scorecardresearch

विश्लेषण : मुंबईत भाजपाने ‘मराठी दांडिया’ची घोषणा केल्यानंतर झालेला वाद नेमका काय? वाचा संपूर्ण घटनाक्रम…

Marathi Dandiya in Mumbai Sewri Area : भाजपाचा मराठी दांडियाचा कार्यक्रम काय आहे आणि त्याभोवती नेमका काय वाद सुरू आहे याचा हा आढावा.

विश्लेषण : मुंबईत भाजपाने ‘मराठी दांडिया’ची घोषणा केल्यानंतर झालेला वाद नेमका काय? वाचा संपूर्ण घटनाक्रम…
मराठी दांडिया शिवसेना विरुद्ध बीजेपी  (संग्रहित छायाचित्र, इंडियन एक्स्प्रेस)

Marathi Dandiya Shivsena vs BJP : भाजपाने मुंबईतील मराठी बहुल शिवडी भागात ‘मराठी दांडिया’ कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा केली. ३० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या काळात हा मराठी दांडिया कार्यक्रम होणार आहे. मात्र, भाजपाच्या या घोषणेनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने भाजपावर जोरदार हल्लाबोल केलाय. अशा कार्यक्रमांमधून भाजपा मुंबईतील मराठी माणसांना फोडण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचा हा मराठी दांडियाचा कार्यक्रम काय आहे आणि त्याभोवती नेमका काय वाद सुरू आहे याचा हा आढावा.

भाजपाने जवळपास ३०० गरब्यांच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. त्यासाठी विशेष पासची व्यवस्था करण्यात आली आहे. याचे सर्व पास भाजपाच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे पास निशुल्क दिले जाणार असल्याचंही सांगण्यात आलं. याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक अवधुत गुप्तेही सहभागी होणार आहे.

याची माहिती देण्यासाठी भाजपाने पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यात भाजपा आमदार मिहीर कोटेचा, चित्रा वाघ यांच्यासह प्रसिद्ध गायक अवधुत गुप्तेही सहभागी होते. यावेळी मिहीर कोटेचा यांच्यामार्फत मुंबईत हा गरबा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. आमदार कोटेचा म्हणाले, “गेल्या अडीच वर्षापासून आपले प्रत्येक हिंदू सण दाबले गेले होते. जन्माष्टमीला एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की, आता प्रत्येक हिंदू सण हा जोरदार होणार आहे. जन्माष्टमी जोरात झाली, गणेशोत्सव जोरात झाले आणि आता आम्ही त्यावरून प्रेरणा घेऊन मुंबईत अंबे माँचा नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात आयोजित करणार आहोत.”

अवधुत गुप्ते म्हणाले, “३० ऑक्टोबरपासून पुढील पाच दिवस काळा चौकीतील अभुदय मैदानावर मराठी दांडिया आयोजित होतोय. मला मराठी कलाकार म्हणून या गोष्टीचा फार आनंद आहे. स्वतःला एक हक्काचा दांडिया, एक मैदान मिळणं आणि यंदा पाच-सहा दिवस, तर पुढील वर्षी अधिक दिवस गायला मिळणं मोठी संधी आहे. या सर्व लोकांमुळे मला ही संधी मिळते आहे. यासाठी मी भाजपाचा खूप आभारी आहे.”

ठाकरे गटाचा सामना अग्रलेखातून मराठी दांडियावर हल्लाबोल

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात मराठी दांडियावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. त्यात म्हटलं आहे, “लालबाग, परळ, शिवडी या शतप्रतिशत भगव्या प्रदेशात कमळाबाईने खास मराठी दांडियाचे आयोजन करून मराठी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न चालवला आहे. गणपती उत्सवानंतर नवरात्री उत्सवात भाजप आपल्या राजकीय टिपऱ्या अशा प्रकारे घुमवत आहे. अर्थात असे ‘दांडिये’ घुमवून मराठी माणसांची एकजूट फोडता येईल हा त्यांचा भ्रम आहे. मुंबईतील मराठी माणसांची एकजूट म्हणजे ‘मिंधे’ गटात सामील झालेल्या आमदारांची कमअस्सल अवलाद नाही.”

“लालबाग, परळ, माझगाव, शिवडी, दादर, भायखळा इतकेच काय, गिरगावपासून दहिसर-मुलुंडपर्यंतचा मुंबईतील प्रदेश सतत शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला व त्यात मराठीजनांबरोबर हिंदी, गुजराती, जैन, मारवाडी, मुस्लिम, दाक्षिणात्य असे ‘मुंबैकर’ बांधवही समर्थनार्थ उभे राहिले,” असंही या अग्रलेखात म्हटलं आहे.

नेमका का वाद का?

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटात जोरदार राजकीय लढाई पाहायला मिळत आहे. बीएमसी निवडणुकीत २२७ जांगासाठी मतदान होईल. २०१७ च्या निवडणुकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढलेल्या शिवसेनेला ८४ जागा, तर भाजपाला ८२ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत मुंबईतील दादर, परेळसारख्या मराठी बहुल भागात शिवसेनेचा दबदबा दिसला. जवळपास १०० जागांवर मराठी मतं निर्णायक असल्याचंही जाणकार सांगतात. त्यात कोकणी मतं महत्त्वाची आहेत. ही मतं शिवसेनेची ताकद राहिले आहेत. यावरच आता भाजपाने लक्ष्य केलं आहे.

भाजपाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकासआघाडी सरकारवर हिंदू विरोधी असल्याचा आरोप वारंवार केलाय. ठाकरे सरकारच्या काळात हिंदू सण धोक्यात आल्याचा आरोप करतानाच आता शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात हिंदू सणांवरील निर्बंध हटवल्याचा दावा भाजपाकडून करण्यात येतो आहे. भाजपाने याआधी मुंबईत ३७० ठिकाणी दहिहंडीचे कार्यक्रम आयोजित केले होते. ही संख्या मागील वर्षी केलेल्या कार्यक्रमांच्या दुप्पट आहे. त्याआधीच्या वर्षी या कार्यक्रमांची संख्या १५०-१७५ इतकी होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तर दहिहंडी हा साहसी खेळ वर्गात समाविष्ट करण्याची आणि त्यात सहभागी होणाऱ्या गोविंदांना नोकरीत आरक्षण देण्याची घोषणा केली होती. एकूणच भाजपाकडून सर्वप्रकारे मतदारांना आकर्षित करण्यासाठी रणनीती आखली जात आहे.

निवडणुकींना धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न – ठाकरे गट

भाजपाच्या मराठी दांडियाच्या घोषणेनंतर शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपावर सणांना धर्माच्या आधारावर वाटून निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा आरोप केला आहे. त्या एएनआयशी बोलताना म्हणाल्या, “आतापर्यंत आपण गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवही सर्वांना एकत्रित करणारा उत्सव म्हणून पाहत होतो. मात्र, भाजपाकडून जात, धर्म, प्रांताच्या आधारावर विभागणी केली जात आहे. हे दुर्दैवी आहे.”

हेही वाचा : विश्लेषण : गुलाम नबी खरेच ‘आझाद’? की भाजपशी जवळीक?

एकूणच जन्माष्टमी आणि गणेशोत्सवानंतर आता भाजपाने मराठी दांडियाच्या माध्यमातून ताकद लावली आहे. त्याला मराठी मतदार कसा प्रतिसाद देतात आणि त्याचा मुंबई महानगरपालिकेत किती परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या