पुण्यात या वर्षात प्रथमच जून महिन्यात झिकाचे रुग्ण आढळले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आरोग्य यंत्रणांनी या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. झिका हा डासांमार्फत पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. एडीस इजिप्ती या डासांच्या माध्यमातून झिकाचा प्रसार होतो आणि हा डास दिवसा चावतो. याचबरोबर झिकाबाधित रुग्णाशी लैंगिक संबंध ठेवल्यासही संसर्ग होऊ शकतो. गर्भवतींबाबतीत झिका संसर्ग झाल्यास विशेष काळजी घ्यावी लागते. झिकाचा गर्भाला होणार धोका लक्षात घेऊन उपाययोजना कराव्या लागतात.

लक्षणे कोणती?

झिकाच्या संसर्ग झालेल्या बहुतांश रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत. या आजाराची लक्षणे डेंग्यूसारखी असतात. त्यामध्ये ताप, अंगावर लाल पुरळ, डोळे येणे, सांधेदुखी, स्नायुदुखी, थकवा आणि डोकेदुखी यांचा समावेश आहे. ही लक्षणे सौम्य स्वरूपाची असतात आणि ती २ ते ७ दिवस राहतात. तसेच, या आजारात मृत्यू होण्याचे प्रमाणही नगण्य आहे. झिकाचा संसर्ग झालेल्या पाच रुग्णांपैकी एक आजारी पडतो आणि रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण त्याहूनही कमी आहे. रुग्णाच्या रक्तनमुना चाचणीतून झिकाचे निदान केले जाते. याचबरोबर लक्षणे दिसून आलेल्या रुग्णाच्या मूत्र तपासणीतूनही रोगाचे निदान होते.

हेही वाचा >>> अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगातून सीबीआयने केली अटक; कारण काय?

गर्भवतींना जास्त धोका का?

झिका विषाणूच्या संसर्गामुळे गर्भावर गंभीर परिणाम होऊ शकतात. यामुळे मूल जन्मजात विकृतीसह जन्माला येऊ शकते. हा संसर्ग मुदतपूर्व जन्म आणि इतर गुंतागुंतीसाठी कारणीभूत ठरतो. गर्भवतीला झिकाचा संसर्ग झाल्यास मुलाचा डोक्याचा आकार कमी होतो. याला गुलियन बॅरी सिंड्रोम असे म्हटले जाते. हा एक दुर्मीळ मेंदुविकार असून, त्यात शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणा मज्जासंस्थेच्या भागावर हल्ला करते. या आजाराचा धोका गर्भाला मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे झिकाचा प्रसार असलेल्या भागात गर्भवतींनी जाणे टाळावे, असा सल्ला दिला जातो. तसेच, झिकाचा संसर्ग झालेल्या महिलांना आठ आठवडे गर्भधारणा टाळण्यास सांगितले जाते. कारण हा विषाणू रुग्णाच्या रक्तात आठवडाभर राहतो तर वीर्य आणि मूत्रात तो दीर्घकाळ राहतो. तसेच, गर्भवतींच्या रक्तात तो आणखी दीर्घकाळ राहू शकतो.

उपचार काय करावेत?

झिका आजारावर सध्या कोणतेही औषध अथवा लस उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णाच्या लक्षणांनुसार डॉक्टरांना उपचार करावे लागतात. संसर्ग झालेल्या रुग्णांना अधिकाधिक विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो. याचबरोबर शरीरातील निर्जलीकरण टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ घेण्यास सांगितले जाते. रुग्णाला ताप असल्यास त्याला पॅरासिटामॉल औषधे दिली जातात. ॲस्पिरीनसारखी औषधे रुग्णांना देणे टाळले जाते.

हेही वाचा >>> डेटा ते डायपर सगळंच महागलं! केनियाच्या लोकांनी ‘या’ कायद्यामुळे पेटवली संसद

रोखण्यासाठी कोणती पावले?

झिकाचा रुग्ण आढळून आल्यानंतर त्या भागात आरोग्य विभागाकडून उपाययोजना हाती घेतल्या जातात. याचबरोबर तेथील स्थानिक प्रशासनाला ताप रुग्णांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना केल्या जातात. डेंग्यू आणि चिकुनगुन्या या आजारांप्रमाणेच ही सर्वेक्षणाची पद्धती आहे. या सर्वेक्षणात गर्भवतींवर विशेष लक्ष दिले जाते. रुग्ण आढळलेल्या ३ किलोमीटर परिघाच्या परिसरातील सर्व गर्भवतींची नोंद केली जाते. याचबरोबर त्यांची ३ महिन्यांतून एकदा सोनोग्राफी तपासणी करण्याच्या सूचना केल्या जातात. तापाचे रुग्ण सापडल्यास त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्थेत पाठविले जातात.

कोणती काळजी घ्यावी?

आपल्या घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवावा. घराच्या आजूबाजूला पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. पाणी साठविण्याचे हौद घट्ट झाकणाने झाकावेत. प्रत्येक आठवड्यात कूलर रिकामे करून स्वच्छ करावेत. पाणी साठवणुकीच्या हौदात गप्पी मासे पाळावेत. मच्छरदाणी आणि जास प्रतिरोधक औषधांचा वापर करावा. शरीर पूर्ण झाकले जाईल, असे कपडे घालावेत, असे उपाय करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तज्ज्ञांचे म्हणणे काय?

देशात आढळणारा झिका विषाणूचा प्रकार फारसा धोकादायक नसल्याचे राज्य कीटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप यांनी सांगितले. ते म्हणाले की, याआधी परदेशातून येणाऱ्या व्यक्ती अथवा परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेले अशांना झिकाचा संसर्ग होत होता. आता या विषाणूचा प्रसार सगळीकडे झाला आहे. यामुळे परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात न आलेले रुग्ण आढळून आले आहेत. आपल्याकडे आढळणारा झिका विषाणूचा प्रकार धोकादायक नसल्याने काळजी करण्याची आवश्यकता नाही. अनेक वेळा संसर्ग झाल्यानंतर सात दिवसांच्या आता रुग्ण आपोआप बरा होतो. याचबरोबर या रोगाचा मृत्युदरही अगदी नगण्य आहे. केवळ गर्भवतींच्या बाबतीत विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. sanjay.jadhav@expressindia.com