अॅमेझॉनने १४ हजार कर्मचाऱ्यांना मंगळवारी अचानक काढले असून आणखी १६ हजार जणांना काढण्याचे जाहीर केले आहे. जागतिक अस्थिरता आणि ‘एआय’च्या अंतर्भावामुळे ही नोकरकपात सुरू असली तरी, बाजारात मंदीचे वातावरण नसून रोजगाराच्या संधी कायम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सहा महिन्यांत हजारोंची नोकरकपात?

२०२५-२६ हे वर्ष नोकरकपातीचे वर्ष ठरण्याची शक्यता आहे. या आर्थिक वर्षात विविध कंपन्यांनी आतापर्यंत एक लाख ६० हजार कर्मचारी कपात केली आहे. यात ‘यूपीएस’ आणि अॅमेझॉन या दोन कंपन्या आघाडीवर आहेत. यूपीएसने मंगळवारी ३४ हजार कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केल्याचे जाहीर करतानाच आणखी १४ हजार कर्मचाऱ्यांवर ‘कुऱ्हाड’ चालवण्याचे संकेत दिले आहेत. अॅमेझॉनचाही एकूण नोकरकपातीचा आकडा ३० हजारांवर जाण्याची शक्यता आहे. संगणकीय क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या इंटेलने गेल्या काही महिन्यांत २० हजार जणांना कामावरून काढले. दोन दिवसांपूर्वी ‘नेस्ले’ कंपनीने ११ हजार कर्मचारी कमी केले तर ‘अॅक्सेंचर’नेही तितकेच मनुष्यबळ हटवण्याचे जाहीर केले. याखेरीज मायक्रोसॉफ्ट, फोर्ड, विप्रो, इन्फोसिस, टीसीएस अशा मोठमोठ्या कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांत कर्मचारी भार कमी केला आहे.

जम्बोकपातीची कारणे काय?

गाझामधील संघर्ष, रशिया-युक्रेन युद्ध, अमेरिकेचे विविध देशांवरील आयात निर्बंध, त्याला अन्य देशांकडून मिळणारे प्रत्युत्तर, आखाती देशातील चिघळत असलेली परिस्थिती यांमुळे जागतिक अस्थैर्य वाढले आहे. याचा परिणाम व्यापारावर होत असून त्यातून आर्थिक नुकसान होण्याच्या धास्तीने कंपन्यांकडून मनुष्यबळ कपातीची पावले उचलली जात आहेत. करोनाकाळात वाढलेल्या मागणीमुळे आयटी क्षेत्रातील तसेच अन्य उद्योगांतील ग्राहकसेवेशी संबंधित नोकरभरतीत प्रचंड वाढ करण्यात आली होती. गेल्या तीन वर्षांत परिस्थिती पूर्वपदावर आल्यामुळे हे वाढीव मनुष्यबळ अतिरिक्त ठरू लागले आहेत. तो भार हलका करण्याचेही प्रयत्न कंपन्या करत आहेत. त्याहूनही महत्त्वाचे कारण म्हणजे ‘एआय’चा अंतर्भाव.

नोकऱ्या कापून एआयला बळ?

कृत्रीम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानाचा अंतर्भाव सर्वच क्षेत्रांत होऊ लागला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये बहुतांश कामे ‘एआय’मार्फत होऊ लागली आहेत. विशेषत: ग्राहकसेवेशी संबंधित कामे ‘एआय’मुळे अधिक प्रभावीपणे पार पाडता येऊ लागली आहेत. परिणामी या कामांसाठी नेमलेले शिक्षित अर्धकुशल मनुष्यबळ अतिरिक्त ठरू लागले आहे. त्या नोकऱ्या आता संपुष्टात येऊ लागल्या आहेत. दुसरीकडे, अद्यायावत एआय तंत्रज्ञानासाठी कंपन्यांना मोठी गुंतवणूक करावी लागत आहे. ही रक्कम उभी करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ हटवण्याकडेही कंपन्यांचा ओढा आहे.

तळातील नोकरदारांना फटका?

प्रत्येक उद्याोगक्षेत्रात सध्या ‘एआय’चा अंतर्भाव करण्याची चढाओढ सुरू आहे. या तंत्रज्ञानामुळे उत्पादकता वाढण्याच्या खात्रीने विविध कंपन्यांतील व्यवस्थापन मंडळे आणि गुंतवणूकदार यांच्याकडून ‘एआय’साठी आग्रह धरला जात आहे. ‘गार्टनर’च्या अंदाजानुसार एआयमधील जागतिक गुंतवणूक २०२५ मध्ये १.५ लाख कोटी डॉलर्सवर पोहोचली असून पुढील सहा महिन्यांत ती दोन लाख कोटी डॉलर्सवर पोहोचणार आहे. एवढ्या प्रचंड गुंतवणुकीनंतर प्रत्येक कंपनीला आर्थिक संतुलनाचे प्रयत्न करावे लागणार आहेत. याचा थेट परिणाम ‘व्हाइट कॉलर’ रोजगार रचनेतील तळाशी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर होणार आहे. सध्या ‘एआय’चा उपयोग या प्राथमिक टप्प्यावरील कामांसाठी अधिक होत असल्याने कामावरून कमी करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये ग्राहक सेवा प्रतिनिधी, कॉर्पोरेट एक्झिक्युटीव्ह, डेटा एण्ट्री ऑपरेटर आदी पदांवरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

मंदी की मनुष्यबळ पुनर्रचना?

कंपन्यांकडून इतक्या मोठ्या प्रमाणात नोकरकपात होत असली तरी, तज्ज्ञांच्या मते ही परिस्थिती मंदीजन्य नाही. उद्याोगक्षेत्रात ‘एआय’चा समावेश करण्याचे प्रमाण सध्या दहा टक्के असून ते भविष्यात वाढून ५० टक्क्यांवर पोहोचेल. त्यामुळे येत्या काळात आणखी नोकरकपात होईल. मात्र, त्याच वेळी अद्यायावत एआय हाताळण्यासाठी त्यावर नियंत्रण, देखरेख ठेवण्यासाठी कुशल मनुष्यबळाची निर्मितीही मोठ्या प्रमाणात करावी लागेल. त्यामुळे सध्याच्या नोकरकपातीकडे मनुष्यबळ फेररचनेची प्रक्रिया म्हणूनही पाहिले जात आहे. जागतिक बँकेने दक्षिण आशियातील रोजगारासंदर्भात अलिकडेच प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार, चॅटजीपीटीच्या वाढत्या प्रभावामुळे २० टक्के रोजगार संधी घटल्या आहेत. मात्र, त्याचवेळी ‘एआय’ कुशल मनुष्यबळाच्या वेतनात ३० टक्क्यांची वाढही नोंदवण्यात आली आहे.

asif.bagwan@expressindia.com