अनिकेत साठे aniket.sathe@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकंदर  ६० युद्धनौका, पाणबुडय़ा आणि ५५ विमानांच्या ताफ्याचे निरीक्षण करीत तीनही सैन्य दलाचे प्रमुख तथा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नौदलाच्या सक्षमतेचा विशाखापट्टणम येथे रविवारी (२० फेब्रुवारी) आढावा घेतला. अतिशय दिमाखात पार पडलेल्या या राष्ट्रपती ताफा संचलनाद्वारे (प्रेसिडेंट्स फ्लीट रिव्ह्यू – ‘पीएफआर’) भारतीय नौदलाने आपल्या सामर्थ्यांचे दर्शन घडवले. शिवाय, भारताची युद्धनौका बांधणीची क्षमतादेखील अधोरेखित केली.

काय असते राष्ट्रपतींचे ताफा संचलन (पीएफआर)?

राष्ट्रपती हे भारताच्या तीनही सैन्य दलाचे प्रमुख अर्थात सरसेनापती असतात. राष्ट्रपतींच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्या सन्मानार्थ ताफ्याचा आढावा म्हणजे संचलनाचे आयोजन करण्याची नौदलाची परंपरा आहे. या उपक्रमात नौदल आपल्या ताफ्यातील सर्व प्रकारच्या युद्धनौका झेंडे आणि विविध सामग्रीने सजवून सहभागी करते. राष्ट्रपतींसाठी खास असलेल्या नौकेवर अशोकमुद्रा कोरलेली असते. या नौकेतून राष्ट्रपती संपूर्ण ताफ्याचे निरीक्षण करतात. मानवंदना आणि २१ तोफांची सलामी स्वीकारून राष्ट्रपती या नौकेवर जातात. खोल समुद्रात पाहणीवेळी ताफ्यातील प्रत्येक युद्धनौका, पाणबुडीद्वारे त्यांना मानवंदना दिली जाते. अवकाशातून नौदलाचे हेलिकॉप्टर आणि विमाने संचलन करतात. पाहणीच्या अंतिम टप्प्यात युद्धनौका आणि पाणबुडय़ांचा ताफा राष्ट्रपतींच्या नौकेजवळून जातात. विलक्षण असा हा सोहळा असतो.

यंदाच्या संचलनात काय होते?

यंदाच्या ताफा संचलनात गस्ती जहाज ‘आयएनएस सुमित्रा’ ही राष्ट्रपतींची नौका होती. पाहणीनंतर शिडांच्या बोटीचे संचलन, समुद्रात शोध आणि बचाव प्रात्यक्षिके, ‘हॉक’ विमानाच्या कसरती, नौदलाच्या कमांडोंकडून पॅरा जम्पचे सादरीकरण करण्यात आले. यात आधुनिक रडार यंत्रणेपासून बचाव करण्याची क्षमता राखणारी ‘आयएनएस विशाखापट्टणम’ आणि आयएनएस वेल, आयएनएस चेन्नई, दिल्ली, तेग आणि शिवालिक श्रेणीतील तीन युद्धनौकांचाही अंतर्भाव आहे. चेतक, एएलएच, सी किंग्स, डॉर्निअर, मिग २९, हॉक ही लढाऊ विमाने हवाई संचलनात सहभागी झाली. नौदलाच्या तारिणी, बुलबुल, हरियाल, कडलपुरा आणि नीलकंठ या सागरी नौकानयनात वापरल्या जाणाऱ्या नौकांनी गोवा ते विशाखापट्टणम हे १६०० किलोमीटरचे अंतर पार करीत सहभाग नोंदविला.

संचलनाची वैशिष्टय़े काय?

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत हे ताफा संचलन होत असल्याने त्यास विशेष महत्त्व देण्यात आले. लष्करी सामग्रीसाठी परकीय अवलंबित्व कमी करण्यासाठी मध्यंतरी लष्करी सामग्रीच्या खरेदी धोरणात बदल केले गेले. भारतीय बनावटीच्या सामग्रीला प्राधान्य दिले जात आहे. ही बाब यंदाच्या संचलनात ठळकपणे अधोरखित करण्यात आली. ताफ्यात सहभागी एकंदर ६० पैकी ४७ युद्धनौका आणि पाणबुडय़ा या भारतीय बनावटीच्या आहेत. नौदलात अलीकडेच समाविष्ट झालेली उपकरणे आणि नौका प्रदर्शित करण्यात आली. साहसी भावना, जोखीम क्षमता वृद्धिंगत करणाऱ्या नौकानयनातील नौकांच्या पथकात सहा महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

आतापर्यंत किती वेळा संचलन उपक्रम झाले?

राष्ट्रपतींच्या कार्यकाळात एकदा ताफा संचलन उपक्रम पार पडतो. सोमवारचा उपक्रम हा १२ वा ठरला. नौदलाचे पहिले ताफा संचलन १९५३ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली झाले. त्या वेळी २५ युद्धनौका आणि सात अन्य जहाजे सहभागी झाली होती. त्यानंतरचे संचलन राष्ट्रपतींच्या उपस्थितीत झाले नाही. परंतु १९६६ मध्ये, भारताच्या पहिल्या विमानवाहू नौका आयएनएस विक्रांतची पाहणी तत्कालीन राष्ट्रपती एस. राधाकृष्णन यांनी केली होती. तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी नौदलाच्या ताफ्याची पाहणी केली. त्यानंतर मात्र हा उपक्रम ‘राष्ट्रपतींचे ताफा संचलन’ म्हणूनच आयोजित होऊ लागला. एकदा या उपक्रमात १२ वर्षांचे अंतर पडले. तत्कालीन राष्ट्रपती आर. वेंकटरमन यांच्या उपस्थितीत १९८९ मध्ये संचलन झाले, नंतर थेट २००१ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या उपस्थितीत तो झाला.  २००१ आणि २०१६ या वर्षांत म्हणजे दोन वेळा आंतरराष्ट्रीय ताफा संचलन (आयएफआर) उपक्रम झाले. तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची कारकीर्द संपत असताना आयोजित आंतरराष्ट्रीय ताफा संचलनात ५० हून अधिक देश सहभागी झाले होते. तेव्हा १०० हून अधिक युद्धनौकांचा संचलनात सहभाग होता. भारतीय नौदलही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, इंडोनेशिया आदी ठिकाणी आंतरराष्ट्रीय ताफा संचलनात सहभागी झाले आहे.

..मग ताफा संचलनाचे सामरिक साध्य काय?

तीनही सैन्य दलाचे सरसेनापती असणाऱ्या राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ ताफा संचलन आयोजित करण्याची भारतीय नौदलाची परंपरा आहे. नौदलाच्या भात्यात समाविष्ट सर्वच युद्धनौका, पाणबुडी वा गस्ती वाहने या निरीक्षण उपक्रमात सहभागी होत नाहीत. एकाच वेळी सर्व नौकांना एकाच ठिकाणी एकत्रित करणे सयुक्तिक नसते. अनेक नौका नियमित जबाबदाऱ्या पार पाडत असतात. सद्य:स्थितीत नौदलाच्या ताफ्यात एकूण १३२ युद्धनौका आणि पाणबुडय़ा आहेत. पुढील पाच वर्षांत त्यांची संख्या १७० वर नेण्याचे लक्ष्य आहे. या पाहणीत राष्ट्रपती हे भारतीय नौदल व तटरक्षक दलाच्या नौकांची पाहणी करतात. वेगवेगळय़ा क्षमतेच्या युद्धनौका, पाणबुडय़ा, उपकरणांचे सादरीकरण, लढाऊ विमानांच्या चित्तथरारक कसरतीतून नौदल कालपरत्वे वाढलेल्या सामर्थ्यांचे दर्शन जगाला घडवते. भारतीय नौदल देशाच्या संरक्षणासाठी सज्ज असल्याची प्रचीती दिली जाते. हा ‘सोहळा’च, पण अशियाई आणि प्रशांत महासागरावरील प्रभुत्व अधोरेखित करण्यास तो महत्त्वाचा ठरतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained presidents fleet review zws 70 print exp 0122
First published on: 22-02-2022 at 03:32 IST