जगामध्ये असे काही भाग आहेत, की जिथे लोक दीर्घायुषी आहेत. या भागांना ‘ब्लू झोन’ म्हटले जाते. अमेरिकेतील डॅन बटनर यांनी या संकल्पनेचा विस्तार करताना सखोल संशोधन केले. पण आता लंडनमधील संशोधक सॉल जस्टिन न्यूमन यांनी या संकल्पनेला आव्हान दिले आहे. आकडेवारीनुसार जगातील दीर्घायुषी लोक जगण्यास प्रतिकूल अशी स्थिती जिथे आहे, अशा गरीब भागांत आढळून येतात असा दावा करून जन्म-मृत्यूच्या नोंदींमधील त्रुटी अनेकदा कारणीभूत असते, अशी मांडणी त्यांनी केली आहे. ‘ब्लू झोन’ संकल्पना; हे वास्तव, की मिथक आहे, याचा घेतलेला हा आढावा…

‘ब्लू झोन’ कोणते?

जगामध्ये असे काही प्रदेश आहेत, की तेथील लोक दीर्घायुषी आहेत. अगदी नव्वदी आणि शंभरीतही ते सक्रिय असतात. जपानमधील ओकिनावा, इटलीतील सार्डिनिया, कोस्टा रिकामधील निकोया, ग्रीसमधील इकारिया आणि अमेरिकेत कॅलिफोर्नियामधील लोमा लिंडा या भागांना साधारणपणे ‘ब्लू झोन’ म्हटले जाते. ही संकल्पना इतकी लोकप्रिय आहे, की यावर पुस्तके, ओटीटीवर मालिका, दीर्घायुषी होण्यासाठी इतर शहरांना ‘ब्लू झोन’ प्रमाणपत्र देण्याचे उपक्रम आदी बाबी आतापर्यंत झाल्या आहेत. वीस वर्षांपूर्वी, २००४ मध्ये ‘ब्लू झोन’ संकल्पना मांडली गेली. ‘एक्स्परिमेंटल गेरोंटोलॉजी’ या जर्नलमध्ये इटलीतील सार्डिनिया भागावर संशोधनपर लेख प्रसिद्ध झाला. बेल्जियममधील जनसांख्यिकी तज्ज्ञ मायकेल पौलेन आणि इटलीमधील भौतिकशास्त्रज्ञ गियानी पेस यांनी प्रथम ही संकल्पना मांडली. सुरुवातीला सार्डिनिया भागाचा त्यात उल्लेख केला होता. ज्या भागात दीर्घायुषी लोक अधिक राहतात, अशा ठिकाणी नकाशावर संशोधकांनी निळ्या रंगाने खुणा केल्या होत्या. त्यावरून याला ‘ब्लू झोन’ नाव मिळाले. त्यानंतरच्या वर्षात यामध्ये इतर भाग नमूद करण्यात आले. ‘नॅशनल जिओग्राफिक’मध्ये डॅन बटनर यांनी त्यावर एक वृत्त प्रसिद्ध केले. या संकल्पनेचा विस्तार बटनर यांनी केला. या विषयावर त्यांनी पुस्तके लिहिली. डॉक्युमेंटरी तयार केल्या. त्यांचा ‘ब्लू झोन’ प्रकल्पही कार्यान्वित आहे. या संकल्पनेची व्याप्ती नंतर वाढत गेली. अधिकाधिक लोक या संकल्पनेकडे येऊ लागले. मुळातच जन्माला आलेले ठिकाण पर्यावरणदृष्ट्या उत्तम असणे यांसह उत्तम जीवनशैली, आहार, आयुष्याला असलेले ठरावीक ध्येय, कुटुंबाला प्राधान्य, निर्व्यसनी असणे, ताणतणावाचे व्यवस्थापन, उत्तम जनुके अशी काही कारणे यासाठी दिली जातात.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा >>> ३,००० कामगार, ४१२ दरवाजे, १३२ खोल्या अन् बरंच काही; जाणून घ्या ट्रम्प यांच्या होणाऱ्या अधिकृत निवासस्थानाची वैशिष्ट्यं

न्यूमन यांचे संशोधन

सन २०१९ मध्ये एका लेखामध्ये या संकल्पनेला आव्हान दिले गेले. सॉल जस्टिन न्यूमन या वरिष्ठ संशोधकाने त्यावर एक लेख लिहिला. न्यूमन हे ‘युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन’ येथे ‘सेंटर फॉर लाँजिटुडिनल स्टडीज’मध्ये संशोधक आहेत. ज्या भागाला ‘ब्लू झोन’ म्हणून ओळखले जाते, तेथील लोकांचे आयुर्मान सामान्यच असते, असा दावा या संशोधनात केला आहे. प्रशासनाच्या पातळीवर चुकीच्या नोंदींसह इतर कारणे त्यासाठी कारणीभूत असून, केवळ कागदावर हा शंभरीचा आकडा आहे. प्रत्यक्षात तेथील लोकांचा आयुर्मानाचा नाही, असा दावा करण्यात आला आहे. १९७० ते २०२१ या काळातील संयुक्त राष्ट्रांकडील मृत्यूसंदर्भातील आकडेवारीसह इतर जनसांख्यिकी साधनांचा आधार त्यांनी घेतला आहे. अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, इटली, जपानमधील शतायुषी लोकांचा डेटा त्यांनी तपासला. तसेच, कुठल्या भागात शतायुषी लोक अधिक राहतात, हे त्यांनी पाहिले. निवृत्तीवेतनाच्या नोंदी पाहिल्या. ‘ब्लू झोन’ म्हणून जे भाग ओळखले जातात, त्याच्याशी विपरीत अशी माहिती त्यांना मिळाली. अविकसित देशांतील गरीब भागांतही दीर्घायुषी लोक राहतात, अशी आश्चर्यजनक माहिती त्यांना आढळली. दीर्घायुषी लोक असलेल्या ठिकाणांमध्ये केनिया, मालावी, पश्चिम सहारा असे भाग त्यांना आढळले. या ठिकाणी सरासरी आयुर्मान ६४ ते ७० वर्षांपर्यंतचे आहे. ब्रिटनमध्ये टॉवर हॅम्लेट या मागास भागात शतायुषी लोक ब्रिटनमधील इतर कुठल्याही भागापेक्षा अधिक राहतात, असे त्यांना आढळून आले. ‘जगामधील ११० वर्षांहून अधिक काळ जगलेल्या ८० टक्के लोकांची माहिती मी मिळविली असून, संबंधित लोक कुठे जन्माला आले आणि त्यांचा मृत्यू कुठे झाला, हे मी तपासले आणि विशेष म्हणजे ज्या ठिकाणी जगण्याची साधने पुरेशी नसतात, तेथील परिस्थिती बिकट असते, अशा ठिकाणी शंभरी पूर्ण केलेले लोक अधिक आढळून आले,’ असे ते सांगतात. साक्षरतेचे कमी प्रमाण, जन्म-मृत्यूंची नोंदी ठेवण्यातील ढिसाळपणा विसाव्या शतकाच्या सुरुवातीला होता. किती तरी लोकांना ते नक्की किती वर्षांचे आहेत, हे सांगता यायचे नाही. अनेकांचे मृत्यू नोंदवले गेलेले नाहीत. त्यामुळे अनेक प्रकरणांत अशा शतायुषी नागरिकांच्या कुटुंबीयांना त्यांचे निवृत्तिवेतन दीर्घ काळ मिळत गेले. २०१० मध्ये जपानमध्ये २ लाख ३० हजार शतायुषी लोक बेपत्ता असल्याची माहिती जपानी सरकारने दिली. याचे मूळ कारण मृत्यूंची न झालेली नोंद असे असावे, असे न्यूमन सांगतात. ग्रीसमध्येही निवृत्तिवेतनाबाबतची अशीच माहिती जाहीर केली. ‘ब्लू झोन’ संकल्पनेमागेही असेच काही तरी असावे, असे न्यूमन मानतात. ओकिनावा येथे २०२०च्या आकडेवारीनुसार, वजनवृद्धीचे प्रमाण अधिक असल्याकडेही न्यूमन लक्ष वेधतात.

हेही वाचा >>> वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?

दावे-प्रतिदावे

बटनर यांची ‘ब्लू झोन’ संकल्पना आणि न्यूमन यांचा आश्चर्यजनक असा विरोधी दावा या दोन परस्परविरोधी गोष्टींवर बटनर यांनी सांगितले, की न्यूमन यांनी केलेले दावे ‘ब्लू झोन’ ज्या ठिकाणी नमूद केला आहे, तेथील प्रामुख्याने नाहीत. बटनर यांनी वापरलेली संशोधनाची पद्धत वेगळी असून, ‘ब्लू झोन’ भागामध्ये अनेक भेटी त्यांनी दिल्या आहेत. अनेक माहितीच्या आधारे त्यांनी या प्रदेशातील लोकांच्या जन्माच्या नोंदी तपासल्या आहेत. जगातील इतर भागांचाही बटनर यांनी अभ्यास केला. ब्लू झोन कुठे आढळून येतात का, ते पाहिले. मात्र, त्यांच्या संशोधनाच्या निकषात असा कुठलाही इतर भाग बसत नसल्याचे त्यांनी सांगितले. जनसांख्यिकीच्या निकषांनुसार ‘ब्लू झोन’मधील आयुर्मानाची आकडेवारी पूर्ण तपासून घेतल्याचे बटनर यांनी सांगितले. मॉन्ट्रियल विद्यापीठातील जनसांख्यिकी विभागामधील सहयोगी प्राध्यापक नॅडिन औलेट यांनी सांगितले, की न्यूमन यांनी केलेले दावे नक्कीच अस्तित्वात आहेत. मनुष्य जितका अधिक जगेल, तितकी त्याच्या वयाची अचूक माहिती मिळणे कठीण जाते. मात्र, वयाचा विचार करता इतर अनेक निकषही तपासले जातात. केवळ जन्म मृत्यूंच्या नोंदी बघितल्या जात नाहीत. तसेच, डॉ. न्यूमन यांनी संशोधनासाठी वापरलेल्या काही पद्धतींवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ज्या ठिकाणी ‘ब्लू झोन’ अस्तित्वात आहेत, अशा ठिकाणी आता आधुनिक जीवनशैली येऊ लागली असून, तेथील लोकांची पारंपरिक जगण्याची पद्धत बाद होत असल्याचे निरीक्षण बटनर यांनी नोंदवले आहे. येथे आता फास्ट फूड ची रेस्टॉरंटही दिसत आहेत. त्यामुळे येत्या काळात ‘ब्लू झोन’ अस्तित्वातच राहणार नाहीत, अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया बटनर यांनी दिली. ‘ब्लू झोन’ संकल्पना वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाली नसल्याचेही दावे काही शास्त्रज्ञांनी केले आहेत. या दावे-प्रतिदाव्यांमध्ये ‘ब्लू झोन’ ही आता एक दंतकथाच बनली आहे!

Story img Loader