अमोल परांजपे

इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून येमेनमधील हुथी बंडखोरांनी लाल समुद्रातून वाहतूक करणाऱ्या जहाजांवर ड्रोन, क्षेपणास्त्रे आदींच्या साहाय्याने हल्ले सुरू केले आहेत. लाल समुद्रातील प्रवास धोकादायक झाल्यामुळे कंपन्या अन्य मार्गांचा वापर करत आहेत. आता सोमालियाच्या आखातात गेले दशकभर निष्क्रिय असलेल्या समुद्री चाच्यांनी अचानक डोके वर काढले आहे. मात्र त्यामुळे समुद्री मालवाहतूक अधिकच जिकिरीची व धोकादायक झाली आहे. अशा वेळी भारतीय नौदल अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमाली चाच्यांची कार्यपद्धती कशी आहे?

हे समुद्री चाचे लूटमार कशी करतात, हे जाणून घेण्यासाठी अलिकडची एक घटना उदाहरणादाखल बघूयात…

सुमारे डझनभर सोमाली चाच्यांनी ‘स्पीड बोटी’मधून बांगलादेशी मालकीच्या ‘अब्दुल्ला’ या मालवाहू जहाजाचा मार्ग रोखला. जहाजावरील कर्मचाऱ्यांनी आसपास असलेल्या युद्धनौका अथवा पाणबुड्यांना आपल्कालिन संदेश पाठविला खरा, मात्र जहाजाच्या आसपास कुणीही नसल्याने त्यांना वेळीच मदत मिळू शकली नाही. अखेर चाच्यांनी जहाजावर प्रवेश मिळवला व हवेत गोळीबार केला. जहाजाचा कप्तान आणि द्वितीय अधिकाऱ्याला ओलीस ठेवण्यात आले. जहाजावरील मुख्याधिकारी अतिकउल्ला खान यांनी जहाजाच्या मालकास ध्वनीसंदेशाद्वारे ही माहिती दिली. ‘अल्लाच्या कृपेने आतापर्यंत कोणालाही इजा झालेली नाही,’ असा संदेश खान यांनी पाठविला होता. मात्र त्यानंतर चाच्यांनी कर्मचाऱ्यांचे मोबाईल ताब्यात घेतले. एका आठवड्यानंतर ‘अब्दुल्ला’ जहाज सोमालियाच्या किनाऱ्यावर नांगरल्याचे आढळले. यामुळे सोमाली चाच्यांचा बंदोबस्त केला आहे, ही आंतरराष्ट्रीय नौदलांची धारणा फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा >>> Moscow Terror Attack: दहशतवादी हल्ल्यातील चार संशयितांना अटक; हल्लेखोरांचा हेतू काय होता?

हुथी बंडखोरांचा चाच्यांशी संबंध काय?

तज्ज्ञांच्या मते हुथी बंडखोर आणि सोमाली चाचे यांच्यामध्ये थेट संबंध असण्याची शक्यता नाही. किमान आतापर्यंत तसा पुरावा तरी हाती आलेला नाही. मात्र काहींच्या मते लाल समुद्रात हुथी बंडखोरांनी हल्ले सुरू केल्यानंतर सोमाली चाचे सक्रिय बनले. आतापर्यंत सोमाली चाच्यांचा उच्छाद असलेल्या पश्चिमी हिंद महासागरात भारतीय नौदलासह अन्य आंतरराष्ट्रीय नौदलांची गस्त होती. मात्र हुथींच्या हल्ल्यानंतर या नौदलांचे लक्ष येमेनजवळ एडनच्या आखातावर केंद्रित झाल्यामुळे सोमाली चाच्यांना रान मोकळे मिळाले आहे. परिणामी गेल्या दशकभरापासून फारशा प्रभावी नसलेल्या चाच्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. दोन सोमाली चाच्यांनी ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेला सांगितले, की हुथी हल्लेखोरांनी जगाचे लक्ष विचलित केल्यामुळे चाचेगिरीमध्ये परतण्याचा निर्णय आपण घेतला.

चाचेगिरीचा व्यापारावर काय परिणाम होईल?

हुथी बंडखोरांच्या लाल समुद्रातील हल्ल्यांमुळे जागतिक व्यापारावर आधीच गंभीर परिणाम झाला आहे. नोव्हेंबरपासून अपहरणाच्या २०पेक्षा जास्त घटना घडल्या असून त्यामुळे सुरक्षा व विम्याचा खर्च भरमसाट वाढला आहे. आपली जहाजे सोडवून घेण्यासाठी कंपन्यांना खंडणीही मोजावी लागत असल्यामुळे खर्चात भर पडली आहे. अनेक कंपन्यांना लाल समुद्राचा मार्ग टाळून ‘केप ऑफ गुड होप’ला वळसा घालून जाणारा लांबचा मार्ग निवडावा लागत आहे. त्यामुळे इंधनाचा खर्च वाढला आहे. त्यातच आता पश्चिमी हिंद महासागरात चाचेगिरीने डोके वर काढल्यामुळे कंपन्यांची डोकेदुखी आणखी वाढणार आहे. २००८ ते २०१४ या काळात सोमाली चाच्यांनी धुमाकूळ घातला होता. आता अद्याप तशी परिस्थिती नसली, तरी चाच्यांचा वेळीच बंदोबस्त केला नाही, तर ही समस्या वाढण्याची भीती आहे. ही चाचेगिरी आताच थांबली नाही, तर पुन्हा पूर्वीसारखी स्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती सोमालियाचे अध्यक्ष हसन शेख मेहमूद यांनी गेल्याच महिन्यात बोलून दाखविली होती. आता त्याचा वारंवार प्रत्यय येऊ लागला आहे.

हेही वाचा >>> ‘तब’ की बार, ४०० पार! १९८४ च्या निवडणुकांमध्ये घडला होता राजकीय इतिहास; तीन दशकांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

भारतीय नौदलाची भूमिका महत्त्वाची का?

गेल्याच आठवड्यात माल्टाच्या ‘रुएन’ या जहाजाची भारतीय नौदलाने सोमाली चाच्यांच्या तावडीतून मुक्तता केली. याच ‘रुएन’चा मुख्य तळासारखा वापर करून चाच्यांनी बांगलादेशच्या ‘अब्दुल्ला’वर हल्ला केला असावा, असा अंदाज युरोपीय महासंघाची चाचेगिरीविरोधी मोहीम, ‘ईयूनेव्हफोर ॲटलांटा’ने व्यक्त केला आहे. भारतीय नौदलाने दिलेल्या माहितीनुसार या जहाजावरील ३५ चाच्यांनी आत्मसमर्पण केले व १७ ओलिसांनी कोणत्याही दुखापतीशिवाय सुखरूप सुटका करण्यात यश आले. लाल समुद्राच्या पूर्वेकडे भारतीय नौदलाच्या डझनभर युद्धनौका तैनात असून सोमाली चाच्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांची निश्चित मदत होईल, असा विश्वास ‘इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स’च्या गुन्हेगारीविरोधी विभागाचे उपसंचालक सायरस मोदी यांनी सांगितले. भूमध्य समुद्र आणि लाल समुद्रातील सागरी मार्गांवर कोणत्याही क्षणी १४ देशांच्या किमान २० युद्धनौका जहाजांना संरक्षणासाठी तैनात असल्या तरी यात सर्वाधिक योगदान हे ‘ब्लू वॉटर नेव्ही’ बनलेल्या भारतीय नौदलाचेच आहे.

amol.paranjpe@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis india fights somali pirates indian navy rescues ship from somali pirate attack print exp zws
First published on: 27-03-2024 at 07:30 IST