जंगलातून जाणाऱ्या रेल्वे मार्गात येणाऱ्या वन्यप्राण्यांच्या मृत्यूला रेल्वे मार्गावरील शमन उपाययोजना, रेल्वेची गती याकडे होणारे दुर्लक्ष कारणीभूत आहे. आसाम वन विभागाने उचलली तशी पावले उचलली गेली तरच हे मृत्यू थांबवता येतील.

आसाम वन विभागाने रेल्वे इंजिन का जप्त केले?

आसाममध्ये सप्टेंबर २०२० मध्ये रेल्वेच्या धडकेमुळे एक हत्तीणआणि तिच्या पिल्लाचा मृत्यू झाला. हे आसामच्या होजई जिल्ह्यातील लुमडिंग रेल्वे विभागाअंतर्गत पाथोरखोला रेल्वे स्थानकाजवळ घडले. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात आसाम वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित रेल्वे इंजिन जप्त केले. पाथोरखोला आणि लामसाखंग रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळावर दोन हत्तींचा मृत्यू झाल्याबद्दल वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ च्या अनुसूची एक (१२बी) अंतर्गत ही जप्ती करण्यात आली. त्यानंतर जनतेसाठी रेल्वेची आवश्यक सेवा सुरू करण्यासाठी ते इंजिन परत करण्यात आले. मात्र, हत्तींच्या मृत्यूचा मोबदला म्हणून १२ कोटी रुपये देण्याचे रेल्वे विभागाने मान्य केले. या प्रकरणात नंतर रेल्वेने संबंधित चालक आणि त्याच्या साहाय्यकाला निलंबित केले.

मध्य प्रदेश वन विभागही तसेच करणार?

जुलै २०२४ मध्ये मध्य प्रदेशातील रतापाणी वन्यजीव अभयारण्यातून जाणाऱ्या मध्यघाट-बुधनी रेल्वे मार्गावर वाघाच्या तीन बछड्यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. त्यातील एक बछडा जागीच मृत्युमुखी पडला, तर दोन बछडे १५ दिवसांनंतर मरण पावले. सातत्याने रेल्वेखाली येऊन होणारे वन्यप्राण्यांचे मृत्यू रोखण्यासाठी मध्य प्रदेश वन विभागानेही आसाम वन विभागाच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा निर्णय घेतला आहे. वाघाच्या तीन बछड्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेली रेल्वे जप्त करण्याचा विचार मध्य प्रदेश वन विभाग करत आहे. निर्णायक कारवाईसाठी मध्य प्रदेशातील वनाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे हा विषय लावून धरला आहे.

हेही वाचा >>> बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्यासमोर असतील ‘ही’ आव्हाने

ही जप्ती होऊ शकते का?

हत्तींप्रमाणेच वाघ हादेखील वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत अनुसूची एकमधील वन्यप्राणी आहे. त्याअंतर्गत येणाऱ्या वन्यप्राण्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार घटकांवर कारवाई करता येणे शक्य आहे. वन्यजीव क्षेत्रातून जाणाऱ्या रेल्वेकडून ठरवून दिलेले गतिनियम पाळले जात नसतील आणि त्यामुळे वन्यप्राणी मृत्युमुखी पडत असेल किंवा जखमी होत असेल तर रेल्वे व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करता येतो. त्यामुळे आसामप्रमाणेच मध्य प्रदेशातदेखील रेल्वेचालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, असे वन्यजीव अभ्यासक तसेच वन विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, मध्य प्रदेश वनाधिकाऱ्यांना या संदर्भात मध्य प्रदेश रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घ्यायची आहे. पण मध्य प्रदेश रेल्वे व्यवस्थापनाकडून त्यांना काहीही प्रतिसाद मिळालेला नाही. २०१५ पासून आतापर्यंत या ठिकाणी १५ बिबटे तसेच एक अस्वल रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडले आहे.

जंगलातून जाणाऱ्या रस्ते, रेल्वे मार्गांवर कोणती बंधने आहेत?

जंगलातून जाणाऱ्या वाहनांच्या गतीवर आहेत तशीच जंगलातून जाणाऱ्या रेल्वेच्या गतीवरही बंधने आहेत. जंगलातून किंवा जंगलालगतच्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची गती संवेदनशील ठिकाणी २० किलोमीटर प्रति तास असावी, असा नियम आहे. पण तो कुठेही पाळला जात नाही. त्याचप्रमाणे जंगलातून जाणाऱ्या रेल्वेची गती दिवसा प्रति तास ५० किलोमीटर तर रात्री प्रति तास ४० किलोमीटर असावी, असा नियम आहे. मात्र, तो पाळला जात नाही. जंगलातून जाणाऱ्या रेल्वेची गती ही ८० ते १०० किलोमीटर प्रति तास असते. रेल्वे विभागाकडून या गतीवर कधीच नियंत्रण ठेवले जात नाही. परिणामी वन्यप्राणी मृत्युमुखी पडतात. मुख्य मार्गावर रेल्वेचा वेग ताशी १३० किलोमीटरपर्यंत पोहोचला आहे. जंगलालगतच्या रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या रेल्वेचा वेग ताशी २५ ते ३० किलोमीटपर्यंत मर्यादित ठेवला तरच या घटना टाळता येतील, असे अभ्यासक सांगतात.

हेही वाचा >>> विनेश फोगट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर राजकारण का तापलंय?

वन्यप्राणी अपघाताच्या मोठ्या घटना?

नोव्हेंबर २०१३ मध्ये पश्चिम बंगालच्या चपरामरी वन्यजीव अभयारण्यातून भरधाव वेगाने गेलेल्या रेल्वेमुळे तेथील रूळ ओलांडून जात असलेल्या ४० ते ५० हत्तींच्या कळपातील दहा हत्ती जागीच मृत्युमुखी पडले. २०१८ मध्ये चंद्रपूर-गोंदिया महामार्गावर वाघाच्या सहा महिन्यांच्या तीन बछड्यांचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाला. पश्चिम बंगालमध्ये २०२३ मध्ये रेल्वे अपघातात तीन हत्ती मृत्युमुखी पडले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

rakhi.chavhan@expressindia.com