जागतिक सुरक्षा या वर्षी सर्वाधिक चिंतेचा विषय बनलेला असतानाच नुम्बेओ सुरक्षा निर्देशांक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालाने फ्रान्स आणि स्पेन या दोन्ही देशांच्या सीमेवर वसलेला अँडोरा हा ८४.७ या उल्लेखनीय सुरक्षा निर्देशांकासह पृथ्वीवरील सर्वात सुरक्षित देश म्हणून जाहीर केला आहे. विशेष म्हणजे एके काळी सुरक्षित मानले जाणारे अमेरिका आणि ब्रिटन या देशांना विकसनशील अर्थव्यवस्था असलेल्या अनेक देशांनी मागे टाकले आहे. भारतही जागतिक सुरक्षिततेबाबत या दोन्ही देशांपेक्षा सरस ठरला आहे. नुम्बेओच्या अहवाल नक्की काय आहे, याचा आढावा घेऊयात.
सर्वात सुरक्षित देश कोणते?
फ्रान्स आणि स्पेन या दोन्ही देशांच्या सीमेवर वसलेला अँडोरा हा देश (८४.७) पहिल्या स्थानी आहे. त्या पाठोपाठ संयुक्त अरब अमिराती (८४.५), कतार (८४.२) आणि तैवान (८२.९) हे देश पहिल्या पाचमध्ये येतात, तर ओमान (८१.७) त्यांच्या जरा मागे आहे. हे सर्व देश सांस्कृतिक आणि भौगोलिकदृष्ट्या वेगळे असले तरी, गुन्हेगारीचा अल्प दर, मजबूत कायदा व सुव्यवस्था आणि सार्वजनिक संस्थांचे वर्चस्व या काही गोष्टी समान असल्याचे नोंदवण्यात आले आहे.
आइल ऑफ मान, हाँगकाँग, आर्मेनिया, सिंगापूर आणि जपान हे देशही ‘टॉप टेन’मध्ये आहेत. हे शहरी सुरक्षा उपाय आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर नागरी नियमांचा अवलंब करत असल्याने नागरिकांना ते अधिक सुरक्षित वाटतात.
भारताने अमेरिका, ब्रिटनला मागे कसे टाकले?
भारताने सुरक्षित देशांच्या यादीत अमेरिका आणि ब्रिटन या दोन्ही देशांपेक्षा वरचा क्रमांक पटकावला आहे. भारतातील सुरक्षिततेबाबत झालेल्या सुधारणा, विशेषतः शहरी केंद्रांमध्ये जिथे स्थानिक प्रशासन, पोलीस व्यवस्था आणि डिजिटल देखरेख प्रणाली अधिक व्यापकपणे तैनात केल्याने भारताने ५५.७ निर्देशांकासह ६६ वे स्थान मिळवले आहे. चीन ७६.० निर्देशांकासह १५ व्या स्थानी आहे. तर भारताशेजारील देशांपैकी श्रीलंका (५७.९) ५९ वा क्रमांक, पाकिस्तान (५६.३) ६५ वा आणि बांगलादेश (३८.४) १२६ व्या स्थानी आहे.
जागतिक सुरक्षा क्षेत्रात काय बदलले?
जागतिक सुरक्षा क्रमवारीत पाश्चात्त्य राष्ट्रांचे कायमच वर्चस्व राहिले होते. मात्र नुम्बेओ २०२५ च्या अहवालात जागतिक सुरक्षा मानकांचे व्यापक पुनर्मूल्यांकन दिसून आले आहे. एके काळी सर्वाधिक सुरक्षित मानली जाणारी अमेरिका ५०.८ सुरक्षा निर्देशांकासह ८९ व्या स्थानी आहे. तर ब्रिटन ५१.७ निर्देशांकासह ८७ व्या स्थानी आहे. या देशांतील काही शहरी भागांत गुन्हेगारीचे वाढते प्रमाण, सार्वजनिक सुरक्षेबद्दल चिंता, सामाजिक एकात्मतेतील आव्हाने या मुद्द्यांमुळे नागरिक आणि प्रवासी तेथील सुरक्षिततेबद्दल करत असलेल्या चिंतेमुळे यावर परिणाम झाला असावा, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.
जगातील ‘टॉप टेन’ सर्वांत सुरक्षित देश
१. अँडोरा – ८४.७ सुरक्षा निर्देशांक
२. संयुक्त अरब अमिराती – ८४.५ सुरक्षा निर्देशांक
३. कतार – ८४.२ सुरक्षा निर्देशांक
४. तैवान – ८२.९ सुरक्षा निर्देशांक
५. ओमान – ८१.७ सुरक्षा निर्देशांक
६. आइल ऑफ मान – ७९.० सुरक्षा निर्देशांक
७. हाँगकाँग – ७८.५ सुरक्षा निर्देशांक
८. आर्मेनिया – ७७.९ सुरक्षा निर्देशांक
९. सिंगापूर – ७७.४ सुरक्षा निर्देशांक
१०. जपान – ७७.१ सुरक्षा निर्देशांक
जगातील सर्वांत असुरक्षित देश
१. व्हेनेझुएला – १९.३ सुरक्षा निर्देशांक
२. पापुआ न्यू गिनी – १९.७ सुरक्षा निर्देशांक
३. हैती – २१.१ सुरक्षा निर्देशांक
४. अफगाणिस्तान – २४.९ सुरक्षा निर्देशांक
५. दक्षिण आफ्रिका – २५.३ सुरक्षा निर्देशांक
६. होंडुरास – २८.० सुरक्षा निर्देशांक
७. त्रिनिदाद आणि टोबॅगो – २९.१ सुरक्षा निर्देशांक
८. सीरिया – ३१.९ सुरक्षा निर्देशांक
९. जमैका – ३२.६ सुरक्षा निर्देशांक
१०. पेरू – ३२.९ सुरक्षा निर्देशांक
सुरक्षा निर्देशांक का महत्त्वाचे?
जगातील सर्वात सुरक्षित आणि सर्वात धोकादायक देश समजून घेणे अनेक कारणांसाठी आवश्यक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे प्रवास नियोजन. पर्यटक हे त्यांना कुठे भेट द्यायची याबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी सुरक्षा निर्देशांक पाहत असतात. कोणता देश सुरक्षेबाबत अधिक चांगला आहे हे पाहून पर्यटक तेथे जातात. तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्या गुंतवणूक करताना किंवा त्यांचे कामकाज वाढवताना सुरक्षिततेचा विचार करतात. त्यानुसार देशांची निवड केली जाते. नुम्बेओचा अहवाल जगभरात सुरक्षिततेचा एक व्यापक संदर्भित मापक आहे. तो गुन्हेगारीचे प्रमाण, सार्वजनिक सुरक्षेची धारणा आणि वैयक्तिक सुरक्षा चिंता यांसह विविध घटकांवर नागरिकांनी दिलेली माहिती संकलित करतो. या वर्षीच्या अहवालानुसार, सुरक्षा गुण हे रहिवासी आणि पर्यटकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात किती सुरक्षित वाटते हे प्रतिबिंबित करतात. हिंसक गुन्हे, चोरी आणि इतर धोक्यांची शक्यता लक्षात घेऊन हा निर्देशांक विशेषतः प्रवासी आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिकांसाठी उपयुक्त ठरतो.
dharmesh.shinde@expressindia.com