भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रोने) पहिली एकात्मिक एअर ड्रॉप अर्थात आकाशातून पृथ्वीवर अवतरणाची चाचणी यशस्वीरित्या पार पाडली. भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेच्या तयारीत ही चाचणी अतिशय महत्त्वाचा टप्पा मानली जाते. इस्रोने संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ), भारतीय हवाई दल, भारतीय नौदल व तटरक्षक दलाच्या संयुक्त प्रयत्नातून ही चाचणी केली.
चाचणीचे स्वरूप
अंतराळ मानवी मोहिमेत विविध टप्प्यांतील अखेरचा आणि जोखिमीचा टप्पा म्हणजे अंतराळवीरांना सुखरूप पृथ्वीवर, समुद्रातील पाण्यावर अलगद उतरविण्याचा असतो. कारण, त्यामध्ये पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश, पॅराशूटचे नियोजन आणि अंतराळातून उतरलेल्यांची पुनर्प्राप्ती यांचा समावेश होतो. या चाचणीसाठी हवाई दलाचे चिनूक हेलिकॉप्टर श्रीहरिकोटा येथून ४० किलोमीटर अंतरावर नेण्यात आले. तेथून तीन किलोमीटर उंचीवरून अंतराळवीरांची प्रतिकुपी सोडण्यात आली. समुद्राकडे वेगात येणाऱ्या कुपीचा वेग कमी करण्यासाठी तीन पॅराशूटचा वापर झाला. सर्व पॅराशूटने अपेक्षेनुरूप काम केले. मानवासाठी वेग सुरक्षित मर्यादेपर्यंत कमी केला. नौदलाने या कुपी समुद्रातून परत मिळवत आम्हाला सुपूर्द केल्याचे इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी म्हटले आहे. अन्य चाचण्यांकरिता देखील ही कुपी पुन्हा वापरली जाईल.
तपासणी, अवलोकन
गगनयान मोहिमेअंतर्गत प्रत्यक्ष उड्डाणासाठी अंतराळवीरांच्या कुपीत १० पॅराशूटची व्यवस्था राहणार आहे. त्यांचे कार्य व उपयुक्तता वेगवेगळी आहे. काही पॅराशूट कप्प्याचे संरक्षण व स्वच्छता करतील. काही कुपीचा वेग कमी करणे, काही कुपीला स्थिर करण्यासाठी असतील. अखेरच्या टप्प्यात पृथ्वी आणि जलपृष्ठभागावर उतरताना मुख्य तीन पॅराशूटचा वापर होईल. अंतराळवीरांचे सुरक्षित अवतरण सुनिश्चित करण्यासाठी तीन मुख्य पॅराशूटपैकी दोन पुरेसे असतात. ही चाचणी केवळ मुख्य पॅराशूटची तैनाती, वैमानिक व तत्सम बाबी तपासण्यासाठी नव्हती, तर चार प्रमुख संस्थांमधील समन्वय व एकात्मिक सिद्धतेचीही होती. गगनयान मोहिमेचे नेतृत्व करणारी इस्रो, पॅराशूटची रचना करणारी भारतीय संरक्षण व संशोधन संस्था (डीआरडीओ), ड्रॉप चाचणीसाठी चिनूक हेलिकॉप्टर उपलब्ध करणारे भारतीय हवाई दल आणि कुपी पुनर्प्राप्त करणारे भारतीय नौदल यांनी ही चाचणी यशस्वी केली. गगनयानच्या अंतिम उड्डाणासाठी भारतीय नौदल पुनर्प्राप्ती मोहीम हाती घेणार आहे.
मोहिमेची वाटचाल
भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम गगनयान कार्यक्रम अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे मध्यंतरी अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेद्र सिंह यांनी म्हटले होते. चालू वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या मानवरहित वाहन चाचणी मोहिमेमुळे पुढील चाचणीसाठी पाया रचला गेला. दुसरी मानवरहित वाहन चाचणी वर्षाच्या अखेरीस होईल. त्यानंतर गगनयानची मानवरहित कक्षीय उड्डाणे होतील. हे टप्पे पार पडल्यानंतर २०२७ मध्ये भारताच्या पहिल्या अंतराळ उड्डाणाला प्रारंभ होईल, ज्यामध्ये भारतीय अंतराळवीरांना भारतीय भूमीवरून भारतीय यानातून कक्षेत सोडण्याचे नियोजन आहे. यामध्ये २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्थानकाची स्थापना आणि २०४० पर्यंत पहिला भारतीय चंद्रावर पाठविणे समाविष्ट असल्याकडे डॉ. सिंह यांनी लक्ष वेधले होते. अंतराळवीर म्हणून निवड झालेल्या भारतीय हवाई दलाच्या चार वैमानिकांनी रशियात प्रशिक्षणही पूर्ण केले आहे.
सद्यःस्थिती काय?
अलीकडेच लोकसभेतील एका प्रश्नात मोहिमेची सद्यःस्थिती मांडली गेली. त्यानुसार प्रक्षेपक वाहनाचा (एचएलव्हीएम-३) विकास आणि जमिनीवरील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. अंतराळयानाच्या प्रणोदन प्रणालींचा विकास व परीक्षण झाले आहे. अंतराळवीरांना सुरक्षितपणे बाहेर पडण्याच्या प्रणालीकरिता पाच प्रकारच्या मोटर विकसित करून त्यांची स्थिरता चाचणी झाली. गगनयान मोहिमेत कक्षीय व्यवस्थेत सुविधा, गगनयान नियंत्रण कक्ष, नियंत्रण सुविधा, प्रशिक्षण सुविधा, द्वितीय लाँच पॅड सुधारणा आदी पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात आली. उड्डाण संचलन आणि संपर्क प्रणालीसाठी जमिनीवरील जाळे नियोजनाला अंतिम स्वरूप देण्यात आले. अवतरणत्वाच्या मोहिमेचा आराखडा तयार झाला आहे. पहिल्या मानवरहित मोहिमेसाठी विशिष्ट कार्यासाठी वेगवेगळ्या भागांची रचना साकारली गेली. यातील काही घटकांची तपासणी पूर्ण झाली.
चौथा देश
या प्रकारची चाचणी घेणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला. महत्त्वाचे म्हणजे इतर देशांमध्ये राबविण्यात आलेल्या या प्रकारच्या मानवी अंतराळ मोहिमेच्या तुलनेत गगनयान प्रकल्पावरील खर्च अतिशय कमी असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. तंत्रज्ञान नवोन्मेष आणि आर्थिक प्रोत्साहन या दोन्ही बाबतीत या मोहिमेचा परतावा यावर केल्या जाणाऱ्या खर्चापेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते. या कार्यक्रमाने रोबोटिक्स, सामग्री, इलेक्ट्रॉनिक्स आणि औषधांमधील प्रगती यासह नवीन संशोधनाला वाव मिळाल्याकडे लक्ष वेधले जाते.
