महेश देशकर
अमेरिकेतील दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या राजकीय परीक्षेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना महापौर पदाच्या निवडणूक निकालाने जबर धक्का बसला आहे. गेल्या वर्षभरात बेधडक निर्णयांनी जनतेला आश्चर्यचकित करणाऱ्या ट्रम्प यांना राजकीय परीक्षेत अपयशाला सामोरे जावे लागले. आधी ट्रम्प यांच्या मनमानी निर्णयामुळे जगातील अन्य देश त्रस्त होते आता अमेरिकेतच शटडाऊनमुळे गंभीर संकट उभे असताना ‘समोसा कॉकस’ गटाने महापौर व गव्हर्नर निवडणुकीत शड्डू ठोकून ट्रम्प यांच्या अडचणीत वाढच केली आहे.  

पहिल्या राजकीय चाचणीत नापास

न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीत अध्यक्ष ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा पराभव झाला. शिवाय, विरोधी डेमोक्रेटिक उमेदवारांनी व्हर्जिनिया आणि न्यू जर्सी या सह इतर राज्यांमधील गव्हर्नरपदाच्या निवडणुकीतही जोरदार विजय मिळवला. या निवडणुकीनंतर अमेरिकेच्या ५० राज्यांपैकी २४ राज्यांमध्ये डेमोक्रेटिक गव्हर्नर असतील आणि २६ राज्यांमध्ये रिपब्लिकन गव्हर्नर असतील. ट्रम्प यांच्या पक्षाचे वर्चस्व सातत्याने कमी होत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय, पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्यावधी निवडणुका राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

विरोधकांकडून ट्रम्प कोंडीच

स्थलांतरित, व्हिसा, व्यापार कर, शटडाऊन आदी मुद्यांवर ट्रम्प यांची कोंडी होत असतानाच आता सेनेटनेही ‘फिलीबस्टर’ (कोंडीफोड) पद्धती रद्द करण्यास नकार दिला आहे. ६० मतांऐवजी ५१ मतांनी कायदे मंजूर करवून घेण्याची ट्रम्प यांची मागणी होती. इथेही ट्रम्प तोंडघशी पडल्याची चर्चा आहे. अमेरिकेतील शटडाऊनमुळे देशाच्या विकास दरातही घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वोच्च सभागृह सेनेटमध्ये आरोग्याच्या मुद्यावर १४वेळा मतदान झाल्यानंतरही बहुमताअभावी विधेयक मंजूरच झालेले नाही. या मुद्यावर डेमोक्रेटिक आणि रिपब्लिकन या दोन्ही पक्षांमध्ये मतभेद आहेत. 

‘समोसा कॉकस’ची चर्चा जोरात 

न्यूयॉर्कचे नवनियुक्त महापौर झोहरान ममदानी, व्हर्जिनियाच्या गव्हर्नर गझाला हाशमी आणि सिनसिनाटी शहराचे महापौरपदी आफताब पुरेवाल यांच्या निवडीनंतर अमेरिकेच्या राजकारणात भारतीय वंशाच्या नागरिकांचा दबदबा वाढला असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भारतीय वंशाच्या दोन मुस्लिम नेत्यांनी अमेरिकेच्या निवडणुकीत विजय मिळवून इतिहास घडविला. या निवडीनंतर अमेरिकन-भारतीय समुदायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘समोसा कॉकस’ ची चर्चा जोमात आहे. अमेरिकेत राज्य स्तर असो वा केंद्रीय स्तर, निवडून येणाऱ्या भारतीय- अमेरिकन समुदायाला ‘समोसा कॉकस’ संबोधले जाते. हा गट अमेरिकेच्या राजकारणात भारतीय – अमेरिकनांच्या वाढत्या प्रभावाचे प्रतीक आहे.

प्रतिनिधी सभेत वाढती संख्या

अमेरिकन काँग्रेसमध्ये भारतीय-अमेरिकन खासदारांच्या एका गटाला दिलेले हे टोपण नाव आहे. मूळ दक्षिण आशियाई विशेषत: भारतीय वंशाची प्रतिनिधी सभेत वाढती संख्या आहे. सन २०१६ मध्ये अमेरिकन कायदेमंडळात सर्वप्रथम भारतीय वंशाचे पाच सदस्य निवडून आले होते. त्यावेळी प्रतिनिधी सभेचे सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी सर्वप्रथम या गटाला ‘समोसा कॉकस’ असे नाव दिले आणि ते अल्पावधीत नावारूपास आले. याच गटाच्या एक सदस्य कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदीही आरूढ झाल्या. या गटात व्हर्जिनिया आणि ईस्ट कोस्ट येथून प्रतिनिधी सभेसाठी निवडून आलेले सुहास सुब्रह्मण्यम पहिले भारतीय अमेरिकन आहेत. अमी बेरा २०१३ पासून कॅलिफोर्नियाचे प्रतिनिधित्व करीत असून त्यांनी सातवेळा विजय मिळविला आहे. व्यवसायाने डॉक्टर असलेले अमी बेरा अमेरिकन संसदेत सर्वात वरिष्ठ भारतीय -अमेरिकन आहेत. सुहास सुब्रह्मण्यम, अमी बेरा, श्री ठाणेदार, रो खन्ना, राजा कृष्णमूर्ती आणि प्रमिला जयपाल अमेरिकन काँग्रेसमध्ये प्रतिनिधित्व करतात. हे सर्व जण डेमोक्रेटिक पक्षाचे आहेत.

‘देशी’ सदस्यांची संख्या अधोरेखित 

कृष्णमूर्ती यांनी दिलेल्या या टोपण नावाचा उद्देश अमेरिकन काँग्रेसमध्ये ‘देशी’ नामदारांची संख्या अधोरेखित करण्याचा होता. या गटात अमेरिकन काँग्रेसचे कनिष्ठ सभागृह आणि सेनेटमधील भारतीय वंशाच्या खासदारांचा समावेश आहे. हा गट भारतीय-अमेरिकन समुदायाशी संबंधीत मुद्यांसह संयुक्त राज्य अमेरिकेतील दक्षिण आशियाई नागरिकांच्या हितासाठी एकदिलाने काम करतात. ‘समोसा’ हा नाश्त्याचा शब्द असला तरी ‘कॉकस’चा अर्थ समान विचारसरणी असलेल्या नागरिकांशी संबंधित आहे. 

६० जणांचा समावेश, सहा जण प्रतिनिधी सभेत

अमेरिकेची लोकसंख्या जवळपास ४० कोटी आहे त्यापैकी एक टक्क्यांपेक्षा अधिक भारतीय वंशाचे नागरिक आहेत. ४३५ सदस्यीय अमेरिकन काँग्रेसमध्ये भारतीय वंशाच्या सदस्यांची संख्या ६ वर पोहोचली असून यासह अमेरिकेच्या इतिहासात भारतीय वंशाच्या सदस्यांची संख्या सर्वाधिक झाली आहे.   ‘समोसा कॉकस’मध्ये रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक दोघांचाही समावेश आहे. एक दशकांपूर्वी या यादीत अर्धा डझनपेक्षाही कमी नावे होती तथापि आजघडीला जवळपास ६० नावे या समुदायाशी संबंधित असून सहा जण अमेरिकन प्रतिनिधी सभेचे सदस्य आहेत. यात विवेक रामास्वामी आणि एफबीआयचे संचालक काश पटेल यांचा समावेश नाही.

मुख्य उद्देश

समोसा कॉकस केवळ सांस्कृतिक प्रतिनिधित्वच नव्हे तर भारतीय समुदायाला प्रभावित करणाऱ्या कायदेशीर मुद्यांवर लढा देणारे व्यासपीठही आहे. भारतीय-अमेरिकन  नागरिक तसेच दक्षिण-आशियाई हितांचे संरक्षण करणे, आरोग्य सेवेसह अन्य मुद्यांवरही मतप्रदर्शन करीत असतो.  हा गट भारतीय-अमेरिकन नागरिकांच्या हितांचे संरक्षण करण्यासह अमेरिकन धोरण निर्मितीतही सहभागी असतो. उदाहरणच द्यायचे झाले तर भारताच्या संसदेत ज्यावेळी अमेरिकन सरकारवर मोदी सरकार पाडण्यासाठी ओसीसीआरपीद्वारे (पत्रकारांचा एक गट) बनावट बातम्या प्रसारित करणे तसेच काँग्रेससोबत संगनमत केल्याचा आरोप केला त्यावेळी याच समोसा कॉकसने आपली ठाम भूमिका मांडली होती. यामुळेच अमेरिकेच्या राजकारणात या गटाचे वर्चस्व दिसून येत आहे.