ज्ञानेश भुरे

भारतीय कुस्तीसाठी २०२३ वर्ष अडचणीचे ठरत आहे. न्याय मिळविण्यासाठी कुस्तीगीर वर्षाच्या सुरुवातीपासून रस्त्यावर उतरले. वातावरण निवळले असे वाटत असतानाच पुन्हा नव्या आक्रमकतेने कुस्तीगीर रस्त्यावर आले. या वेळी अत्यंत वाईट पद्धतीने त्यांना रोखण्यात आले. त्यानंतर कुस्तीगीर आपली आंतरराष्ट्रीय पदके नदीत विसर्जित करण्याच्या निर्णयापर्यंत आले. तेव्हा विख्यात बॉक्सर मुहम्मद अलीने वर्णद्वेषाविरोधात आपले पदक पाण्यात फेकून दिलेल्या घटनेची आठवण झाली. यानिमित्ताने कुस्तीगिरांच्या सुरू असलेल्या आंदोलनाचा घेतलेला आढावा…

मुहम्मद अलींवर अशी वेळ का आली होती?

बॉक्सर मुहम्मद अली यांनी १९६० ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तेव्हा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकल्याने अमेरिकेत पराकोटीला गेलेला वर्णद्वेष सुधारेल, असे वाटले होते. परंतु, प्रत्यक्षात मायदेशात परतल्यावर अली यांना वेगळाच अनुभव आला. एका रेस्टॉरंटमध्ये कृष्णवर्णीय म्हणून त्यांना वाईट वागणूक मिळाली. याचा मुहम्मद अलींना इतका राग आला की त्यांनी ऑलिम्पिक सुवर्णपदक ओहायो नदीत फेकून दिले होते, असे सांगितले जाते. पुढे १९९६मध्ये अटलांटा ऑलिम्पिकमध्ये मुहम्मद अलींना त्या पदकाची प्रतिकृती सन्मानपूर्वक बहाल करण्यात आली.

भारतीय कुस्तीगिरांच्या आंदोलनाची नेमकी स्थिती काय?

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषणशरण सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचा आरोप करून भारतीय कुस्तीगीर सर्वप्रथम रस्त्यावर उतरले.  तेव्हा सरकारने या प्रकरणात चौकशी समिती नियुक्त केली. मात्र, समितीचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतरही चौकशी अहवाल सार्वजनिक झाला नाही. यामुळे कुस्तीगीर पुन्हा रस्त्यावर उतरले. या वेळी कुस्तीगिरांनी अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांच्या अटकेची मागणी केली. एका महिन्याहून अधिक काळ कुस्तीगीर याच एका मागणीसाठी जंतर मंतरवर ठिय्या देऊन होते. हळूहळू आंदोलनात राजकीय पक्ष लक्ष घालू लागले. खाप पंचायत आणि शेतकरी संघटनेने तर आंदोलनाची सूत्रेच हाती घेतली. त्यामुळे न्याय हक्कासाठी लढणाऱ्या कुस्तीगिरांचे आंदोलन त्यांचे न राहता राजकीय बनल्याचेच सध्याचे चित्र आहे.

पदकांचे विसर्जन आंदोलनाचा नवा मार्ग आहे का?

ब्रिजभूषणशरण यांच्याविरोधात रस्त्यावर उतरूनही कुस्तीगिरांच्या हाती काही लागले नाही. उलट त्यांच्या पदरी अवहलेना आणि अपमानच अधिक आला. अत्यंत वाईट पद्धतीने आंदोलक कुस्तीगिरांना जंतर मंतरवरून हटविण्यात आले. याचा राग कुस्तीगिरांनी वेगळ्या पद्धतीने काढताना देशासाठी जिंकलेल्या पदकांचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या आंदोलनाचा हा नवा मार्ग निश्चित म्हणता येईल. पण, त्यातही भारतीय किसान संघटनेचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनीच मध्यस्थी करून कुस्तीगिरांना पदकांच्या विसर्जनाच्या निर्णयापासून रोखले. एकूणच कुस्तीगिरांच्या खांद्यावर बंदुका ठेवून त्यांचा वापर केला जात असल्याचेच संकेत यामुळे मिळाले. मात्र, यावेळी मुहम्मद अलीच्या पदक पाण्यात फेकण्याच्या कृतीची आठवण झाली. 

कुस्तीगिरांवरील कारवाईचे पडसाद काय उमटले?

न्यायासाठी लढणाऱ्या भारतीय कुस्तीगिरांचे आंदोलन रोखण्यासाठी जी काही पद्धत वापरली गेली ती निषेधार्हच होती. ज्या कुस्तीगिरांनी देशासाठी पदके मिळविली, त्याच कुस्तीगिरांना ज्या पद्धतीने फरपटत नेण्यात आले ते चीड आणणारे होते. सर्वसामान्य नागरिकांपासून विविध क्रीडा प्रकारात आदर्श असणाऱ्या प्रत्येकाने या कारवाईचा निषेध करून योग्य चर्चेने वाद मिटवता आला असता असेच सांगितले. वाद निकालात काढण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाईची गरज नव्हती, अशीच भूमिका प्रत्येकाने घेतली. जागतिक कुस्ती महासंघाने देखील आता यात लक्ष घालून कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.

जागतिक कुस्ती महासंघाची भूमिका काय राहणार?

जागतिक कुस्ती महासंघाने देखील कुस्तीगिरांना दिलेल्या वागणुकीचा निषेध केला आहे. या प्रकरणात वेळीच लक्ष घालून वाद लवकरात लवकर संपविण्याच्या सूचना जागतिक महासंघाने दिल्या आहेत. यासाठी भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका तातडीने घेण्याचे आदेशही दिले आहेत. निवडणूक प्रक्रिया वेळेत पार पाडली नाही, तर भारतीय कुस्ती महासंघ निलंबित करण्याची थेट धमकीच जागतिक महासंघाने दिली आहे.

आता नेमके काय होणार?

ब्रिजभूषणशरण सिंह यांच्या विरोधात जोपर्यंत कुस्तीगीर लढत होते तोपर्यंत सगळे ठीक चालले होते. पण, जेव्हा राजकीय पक्ष त्यांच्या पाठिंब्यासाठी आंदोलनात उतरले तेव्हा खरे तर आंदोलन कुस्तीगिरांच्या हातून निसटले आणि ते त्यांनाही समजले नाही. त्यामुळे कुस्तीगिरांचे आंदोलन न्याय हक्कापेक्षा राजकीय संघर्ष बूनन राहिले आहे. कुस्तीगीर एकटे लढत होते तेव्हा कुठेतरी सरकार लक्ष घालेल असे वाटत होते. पण, त्यांच्याकडूनही ते झाले नाही. एकूणच चुका दोन्ही बाजूने झाल्या. त्यामुळेच न्याय हक्कासाठी सुरू झालेले आंदोलन विचित्र टप्प्यावर येऊन ठेपले आहे. ज्यात कुणाच्याच हाती काही लागलेले नाही. म्हणजेच कुस्तीगिरांच्या मागणीनुसार ब्रिजभूषणशरण सिंह यांना अटक झालेली नाही आणि कुस्तीगिरांनी आंदोलन थांबवले असेही म्हणता येत नाही.