मंगल हनवते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील दळणवळण व्यवस्था सक्षम करण्यासाठी राज्यभरात ५००० किमीचे रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. त्यातील एक रस्ता म्हणजे कल्याण ते लातूर द्रुतगती महामार्ग. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) कल्याण ते लातूर द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गामुळे कल्याण ते लातूर अंतर केवळ चार तासांत पार होणार आहे. तेव्हा हा महामार्ग नेमका कसा आहे, हा प्रकल्प कसा आहे, याचा हा आढावा…

राज्यात किती किमी रस्त्यांचे जाळे?

सरकारने राज्यात ५००० हून अधिक किमीच्या महामार्गांचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा महामार्गाद्वारे जोडून प्रवास अतिजलद करणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. त्यानुसार ५२६७ किमीच्या महामार्गांचे नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) सुमारे ४२१७ किमीच्या द्रुतगती महामार्गाची कामे करणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून सुमारे १०५० किमीचे महामार्ग बांधला जाणार आहे. एमएसआरडीसीच्या प्रकल्पात १५ महामार्गांचा समावेश असून त्यातील मुंबई ते पुणे हा ९४ किमीचा महामार्ग सेवेत दाखल आहे. मुंबई ते नागपूर या ७०१ किमीच्या समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. इतर १३ महामार्गांचे काम सुरू होणे बाकी आहे. याच १३ महामार्गातील एक महामार्ग म्हणजे कल्याण ते लातूर द्रुतगती महामार्ग.

हेही वाचा >>> विश्लेषण: आयटीतील घसघशीत पगाराला मंदीची कात्री?

कल्याण ते लातूर महामार्गाची गरज का?

मराठवाड्यातील एक महत्त्वाचा जिल्हा म्हणजे लातूर. कल्याण ते ठाणे अंतर ४५० किमीहून अधिक असून ते पार करण्यासाठी दहा तास लागतात. त्यामुळे प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी कल्याण ते लातूर द्रुतगती महामार्ग बांधण्याची संकल्पना एमएसआरडीसीने पुढे आणली. ठाणे, कल्याण ते लातूर अंतर कमी करणे हा उद्देश हा महामार्ग हाती घेण्यामागे आहेच. पण त्याच वेळी लातूर आणि आसपासच्या भागातील दळणवळण व्यवस्था सक्षम करण्यासाठी हा महामार्ग बांधला जाणार आहे.

कल्याण ते लातूर महामार्ग कसा आहे?

कल्याण ते लातूर द्रुतगती महामार्ग कल्याण येथून सुरू होऊन माळशेज घाटातून पुढे अहमदनगरला जाईल. तेथून पुढे बीड, मांजरसूंबा, अंबेजोगाईवरून लातूर शहर आणि तेथून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत संपेल. हा द्रुतगती महामार्ग माळशेज घाटातून जाणार असून त्यासाठी घाटात आठ किमीचा बोगदा बांधण्यात येणार आहे. हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यास कल्याण ते लातूर अंतर चार तासात पार करता येणार आहे. त्याचवेळी मुंबई शहर आणि उपनगरवासीयांना हा महामार्ग वापरता यावा यासाठी विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेशी कल्याण-लातूर महामार्ग जोडला जाणार आहे. अटल सेतुवरून पुढे बहुउद्देशीय मार्गिकेवरील कल्याण आंतरबदल मार्गाने या द्रुतगती महामार्गावर जात येणार आहे. या महामार्गासाठी ढोबळमानाने ५० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आराखडा अंतिम झाल्यानंतर प्रकल्पाचा नेमका खर्च किती हे स्पष्ट होईल.

हेही वाचा >>> कायदेशीर जगतातील ‘भीष्म पितामह’; कोण होते फली एस नरिमन? वाचा सविस्तर

प्रकल्पाची सद्यःस्थिती काय?

एमएसआरडीसीच्या नवीन रस्ते प्रकल्पात कल्याण ते लातूर द्रुतगती महामार्ग आहे. ७०१ किमीच्या समृद्धी महामार्गातील ६०० किमीचा टप्पा सध्या वाहतूक सेवेत दाखल आहे. उर्वरित महामार्ग येत्या काही महिन्यांत वाहतुकीसाठी खुला होईल. तेव्हा एका मोठ्या महामार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असल्याने एमएसआरडीसीने आता नवीन महामार्गाची आखणी करणे, आखणी झालेल्या रस्त्यांची कामे सुरू करणे अशी कामे सुरू केली आहेत. त्यानुसार कल्याण ते लातूर द्रुतगती महामार्गाचा प्रस्ताव तयार केला जात आहे. लवकरच हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर महामार्गाचे संरेखन, आराखडा अशी कामे हाती घेतली जाणार आहेत.

लातूर, मराठवाड्याच्या विकासाला गती?

राज्यातील सर्व जिल्हे द्रुतगती महामार्गाने जोडले जावे यासाठी एमएसआरडीसीने एकूण १५ महामार्गांचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पात विकासापासून दुर असलेल्या मराठवाड्याला द्रुतगती महामार्गाने जोडण्यासाठी नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग बांधण्यात येणार आहे. हा महामार्ग लातूरमधून जाणार आहे. ८०२ किमीपैकी ४३ किमीचा महामार्ग लातूरमधून जाणार आहे. दुसरीकडे कल्याण ते लातूर महामार्गाचीही बांधणी केली जाणार आहे. त्यामुळे शक्तीपीठ आणि कल्याण ते लातूर द्रुतगती महामार्गामुळे लातूरसह मराठवाड्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला गती मिळेल, असा दावा यानिमित्ताने केला जात आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis msrdc decided to construct kalyan to latur expressway print exp zws
First published on: 22-02-2024 at 07:00 IST