दोन दशकांनंतर आणि एक अब्ज डॉलर खर्चून कैरोमध्ये ग्रँड इजिप्शियन संग्रहालय अखेर खुले झाले. या संग्रहालयात इजिप्तचा प्राचीन राजा तुतनखामुनच्या थडग्यातील ५,००० हून अधिक गोष्टींचा खजिना पहिल्यांदाच एकाच छताखाली एकत्र आणला जात आहे. पण या राजाच्या थडगे उत्खननानंतर कित्येक संशोधकांचे गूढ मृत्यू झाले होते. त्यामुळे चर्चेत आलेला ‘तुतनखामुनचा (कथित) शाप’ काय होता, याचा हा आढावा.

तुतानखामुन कोण होता?

तुतानखामुन हा प्राचीन इजिप्तच्या अठराव्या राजवंशातील तेरावा फेरो (राजा) होता. तो ९ वर्षांचा असताना गादीवर बसला. त्याने इ.स.पूर्व सुमारे १३३३ ते १३२३ राज्य केले. त्याच्या शासनकाळाला प्राचीन इजिप्तचा प्रबोधनाचा काळ मानले जाते. तुतानखामुन हा त्याच्या हयातीत देवता म्हणून पूजल्या जाणाऱ्या काही राजांपैकी एक होता. त्याने स्वतःसाठी इजिप्तच्या ‘व्हॅली ऑफ द किंग्ज’मध्ये एक शाही थडगे आणि त्यासोबत एक शवगृह मंदिर बांधण्यास सुरुवात केली, परंतु त्याच्या मृत्यूच्या वेळी दोन्ही अपूर्ण राहिले, असे मानले जाते. तुतानखामुन याचे वयाच्या १८ व्या वर्षी अनपेक्षितपणे निधन झाले. त्याच्या मृत्यूचे कारण हे आजही चर्चेचा विषय आहे. २०१२ मध्ये असे सुचवण्यात आले होते की त्याचा मृत्यू मलेरिया आणि पायाच्या फ्रॅक्चरमुळे झाला. त्याच्या थडग्याचा शोध साधारण तीन हजार वर्षांनंतर लागला.

तुतानखामुन थडग्याचे उत्खनन

इंग्लंडमधील लॉर्ड कार्नार्वन यांचा १९०३ मध्ये अपघात झाला. त्यानंतर त्यांना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने उष्ण हवामान असलेल्या ठिकाणी जाणे आवश्यक होते. त्यांना सुरुवातीपासूच इजिप्तबाबत कुतूहल असल्याने त्यांनी तेथे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी इजिप्तमध्ये पुरातत्त्वीय उत्खननांना प्रोत्साहन देण्यासाठी आपली संपत्ती खर्च केली. १९२२ मध्ये पुरातत्त्वशास्त्रज्ञ हॉवर्ड कार्टर यांनी या  अर्थसाह्यावर अखेर इजिप्तच्या व्हॅली ऑफ द किंग्जमधील राजा तुतानखामुनच्या थडग्याचा शोध लावला. हा शोध सार्वकालिक महान पुरातत्त्वीय शोधांपैकी एक होता. या राजाच्या थडग्यातून सोने, दागिने, रथ आणि शेवटी, तुतानखामुनचा प्रसिद्ध सोनेरी मुखवटा सापडला. या शोधाच्या बातमीने जगाला भुरळ घातली. यामुळेच युरोप आणि अमेरिकेतील पुरातत्त्वशास्त्रज्ञ शोध मोहिमेसाठी इजिप्तला येऊ लागले. ‘इजिप्त मेनिया’ची एक नवीन लाट पश्चिमेकडे पसरली.

कार्नार्वन यांचा मृत्यू कथित शापाने?

तुतानखामुन थडग्याच्या उत्खनानंतर काही महिन्यांनीच एक दुर्दैवी घटना घडली. मार्च १९२३ मध्ये कार्नार्वन यांच्या गालावर एका कीटकाने चावा घेतला. त्यांनी त्याबद्दल फारसा विचार केला नाही. काही दिवसांनी दाढी करताना त्या ठिकाणी जखम होऊन संसर्ग झाला. त्यानंतर रक्तात पू आणि विष पसरल्याने ५ एप्रिल १९२३ रोजी त्यांचे कैरो येथे निधन झाले. त्यावेळी ते ५६ वर्षांचे होते. तुतानखामुनच्या थडग्याच्या उत्खनानंतर अवघ्या काही महिन्यांनीच ही घटना घडली. त्यावेळी कैरोमध्ये संपूर्ण शहरात वीजपुरवठा खंडित झाला होता, असेही वृत्त पसरले होते. कार्नार्वन यांच्या मृत्यूदरम्यानच्या काळात इंग्लंडमधील हायक्लियर कॅसलमध्ये कार्नार्वन यांच्या आवडत्या सूसी कुत्र्याचाही मृत्यू झाल्याने चर्चेला उधाण आले. अनेकांना हे मृत्यू तुतानखामुन थडग्याचे उत्खनन केल्यामुळे मिळालेल्या कथित ‘शापा’ने झाले असे वाटू लागले. मृतदेहाला त्रास दिल्याबद्दल कार्नार्वन यांना शिक्षा मिळाल्याचे सर्वजण बोलू लागले. 

आणखी काही गूढ मृत्यू

विशेष म्हणजे या उत्खननाच्या कामात मदत करणाऱ्या अन्य काही जणांच्या मृत्यूचेही गूढ आहे. त्यामधील थडग्याचे एक्स-रे करणारे आर्चीबाल्ड डग्लस रीड यांचे अज्ञात आजाराने निधन झाले. तर थडग्याच्या उत्खननात सहभागी असलेले पुरातत्त्वशास्त्रज्ञ ह्यू एव्हलिन व्हाईट यांनी आत्महत्या केली. त्यांनी त्यावेळी भिंतीवर रक्ताने लिहिलेले, ‘मी शापाखाली आहे आणि मला मरावेच लागेल’, हे वाक्य अधिक लक्षवेधी होते. हॉवर्ड कार्टर यांच्या समूहाचे सदस्य असलेले आर्थर मॅचेन्थ हे थडग्याचा शोध लागल्यानंतर दोन वर्षांनी अचानक एका आजारपणामुळे मरण पावले. तर कबरीचे दस्तऐवजीकरण करण्यात सहभागी असलेले सर ली ब्रूस हे रहस्यमय परिस्थितीत मृत आढळले. या घटनांमुळे कथित शापाच्या कल्पनेला अधिक बळ मिळाले.

माध्यमांमध्ये चर्चा

न्यूयॉर्क टाइम्सने ५ एप्रिल १९२३ रोजी कार्नार्वनच्या मृत्यूबद्दल असोसिएटेड प्रेसचा एक अहवाल प्रसिद्ध केला. ‘फेरोच्या थडग्यावरील एका कीटकाच्या चाव्याने कार्नार्वनचा मृत्यू’ असे त्याचे शिर्षक होते. ‘जगातील माध्यमे अजूनही लॉर्ड कार्नार्वन आणि त्यांच्या सह-संशोधकांनी तुतानखामुन थडग्याचे उत्खनन करण्यास बराच वेळ दिल्यानंतर एका कीटकाच्या चाव्यामुळे कैरोमध्ये कार्नार्वन यांना अचानक दुखापत होऊन ते गंभीर आजारी पडल्याची बातमी आली. ही दुःखद घटना सर्वसाधारणपणे इजिप्तसारख्या उष्णकटिबंधीय हवामानात काय घडू शकते हे दाखवणारी होती,’ असे न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तात म्हटले होते. तसेच या अहवालात ‘इजिप्शियन गूढवादाच्या निष्ठावंत विद्यार्थ्यांना ही बातमी आश्चर्यकारक वाटली नाही. लॉर्ड कार्नार्वन यांना रक्त विषबाधेने ग्रासले जाण्यापूर्वीच इजिप्शियन लोकांमध्ये फेरोची झोप मोडण्याचे धाडस करणाऱ्यांना शाप दिल्याची चर्चा होती. कार्नार्वन यांना त्रास झाल्यानंतर जुन्या दंतकथा पुन्हा वेगाने पसरल्या आणि अनेक जण शापामुळे हे घडल्याचे मानायाला लागले,’ असे अहवालात नमूद करण्यात आले. कार्नार्वन यांना विषारी कीटकाने खरच चावा घेतला होता का, असाही प्रश्न काही नागरिकांनी केला.

तर काहींनी तीस शतकांपूर्वी मरण पावलेल्या राजाच्या मृतदेहाच्या विश्रांतीत अडथळा आणणाऱ्या व्यक्तीवर सूड घेण्यासाठी थडग्यात असलेल्या एखाद्या विषारी वस्तूने हे केल्याचे मानले. लेखिका मार्ले कोरेली यांनी इजिप्शियन गूढवादाच्या श्रद्धांकडे लक्ष वेधत अलीकडेच सांगितले की, मृत सम्राटाच्या थडग्याचे उत्खनन करणाऱ्या धाडसी संशोधकांना झालेल्या अपघाताबद्दल त्यांना आश्चर्य वाटले नाही. काल्पनिक कथांनी कार्नार्वन यांचा मृत्यू कथित शापाने झाला, या कल्पनेला बळकटी दिली. राजा तुतानखामुनच्या थडग्याच्या प्रवेशद्वारावर कोरलेल्या एका गूढ इशाऱ्याबद्दल अफवा पसरल्या. शेरलॉक होम्सचे निर्माते सर आर्थर कॉनन डॉयल यांनी असा अंदाज लावला होता की आत्म्यांनी कार्नार्वनचा जीव घेतला असावा. अध्यात्मवाद्यांनी असा दावा केला की, कार्नार्वन याच्या कुत्र्याचा मृत्यू होताना त्याचे रडणे आणि कोसळणे, हे सिद्ध करते की कार्नार्वन याच्या कुटुंबालाच तो शाप लागला होता. लॉर्ड कार्नार्वनच्या मृत्यूच्या गूढतेचे कुतूहल इतके होते की लेखक-चित्रपट निर्माते सत्यजित रे यांनी अनेक दशकांनंतर त्यांच्या ‘फेलुदा’मध्ये त्यांनी ते समाविष्ट केले.

मृत्यूमागील वैज्ञानिक कारण काय होते?

कार्नार्वन यांच्या मृत्यूबाबत बहुतेक इतिहासकार अधिक वास्तववादी स्पष्टीकरण देतात. त्यांच्या मते कार्नार्वन यांची तब्येत आधीच कमकुवत होती. एका अपघातानंतर ते इजिप्तला गेले होते. त्यावेळी म्हणजे २० व्या शतकाच्या सुरुवातीला होणारे संसर्ग बहुतेकदा प्राणघातक होते. हा काळ अँटीबायोटिक्सच्या आधीचा होता. त्यामुळे कार्नार्वन यांचा संसर्ग कदाचित काही हजार वर्षांच्या शापामुळे नसून १९२० च्या दशकातील इजिप्तला भेडसावणाऱ्या समस्यांच्या मिश्रणामुळे झाला असावा. उष्णकटिबंधीय हवामान, कीटकांचा चावा, रक्तातील विषबाधा आणि विकसनशील जगात औषध आणि आरोग्यसेवेचे ज्ञान नसणे या सर्व गोष्टींनी कार्नार्वन यांचा मृत्यू झाला असावा, असे त्यांचे म्हणणे आहे.

ग्रँड इजिप्शियन संग्रहालय

ग्रँड इजिप्शियन संग्रहालय (GEM) हे इजिप्तमधील गीझा येथे असलेले जगातील सर्वात मोठे संग्रहालय असून तेथे एक लाखांहून अधिक कलाकृती आहेत. यात राजा तुतानखामुनच्या संपूर्ण खजिन्याचा समावेश आहे. तसेच पूर्व-राजवंश काळापासून ते ग्रीको-रोमन युगापर्यंतच्या अनेक पुरातत्त्वीय वस्तू येथे आहेत. यातील अनेक वस्तू जुन्या इजिप्शियन संग्रहालयातून (कैरो, तहरीर स्क्वेअर) आणण्यात आल्या, तर काही वस्तू अलिकडेच सक्कारा नेक्रोपोलिससह प्राचीन स्मशानभूमीतील उत्खननात सापडलेल्या आहेत. सुमारे १२० एकर (५० हेक्टर) मध्ये पसरलेल्या या संग्रहालयाची रचना ब्रिटिश फर्म हेनेघन पेंग आर्किटेक्ट्सने केली आहे, आणि त्याचा मुख्य प्रवेशद्वार पिरॅमिडच्या आकाराचा आहे. हे संग्रहालय पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे केंद्र बनेल आणि दरवर्षी सुमारे ८० लाख पर्यटक येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.