खगोलशास्त्रज्ञांना पृथ्वीपासून पाच अब्ज प्रकाशवर्षे अंतरावर कृष्णविवर सापडले असून कदाचित हे आतापर्यंतचे सर्वात मोठे कृष्णविवर असावे, असा दावा त्यांनी केला. या कृष्णविवराचे वस्तुमान ३६ अब्ज सूर्यांइतके आहे. या कृष्णविवराची वैशिष्ट्ये काय, त्याचे वस्तुमान कशा प्रकारे मोजले जाते, याचा आढावा…
भल्यामोठ्या कृष्णविवराचा शोध कसा लागला?
खगोलशास्त्रज्ञांनी पाच अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या एका दूरच्या आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या एका मोठ्या अजस्र कृष्णविवराचा शोध लावला आहे. या कृष्णविवराचे वस्तुमान ३६ अब्ज सूर्यांइतके असून हे सर्वाधिक महाकाय कृष्णविवर असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे. ‘कॉस्मिक हॉर्सशू’ या गुरुत्वाकर्षण लेन्सिंग सिस्टिमच्या मध्यभागी वसलेले हे अतिभव्य कृष्णविवर सध्याच्या वैज्ञानिक समजुतीच्या सीमा ओलांडते.
या कृष्णविवराची वैशिष्ट्ये काय?
या महाकाय कृष्णविवराचा आकार विश्वातील आतापर्यंत आढळलेल्या बहुतेक कृष्णविवरांपेक्षा कित्येक पट अधिक आहे. आपली आकाशगंगा ‘Sagittarius A’च्या मध्यभागी असलेल्या कृष्णविवरापेक्षा नव्याने सापडलेले कृष्णविवर १० हजार पट जड आहे. या कृष्णविवरामध्ये ४.१५ दशलक्ष सूर्यांचे वस्तुमान आहे. हे महाकाय कृष्णविवर पृथ्वीपासून पाच अब्ज प्रकाशवर्षे अंतरावर आहे. ‘‘हे आतापर्यंत सापडलेल्या टॉप १० सर्वात मोठ्या कृष्णविवरांपैकी एक आहे आणि कदाचित सर्वात मोठे आहे,’’ असे खगोलतज्ज्ञ आणि इंग्लंडमधील पोर्ट्समाऊथ विद्यापीठाचे प्राध्यापक थॉमस कोलेट म्हणाले. आकाराने प्रचंड असूनही नव्याने सापडलेल्या कृष्णविवराला ‘सुप्त’ कृष्णविवर असे संबोधले गेले आहे, म्हणजेच ते त्याच्या सभोवतालच्या पदार्थांना सक्रियपणे गिळंकृत करत नाही. विशेष म्हणजे, ‘Sagittarius A’ हेदेखील एक सुप्त कृष्णविवर आहे.
कृष्णविवराचे वस्तुमान कसे मोजले?
‘‘इतर बहुतेक कृष्णविवरांच्या वस्तुमानाचे मोजमाप अप्रत्यक्ष असते आणि त्यात बरीच अनिश्चितता असते, त्यामुळे आम्हाला खरोखरच सर्वात मोठे कोणते हे निश्चितपणे माहीत नाही. तथापि आमच्या नवीन पद्धतीमुळे आम्हाला या कृष्णविवराच्या वस्तुमानाबद्दल अधिक खात्री मिळाली आहे,’’ असे कोलेट यांनी सांगितले. गुरुत्वाकर्षण लेन्सिंग आणि तारकीय गतिशास्त्र (आकाशगंगेतील ताऱ्यांच्या हालचालीचा आणि कृष्णविवरांभोवती त्यांच्या हालचालीचा वेग आणि मार्गाचा अभ्यास) यांच्या संयोजनाचा वापर करून संशोधकांनी हे महाकाय कृष्णविवर शोधण्यात यश मिळवले.
आतापर्यंत सापडलेली मोठी कृष्णविवरे
शास्त्रज्ञांचे असे मत आहे की, विश्वातील प्रत्येक आकाशगंगेच्या मध्यभागी एक महाकाय कृष्णविवर असते. मोठ्या आकाशगंगांमध्ये मोठ्या आकाराचे कृष्णविवर असते. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियातील खगोलतज्ज्ञांना एका महाकाय कृष्णविवराचा शोध लागला. सूर्याच्या वस्तुमानापेक्षा १७ पट अधिक वस्तुमान या कृष्णविवराचे होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शास्त्रज्ञांनी एक सुपरमॅसिव्ह कृष्णविवर शोधले, जे अभूतपूर्व वेगाने पदार्थ गिळंकृत करत होते. LID-568 नावाचे हे कृष्णविवर जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (JWST) आणि चंद्रा एक्स-रे वेधशाळेतील डेटा वापरून शोधण्यात आले. ‘TON 618’ हेही एक मोठ्या ज्ञात कृष्णविवरांपैकी एक आहे, जे आकाशगंगेच्या मध्यभागी आहे. ‘NGC 1277’ नावाचे आकाशगंगेच्या मध्यभागी असलेले कृष्णविवर आहे, जे आकाशगंगेच्या आकाराच्या तुलनेत खूप मोठे आहे.