अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये १२ ऑगस्टला झालेल्या अपघाताची चर्चा त्या देशाबरोबरच भारतातही होत आहे. त्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आणि अपघाताला कारणीभूत असलेला ट्रकचालक भारतीय असून त्याने सात वर्षांपूर्वी अमेरिकेत बेकायदा प्रवेश केला होता. अमेरिकी जनतेत त्याच्याविरोधात रोष आहेच. त्याचवेळी त्याला न्याय्य वागणूक मिळावी यासाठी ऑनलाईन याचिका दाखल केल्या जात आहेत आणि त्याला लाखो लोकांचा पाठिंबाही मिळत आहे. 

हरजिंदर सिंगने केलेला अपघात 

फ्लोरिडा राज्यातील फोर्ट पियर्स या शहरामध्ये १२ ऑगस्ट रोजी हरजिंदर सिंग १८ चाकी ट्रक चालवत होता. ट्रक चालवत असताना त्याने ‘फ्लोरिडा टर्नपाइक’वर बेकायदा यूटर्न घेतला. यामुळे एक मिनिव्हॅन ट्रकच्या ट्रॉलीवर आदळून अपघात झाला. त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. यामुळे २८ वर्षीय हरजिंदर सिंगविरोधात सदोष मनुष्यवधाचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या अपघाताची चित्रफित समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली. त्याचवेळी त्याच्याबरोबर आणखी एक व्यक्ती ट्रकमध्ये असल्याचे लक्षात आले. तपासाअंती तो हरजिंदरचा २५ वर्षीय भाऊ हरनीत सिंग असल्याचे समजले. 

हरजिंदर आणि हरनीतला अटक

अपघात झाल्यानंतर दोघेही विमानाने कॅलिफोर्नियाला परत गेल्याचे सांगण्यात आले. त्यांना या आठवड्यात फ्लोरिडामध्ये परत आणले गेले. हरजिंदर सिंगला २३ ऑगस्टला अटक करण्यात आली. हरनीत सिंगला त्यापूर्वी, म्हणजे २१ ऑगस्टला अटक करण्यात आली होती. अपघातानंतर त्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरजिंदर सिंग २०१८मध्ये मेक्सिकोच्या मार्गाने अमेरिकेत बेकायदा दाखल झाला होता. हरजिंदर सिंगला इंग्रजी नीट समजत नाही, बोलता येत नाही. इतकेच नाही तर त्याला रस्त्यावरील सूचनादर्शक चिन्हेही समजत नाहीत असे चौकशीमध्ये उघड झाले आहे.

हरजिंदर सध्या तुरुंगात 

हरजिंदर सध्या फेडरल इमिग्रेशनच्या ताब्यात असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्याच्याविरोधातील फौजदारी खटला चालवल्यानंतर त्यालाही देशाबाहेर काढले जाईल. हरजिंदरला अटक करण्यात आल्यानंतर फ्लोरिडाच्या न्यायाधीशांनी त्याला बाँडवर सोडण्यास नकार दिला. सेंट ल्युसी काउंटीचे न्यायाधीश लॉरेन स्वीट यांनी स्पष्ट केले की हरजिंदर सिंग बेकायदा रहिवासी आहे आणि तो देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता आहे. हरजिंदर सिंगवर तीन मनुष्यवधाचे आणि तीन सदोष मनुष्यवधाचे असे सहा खटले चालणार आहेत. त्या सर्व गुन्ह्यांबद्दल त्याला ४५ वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्याच्याविरोधातील न्यायालयीन कारवाई पूर्ण झाल्यानंतर त्याला देशाबाहेर काढले जाईल असे फ्लोरिडाच्या महामार्ग सुरक्षा विभागाकडून जाहीर करण्यात आले. 

हरजिंदर आणि हरनीतचा भूतकाळ

अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी असलेल्या ‘डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी’ने यासंबंधी एक प्रसिद्धीपत्रक काढून माहिती दिली की हरनीत सिंगला यापूर्वी २०२३मध्ये ताब्यात घेण्यात आले होते, मात्र तत्कालीन सरकारने त्याची सुटका केली. त्याला देशाबाहेर काढण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तुरुंगात ठेवले जाईल. त्याच्याविरोधात कोणते गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

बायडेन प्रशासनाकडून संरक्षण?

हरजिंदरने २०१८मध्ये बेकायदा प्रवेश केल्यानंतर कॅलिफोर्नियामध्ये व्यावसायिक चालकाचा परवाना मिळवला, तेव्हा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष होते. यापूर्वी २०१९मध्ये हरजिंदरची पाच हजार डॉलरच्या इमिग्रेशन बाँडवर सुटका झाली होती. त्याचा कामाचा परवाना सप्टेंबर २०१९मध्ये रद्द करण्यात आला होता. २०२०मध्ये तो परत मिळवण्यासाठी त्याने प्रयत्न केले. पण तो नाकारण्यात आला होता. मात्र, बायडेन प्रशासनाने जून २०२१मध्ये हा परवाना परत दिला असे ‘डीएचएस’च्या उपमंत्री ट्रिशिया मॅलॉफ्लिन यांनी ‘एक्स’वर लिहिले. आपल्याला भारतात परत येण्याची भीती वाटत असल्याचा दावा त्याने केल्याची माहिती ‘डीएचएस’कडून देण्यात आली. 

हरजिंदरला ऑनलाईन सहानुभूती? 

‘चेंज डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळावर हरजिंदर सिंगविरोधात न्याय्य पद्धतीने खटला चालवला जावा अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर २३ लाखांपेक्षा जास्त व्यक्तींनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. मनिषा कौशल यांनी ही याचिका सुरू केली. या घटनेकडे जाणीवपूर्वक केलेले कृत्य म्हणून न पाहता दुर्दैवी अपघात म्हणून पाहावे, अशी विनंती याचिकेद्वारे फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डिसँटिस यांच्याकडे करण्यात आली आहे. हरजिंदरच्या शिक्षेमध्ये सवलत मिळावी आणि त्याला सुधारण्याची संधी द्यावी असे आवाहन लोकप्रतिनिधी, न्यायाधीश आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे करण्यात आले आहे. हरजिंदरच्या चुकीमुळे अमेरिकेतील जवळपास दीड लाख पंजाबी ट्रकचालकांना भेदभावाची वागणूक मिळू नये अशी अपेक्षाही याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे. 

याचिकेविरोधात याचिका 

कौशल यांनी दाखल केलेल्या याचिकेविरोधात ह्यू मान या ट्रकचालकाने दुसरी याचिका सुरू केली आहे. त्याने स्वतःचे वर्णन करताना आपण ‘वारसाहक्काने अमेरिकी’ असल्याचे म्हटले आहे. हरजिंदर सिंगच्या शिक्षेत सवलत मिळण्याची विनंती करणारे कायदा यंत्रणेचे महत्त्व कमी करत आहेत. तसेच त्यांच्यामुळे सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होत आहे असा दावा मान यांनी केला आहे. त्या याचिकेच्या समर्थनार्थ आतापर्यंत १६ लाख जणांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. 

परदेशी ट्रकचालकांवर बंदी?

फ्लोरिडा अपघातानंतर काही परदेशी ट्रकचालकांना वर्क व्हिसा देण्यावर स्थगिती दिल्याचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी जाहीर केले आहे. परदेशी ट्रकचालक अमेरिकी नागरिकांच्या जीवितासाठी धोका निर्माण करत आहेत आणि अमेरिकी ट्रकचालकांच्या उदरनिर्वाहाच्या संधी कमी करत आहेत असे रुबियो म्हणाल्याचे वृत्त एपीने दिले आहे. मात्र, याबाबत पुढील तपशील मिळालेले नाहीत. रुबियो यांनी दिलेल्या इशाऱ्यामध्ये तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या एच-२बी व्हिसावर सर्वाधिक परिणाम होऊ शकतो. 

nima.patil@expressindia.com