Ancient Buddhist Treasures Unearthed in Temple: हा शोध वाट धम्मचक्र सेमराम या मंदिरात लागला. हे मंदिर गौतम बुद्धांच्या निर्वाण मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. ही मूर्ती इ.स. ६५७ मध्ये कोरली असावी, असं मानलं जात. तिचं डोकं दक्षिणेकडे आणि चेहरा पूर्वेच्या दिशेने आहे. त्यामुळे या शोधाला ऐतिहासिक गूढतेचं वलय लाभलं आहे.
खरी आश्चर्यकारक घटना मात्र भूमिगत ड्रेनेज यंत्रणा बसवण्याच्या दरम्यान घडली. या कामादरम्यान कामगारांना कालांतराने खराब झालेलं एक मातीचं भांडं सापडलं. त्या भांड्यात सोन्याच्या अंगठ्या, चांदीचे कानातले, कांस्याचे वर्तुळाकार झुमके यासारखे अनेक मौल्यवान दागदागिने सापडले. या वस्तू अनेक शतकांपूर्वी बुद्धांना अर्पण केलेल्या होत्या.
हे मंदिर थायलंडमध्ये आहे. या अनपेक्षित शोधानंतर पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी पुढे खोदकाम सुरू केलं आणि आणखी अनेक वस्तू उजेडात आल्या. यामध्ये सर्वात लक्षणीय शोध म्हणजे एक सोन्याचा पातळ पत्रा, हा पत्रा रिपुस्से तंत्राने तयार करण्यात आला होता आणि त्यावर वितर्क मुद्रा धारण केलेला बुद्ध कोरलेला होता. ही मुद्रा शिक्षण व ज्ञानाचे प्रतीक मानली जाते. सुमारे ३.१५ बाय ४.९ इंच आकाराची ही कलाकृती द्वारवती काळातील प्रगत धातुकला कौशल्याचं प्रतीक आहे.
थायलंडच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची एक झलक
वाट धम्मचक्र सेमराम हे मंदिर थायलंडच्या सांस्कृतिक इतिहासाशी खोलवर जोडलेलं आहे. राजा रामराज यांच्या कारकिर्दीत उभारलेलं हे मंदिर केवळ निर्वाण बुद्धमूर्तीसाठीच प्रसिद्ध नाही, तर येथे एक वालुकाश्म दगडात कोरलेले धम्मचक्र म्हणजेच धर्मचक्र देखील आहे. या शिल्पामध्ये बोधी आणि वडाच्या पवित्र झाडांशी निगडित वनदेवतांचे चित्रण आहे. हे त्या काळातील आध्यात्मिक आणि कलात्मक परंपरांची झलक देतं.
अलीकडेच सापडलेल्या वस्तू पुढील अभ्यासासाठी फीमाई राष्ट्रीय संग्रहालयात हलवण्यात आल्या आहेत. यामध्ये धातूपासून तयार केलेल्या बुद्ध मूर्ती, मृत्तिकेचे ताईत, काचेच्या मण्यांचे दागिने आणि कोरलेल्या दगडांच्या पट्ट्यांचा समावेश आहे. या वस्तू आता एका मोठ्या संग्रहाचा भाग असून, त्या त्या काळातील प्रगत कारागिरी आणि धार्मिक प्रतिकशास्त्र यांचं महत्त्वपूर्ण प्रमाण देतात. ते आग्नेय आशियाच्या इतिहासात एक स्वतंत्र ओळख निर्माण करतात.
कला आणि सांस्कृतिक देवाणघेवाण: द्वारवती काळाचा सखोल आढावा
इ.स. ६ व्या ते ११ व्या शतकांदरम्यानचा द्वारवती काळ हा आग्नेय आशियात सांस्कृतिक व कलात्मक भरभराटीचा कालखंड मानला जातो. वाट धम्मचक्र सेमराम येथे सापडलेल्या प्राचीन अवशेषांमुळे त्या काळातील सूक्ष्म कारागिरी आणि गुंतागुंतीच्या सामाजिक संरचनांवर प्रकाश पडतो. सोन्याच्या वस्तूंमध्ये वापरण्यात आलेली रिपुस्से तंत्राची कल्पकता त्या काळातील उच्च दर्जाच्या धातुकलेचं उदाहरण आहे.
या शोधांपैकी सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे आग्नेय आशियातील वेगवेगळ्या प्रदेशांतील सांस्कृतिक देवाणघेवाणीचा पुरावा. सापडलेल्या कलावस्तूंच्या शैली व प्रतिकांवरून शेजारील संस्कृतींचा प्रभाव स्पष्ट दिसतो. त्यामुळे थायलंड हा सांस्कृतिक व धार्मिक संवादाचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू होता, हे अधोरेखित होतं. या कलाकृतींमध्ये हिंदू व बौद्ध घटकांचा सुरेख संगम दिसतो. जो त्या काळात विचार, वस्तू आणि कलापरंपरा मोठ्या अंतरावर एकमेकांमध्ये सामायिक होण्याचं द्योतक आहे.
द्वारवती काळाचा टिकून राहिलेला वारसा
वाट धम्मचक्र सेमराम येथील शोधांनी द्वारवती काळातल्या सांस्कृतिक आणि धार्मिक प्रगतीची मोलाची झलक मिळवून दिली आहे. हा काळ आग्नेय आशियातील अनेक सांस्कृतिक व धार्मिक घडामोडींचा पाया रचणारा होता. सापडलेल्या कलावस्तू केवळ त्या काळातील कलात्मक परिपक्वतेचे द्योतक नाहीत, तर त्या काळात धर्म, कला आणि दैनंदिन जीवन यांच्यातील गुंतागुंतीच्या नातेसंबंधालाही त्या अधोरेखित करतात.
या अलीकडील शोधांमुळे आपल्याला हे लक्षात येतं की, प्राचीन संस्कृतींचा प्रभाव आजही आधुनिक संस्कृतींवर खोलवर आहे. जेव्हा आपण भूतकाळाचा शोध घेतो, तेव्हा मानवी इतिहासाच्या घडणीत निर्णायक ठरलेल्या सांस्कृतिक देवाणघेवाण व कलापरंपरांची अधिक सखोल समज प्राप्त होते. वाट धम्मचक्र सेमराम येथील हे प्राचीन अवशेष म्हणजे केवळ भूतकाळातील खजिना वा भूतकाळाचे साक्षीदार नाहीत, तर ते प्राचीन समाजांचा टिकून राहिलेला प्रभाव दाखवतात.