गिधाडांसाठी सरकारचा कृती-कार्यक्रम आहे का?
होय. गिधाडांचे पर्यावरणातील स्थान ओळखून, तसेच प्रजातींच्या रक्षणासाठी केंद्रीय वन, पर्यावरण व वातावरणीय बदल खात्याने ‘गिधाड संरक्षण कृती कार्यक्रम : २०२०-२५’ आखला. पण २०२५ वर्ष अर्धे संपले, तरी या उपक्रमाचा परिणाम समाधानकारक नाही.
जनावरांसाठीच्या औषधांचा गिधाडांवर काय परिणाम होतो?
‘डायक्लोफिनॅक’ हे औषध जनावरांसाठी वेदनाशामक म्हणून वापरले जात होते. मात्र, त्याच्या सेवनानंतर मृत झालेल्या जनावरांचे अवशेष गिधाडांनी खाल्ले तर ती मरतात. ‘डायक्लोफिनॅक’सारखी अनेक औषधे गिधाडांसाठी विषारी ठरतात. प्रति किलो ०.८ मिलिग्रॅम एवढे प्रमाण गिधाडांच्या शरीरात गेले तरी यकृत, मूत्रपिंड आणि हृदयावर परिणाम होऊन गिधाडे मरतात. ‘निमसुलाईड’, ‘केटोप्रोफेन’, ’एसिक्लोफिनॅक’, ‘कारप्रोफेन’, ‘फ्लुनिक्सी’, ‘मेलॅक्सिकॅम’, ‘टॉल्फेनामिक अॅसिड’ ही वेदनाशामक औषधेदेखील गिधाडांसाठी हानीकारक आहेत.
त्या औषधांना आवर घालता येईल?
‘डायक्लोफिनॅक’ या औषधावर केंद्र सरकारने २००६-०७ मध्येच बंदी घातली, तर ‘निमसुलाईड’, ‘केटोप्रोफेन’, ‘एसिक्लोफिनॅक’ या औषधांवर २०२३, २०२४ मध्ये बंदी आणली. मात्र, ही औषधे बाजारात सर्रास विकली जातात. ‘डायक्लोफिनॅक’वरील बंदीनंतर बाजारात त्याच्या विक्रीचे प्रमाण केवळ एक टक्का आहे. मात्र, ‘निमसुलाईड’, ‘केटोप्रोफेन’, ’एसिक्लोफिनॅक’ बाजारात सर्रास विकले जाते. ‘कारप्रोफेन’, ‘फ्लुनिक्सी’ औषधांचे डोसदेखील गिधाडांसाठी हानीकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. ‘मेलॅक्सिकॅम’, ‘टॉल्फेनामिक अॅसिड’ ही दोन औषधे गिधाडांसाठी हानीकारक नसल्याचे सिद्ध झाले आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणानुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, बल्लारपूर, सिंदेवाही, नागभीड या तालुक्यांमधील औषधांच्या दुकानात अजूनही बंदी असलेली औषधे विकली जात असल्याचे दिसून आले.
पशुवैद्याक आणि पक्षीतज्ज्ञांमध्ये दुमत?
पशुवैद्याकीय क्षेत्रातील काही लोक ही औषधे पूर्णपणे टाळण्याची किंवा कमी प्रमाणात वापरण्याची शिफारस करतात; पण काही जण वेदना कमी करण्यासाठी त्यांचा प्रभावी वापर आवश्यक मानतात. या औषधांवरील बंदीचा निर्णय अनेक पशुवैद्याकांना अजूनही पटलेला नाही. ‘दुसऱ्या औषधांना प्राधान्य देण्यासाठी आणि त्यांची विक्री वाढवण्यासाठी ही बंदी घालण्यात आली,’ असा काही पशुवैद्याकांचा समज आहे. तो दूर करण्याची गरज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. विशेषकरून पशुवैद्याकीय शास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये या वेदनाशामक औषधांविषयी जनजागृतीची गरज पक्षीतज्ज्ञ व पर्यावरणतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
गंभीर धोका असलेली गिधाडे कोणती ?
अलीकडच्या दशकात गिधाडांची संख्या विशेषत: आफ्रिका आणि आशियामध्ये कमी झाली आहे. एकंदर २३ प्रजातींपैकी सात वगळता सर्व प्रजाती आता धोक्यात, नामशेष मार्गावर वा गंभीरपणे धोक्यात आलेल्या मानल्या जातात. दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांचे राष्ट्रीय प्रतीक असलेले अँडियन कॉन्डोर, जगातील सर्वात मोठ्या उडणाऱ्या पक्ष्यांपैकी एक सिनेरियस गिधाड, हिमालयीन ग्रिफॉन, दाढीवाले गिधाड, लॅपेट-फेस्ड गिधाड, दक्षिण आफ्रिकेत आढळणारे केप गिधाड, इजिप्शियन गिधाड, पांढऱ्या डोक्याचे गिधाड, पांढऱ्या पाठीचे गिधाड, रुपेलचे गिधाड, हूड असलेले गिधाड, भारतीय गिधाड, पातळ चुंबक गिधाड, भारतीय पांढरे कुरळे गिधाड, लाल डोक्याचे गिधाड, कॅलिफोर्निया कॉन्डोर या जगभरातील धोक्यात असलेल्या गिधाडांच्या प्रजाती आहेत. भारतात स्थानिक प्रजातींच्या गिधाडांची संख्या काही वर्षांपूर्वी लाखोंच्या घरात होती, ती आता १० ते १५ हजारादरम्यान आहे. लांब चोचीच्या, पातळ चोचीच्या आणि पांढऱ्या पाठीच्या गिधाडांची भारतीय प्रजाती गंभीर धोक्यात आहे.
‘बीएनएचएस’ची भूमिका काय?
गिधाडांच्या पुनरुज्जीवनासाठी बीएनएचएस गेली अनेक वर्षे प्रयत्न करत आहे, त्यातूनच हरियाणातील पिंजोर, पश्चिम बंगालमधील राजाभात्खवा, आसाममधील राणी आणि मध्य प्रदेशातील भोपाळ येथे तेथील वनखात्याच्या सहकार्याने गिधाड संवर्धन प्रजनन केंद्रे सुरू करण्यात आली. या चारही केंद्रांवर आतापर्यंत सुमारे ८०० गिधाडे जन्मली आहेत, हे बीएनएचएसला यश येत असल्याचे लक्षण. अलीकडेच काही गिधाडे पेंच, ताडोबा-अंधारी या व्याघ्रप्रकल्पात सोडण्यात आली. बंदिवासात जन्मलेली गिधाडे नैसर्गिक अधिवासात यशस्वीपणे जगावीत, जंगलातील गिधाडांची संख्या वाढावी हा त्यामागील उद्देश आहे. या प्रयत्नांना आता हळूहळू यश येऊ लागले आहे.