पाकिस्तानमध्ये २७ वी घटनादुरुस्ती झाल्यानंतर तिथे लष्कराच्या हातात अधिकृतपणे सर्व सूत्रे हाती आल्याची स्थिती आहे. भारताबरोबर ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान झालेल्या संघर्षानंतर पाकिस्तानच्या लष्करामध्ये रचनात्मक बदल होताना दिसत आहे. याचा घेतलेला हा आढावा… 

मुनीर : लष्करप्रमुख ते फील्ड मार्शल

पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांना पाकिस्तानने भारताबरोबर मे महिन्यात झालेल्या संघर्षानंतर ‘फील्ड मार्शल’ केले. हे पाकिस्तानात मानाचे पद होते. २७ व्या घटनादुरुस्तीनंतर आता ते अधिकृत झाले आहे. पाकिस्तानची सारी सूत्रे आता मुनीर यांच्या हाती आल्यात जमा आहेत. या साऱ्यांच्या केंद्रस्थानी आहेत, ती पाकिस्तानमधील अण्वस्त्रे. तीदेखील मुनीर यांच्या नियंत्रणाखाली आली आहेत. भारतद्वेष हेच जणू काही धोरण असल्याप्रमाणे वागणाऱ्या मुनीर यांच्या हाती सारी सत्ता एकवटल्यामुळे पाकिस्तानमध्ये भारतविरोधाची धार अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. 

सर्व सत्ता मुनीर यांच्याभोवती केंद्रित

पाकिस्तानमध्ये २७ वी घटनादुरुस्ती झाल्यानंतर मुनीर यांच्याभोवती सत्तेचे केंद्रीकरण झाले आहे. फील्ड मार्शल हे पद तहहयात राहणे, फौजदारीसह इतर कुठल्याही कारवाईपासून तहहयात संरक्षण, न्यायालयीन व्यवस्थेवरही नियंत्रण यांमुळे संपूर्ण पाकिस्तानच मुनीर यांच्या ताब्यात राहणार आहे. नौदल, हवाई दल ही संरक्षण दलांची इतर दोन दलेही त्यांच्या अधीन असतील. ‘चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस’ (सीडीएफ) अशा नव्या पदाची निर्मिती घटनादुरुस्तीनंतर करण्यात आली आहे. वरकरणी भारताच्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदासारखे हे पद वाटेल. पण, त्यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. भारतातील पद हे तिन्ही दलांतील समन्वय राखण्यासाठी आणि तिन्ही दलांतील प्रमुखांना समकक्ष असे हे चार स्टारचेच पद आहे. फील्ड मार्शल हे पाच स्टारचे पद आहे, आणि पाकिस्तानात मुनीर यांना हे पद दिले जाणे, घटनादुरुस्ती करणे यामागे केवळ लष्करामध्ये रचनात्मक बदलाचा उद्देश नक्कीच नाही. महत्त्वाचा निर्णय घेताना कुठलीही बाधा नको, असे कारण पुढे करून मुनीर यांच्याभोवती सत्तेची सूत्रे केंद्रीत करण्यात आली आहे. त्याचे दूरगामी परिणाम पाकिस्तानच्या अंतर्गत स्थितीवर आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भारतावर होणार आहेत.

अण्वस्त्रेही मुनीर यांच्याकडेच? 

घटनादुरुस्तीनंतर पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय सामरिक कमांड तयार करण्यात आली असून, त्याच्या प्रमुखपदी मुनीर यांच्या सल्ल्याने लष्करातील अधिकारी नियुक्त केला जाईल. ही कमांड पाकिस्तानच्या अण्वस्त्रांवर नियंत्रण ठेवेल. पाकिस्तान हा कायम बेभरवशाचा देश राहिला आहे. अण्वस्त्रांसारख्या संवेदनशील विषयावरही अमेरिकेच्या भूमीवरून ‘आमच्याबरोबर अर्धे जग ही नष्ट करू’ असे प्रक्षोभक, बेभरवशाचे आणि वादग्रस्त विधान मुनीर यांनी केले होते. अशा अण्वस्त्रांची सूत्रे तहहयात सर्व कारवाईपासून संरक्षण लाभलेल्या मुनीर यांच्या हाती आली, तर अण्वस्त्रांच्या बाबतीतील धोका कैकपटींनी वाढणार आहे. त्याचा केवळ भारतालाच नव्हे, तर जगाला धोका यापुढे राहणार आहे.

पाकिस्तानचे भूराजकीय स्थान

पाकिस्तानला त्याच्या भूराजकीय स्थानामुळे कायमच फायदा झाला आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवादी उजळ माथ्याने फिरत असतानाही चीन, अमेरिकेची साथ पाकिस्तानला आहे. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर २००१ मध्ये झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार ओसामा बन लादेनला अमेरिकेने पाकिस्तानात घुसून मारले. मात्र, त्यानंतरही आज, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प हे मुनीर यांची स्तुती करताना दिसतात. यामागे पाकिस्ताचे भूराजकीय स्थानाचेच महत्त्व आहे. या भौगोलिक स्थानाचा फायदा पाकिस्तान कायम उचलत आलेला आहे.

भारतावर काय परिणाम? 

पाकिस्तानमधील या बदलांकडे सावध दृष्टिकोनातून पाहायला हवे. पाकिस्तानचा भारतद्वेष, पाकिस्तानचे दहशतवादाला पोसणारे धोरण, काश्मीरविषयीची भूमिका याला भारत कणखरपणे आजवर प्रत्युत्तर देत आला आहे. इथून पुढे पाकिस्तानकडून धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या लष्कराचीच नव्हे, तर संपूर्ण पाकिस्तानचीच सूत्रे मुनीर यांच्या हाती आली आहेत. ही सूत्रे अशी रीतीने त्यांनी हाती घेतली आहेत, की पाकिस्तानात कायम आता लष्करप्रमुखाचेच वर्चस्व असेल. यापूर्वीही ते होतेच. पण, आता त्याला घटनादुरुस्तीचे कवच लाभले आहे. पाकिस्तान बांगलादेशबरोबरही लष्करी संबंध वाढवीत आहे. पाकिस्तानची बरोबरी भारताशी होऊ शकत नाही. पण, बदलती युद्धपद्धती, आंतरराष्ट्रीय भूराजनीती यांमुळे संरक्षण सज्जता बहुस्तरावर असणे क्रमप्राप्त झाले आहे. अशा स्थितीत, संरक्षणाच्या दृष्टिकोनातून भारतानेही संभाव्य धोक्यांचा परिपूर्ण विचार करून तातडीने उपाययोजना करायला हव्यात. भारताने आपल्या आण्विक धोरणाचाही पुन्हा विचार करण्यास मागेपुढे पाहू नये. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, निर्णय घेण्यामधील विलंब टाळून, अत्याधुनिक संरक्षण सज्जतेच्या दिशेने अधिक वेगाने पुढे जायला हवे.

prasad.kulkarni@expressindia.com