ध हिंदी असा संघर्ष निर्माण झालेला आहे. देश एक आहे, त्यामुळे महाराष्ट्रात हिंदी हीच भाषा बोलली जाणार असाच काहीसा पवित्रा इतर भाषकांनी घेतल्याचे चित्र आहे. परंतु, एखादी भाषा ही फक्त संवादाचे साधन नसते, तर तिच्या माध्यमातून त्या भाषेशी संबंधित संस्कृतीही जपली जाते. एखाद्या स्थानिक भाषेला नाकारणे म्हणजे ती भाषा ज्या प्रांतात बोलली जाते त्या भागातील संस्कृतीला नाकारणेच असते. तिथल्या माणसांची ओळख मुळापासून पुसण्याचाच हा प्रकार आहे. मराठी आणि हिंदी किंवा कन्नड आणि हिंदी असा वाद आज जोर धरू लागलाय; परंतु, ५४ वर्षांपूर्वी मातृभाषा नाकारल्यामुळे पाकिस्तानची फाळणी झाली होती. त्यानंतर जगाच्या इतिहासात ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ साजरा करण्यास सुरुवात झाली, हा आधुनिक इतिहास आहे.
१९४७ साली भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची स्थापना झाली. त्यावेळी पाकिस्तान हा पश्चिम पाकिस्तान (आजचा पाकिस्तान) आणि सुमारे १६०० किमी दूर असलेला पूर्व पाकिस्तान (आजचा बांगलादेश) अशा दोन भौगोलिक भागांत विभागलेला होता. धर्म एक असला तरी या दोन भागांत भाषा, संस्कृती, परंपरा, सामाजिक रचना यामध्ये मूलभूत फरक होते. तरीही नव्याने स्थापन झालेल्या पाकिस्तान सरकारने दोन्ही भागांमध्ये एकसंध राष्ट्रवाद राबवण्याचा प्रयत्न केला आणि याची किंमत त्यांना बांगलादेश गमावून मोजावी लागली.
भाषेवरून निर्माण झालेला संघर्ष
पाकिस्तानच्या स्थापनेनंतर काही महिन्यांतच असंतोषाची पहिली ठिणगी पडली ती म्हणजे भाषेच्या मुद्द्यावरून. १९४८ साली पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना ढाक्याच्या दौऱ्यावर असताना म्हणाले की, “उर्दू आणि फक्त उर्दूच पाकिस्तानची एकमेव राष्ट्रभाषा असेल.” ही घोषणा पूर्व पाकिस्तानातील जनतेसाठी धक्कादायक ठरली. या भागात ७५% जनता बंगाली भाषक असताना, त्यांच्यावर उर्दू लादली जात होती. बंगाली ही केवळ भाषा नव्हती, तर ती भारताच्या पूर्वेकडच्या भागातील स्थानिक संस्कृतीचं प्रतिनिधित्त्व करत होती. म्हणूनच या विरोधात ढाका विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी १९५२ साली आंदोलन पुकारले. २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या निदर्शनांदरम्यान पोलिसांनी गोळीबार केला आणि अनेक विद्यार्थी हुतात्मा झाले. यामुळे बंगाली भाषेचा अपमान हा फक्त भाषिक प्रश्न न राहता आत्मसन्मानाचा आणि अस्मितेचा संघर्ष झाला.
सांस्कृतिक आणि आर्थिक पातळीवर दुजाभाव
- भाषेवरून सुरू झालेला संघर्ष पुढे इतर क्षेत्रांतही वाढत गेला.
- पूर्व पाकिस्तानचा संपूर्ण पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठा वाटा होता.
- मुख्यतः ज्यूट आणि तांदळाच्या उत्पादनातून अधिकचा नफा होत होता.
- तरीही सरकारचा आर्थिक कल पश्चिम पाकिस्तानकडे जास्त होता.
- पूर्व पाकिस्तानला दुय्यम दर्जाची वागणूक मिळत होती.
- गुंतवणूक पश्चिम पाकिस्तानमध्येच केंद्रित होती.
- पूर्व पाकिस्तानकडे राजकीय प्रतिनिधित्व फारच मर्यादित होतं.
- लष्करी अधिकारही संपूर्णतः पश्चिम पाकिस्तानकडे होते.
- मीडिया, शिक्षण, प्रशासकीय पदे इथे बंगाली भाषकांचा समावेश नगण्य होता.
- या सगळ्याचा परिणाम म्हणजे सामान्य बंगाली माणसामध्ये असंतोष वाढू लागला. ‘आपण या देशात दुसऱ्या दर्जाचे नागरिक आहोत’ ही भावना खोलवर रुजत गेली.
परिणाम
- या आंदोलनामुळे १९५७ मध्ये पाकिस्तान सरकारने बंगालीला उर्दूबरोबर राष्ट्रभाषेचा दर्जा दिला.
- परंतु, पश्चिम पाकिस्तानकडून होणाऱ्या अन्यायामुळे हीच चळवळ पुढे जाऊन बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्याचं कारण ठरली.
१९७० ची निवडणूक आणि निर्णायक वळण
१९७० साली पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. शेख मुजीबुर रहमान यांच्या नेतृत्वाखालील ‘अवामी लीग’ पक्षाने एकट्यानेच १६० जागा जिंकल्या, म्हणजेच पूर्ण बहुमत मिळवलं. परंतु, पश्चिम पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांनी (अय्युब खान, याह्या खान, झुल्फीकार अली भुत्तो) हे बहुमत स्वीकारण्यास नकार दिला. मुजीबुर रहमान यांना पाकिस्तानचा पंतप्रधान होऊ दिलं नाही. ही गोष्ट लोकशाहीवरचा घाला होता आणि हीच गोष्ट स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी ठरली.
ऑपरेशन सर्चलाईट आणि नरसंहार
२५ मार्च १९७१ रोजी पाकिस्तान सरकारने ‘ऑपरेशन सर्चलाईट’ राबवत ढाका आणि आजूबाजूच्या भागांमध्ये क्रूर लष्करी कारवाई केली. हजारो नागरिकांची हत्या करण्यात आली, अनेक महिलांवर बलात्कार करण्यात आले. बुद्धिजीवी, पत्रकार, प्राध्यापक यांना लक्ष्य करण्यात आलं. या हल्ल्यानंतर २६ मार्च १९७१ रोजी बांगलादेशने स्वातंत्र्याची घोषणा केली.
भारताची भूमिका आणि निर्णायक युद्ध
या अत्याचारामुळे लाखो निर्वासित भारतात आले. भारतावर मानवी, सामाजिक आणि आर्थिक ताण वाढला. त्याच वेळी पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ला केला. त्यामुळे भारताने पाकिस्तानविरोधात युद्ध पुकारलं. १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी जनरल आमिर अब्दुल्ला खान नियाझी यांनी ढाक्यात भारतीय जनरल जगजीतसिंह अरोरा यांच्यासमोर शरणागती पत्करली. हजारो पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण केलं आणि बांगलादेश एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून जन्माला आला.
भाषेचा अपमान आणि देशद्रोह यात फरक
बांगलादेशचा जन्म हे एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचं उदाहरण आहे की, भाषेच्या, संस्कृतीच्या आणि अस्मितेच्या अपमानामुळेही देश विभागले जाऊ शकतात. पाकिस्तानने केवळ भाषिक स्वातंत्र्य नाकारलं नाही, तर लोकशाही, मानवी हक्क आणि आर्थिक न्याय यांनाही पायदळी तुडवलं. त्याचा परिणाम म्हणजे एका नव्या राष्ट्राची निर्मिती.
म्हणून आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन…
त्यानंतर बंगाली विद्यार्थ्यांच्या बलिदानाची आठवण आणि भाषेच्या अस्मितेचा जागर म्हणून २१ फेब्रुवारी हा दिवस जगभर ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ म्हणून ओळखला जातो. म्हणूनच, मातृभाषेचा सन्मान हा केवळ भाषेचा प्रश्न नसून, ती त्या समाजाच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा केंद्रबिंदू असते. एखाद्या भाषेला दडपून एकसंघ राष्ट्रवाद लादणं धोकादायक ठरू शकतं.