Devendra Fadnavis Rudaali comment on Uddhav Thackeray’s Speech: मराठी भाषा गौरवाच्या मेळाव्यात ‘रुदाली’ भाषण ऐकायला मिळाले अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची खिल्ली उडवली.
फडणवीस म्हणाले, “मला सांगण्यात आले होते, की विजयी मेळावा होणार आहे. पण, त्या ठिकाणी तर रुदालीचे भाषणही झाले. मराठीबद्दल एक शब्दही न बोलता आमचे सरकार गेले, आमचे सरकार पाडले, आम्हाला सत्ता द्या, निवडून द्या असा प्रकार तिथे सुरू होता. हा काही मराठीचा विजय नव्हता, ही रुदाली होती. या रुदालीचे दर्शन त्या ठिकाणी आपण घेतले आहे.”
रुदाली म्हणजे पैसे घेऊन दुसऱ्याच्या मृत्यूवर रडणारी बाई. ही परंपरा राजस्थानमध्ये आढळते. या स्त्रियांच्या परिस्थितीवर भाष्य करणारा सिनेमा २० वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. तर, दुसरीकडे मेळाव्यात २० वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आले. त्याच पार्श्वभूमीवर ‘रुदाली’ ही परंपरा नेमकी काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरणारं आहे.
- भारतीय संस्कृती ही बहुरंगी आहे. भारतात प्रांतापरत्त्वे वेगवेगळ्या प्रथा-परंपरा आढळतात. याच परंपरांच्या यादीतील एक समुदाय म्हणजे रुदाली. हा राजस्थानातील एक विशेष समुदाय आहे. रुदाली या प्रामुख्याने काळ्या पोशाखात दिसतात. मृत्यू किंवा शोक दर्शवण्यासाठी त्या काळा रंग परिधान करतात.
- राजपूत, ठाकूर कुटुंबांत पुरुषाचा मृत्यू झाला की, शोक व्यक्त करण्यासाठी त्यांना बोलावलं जात असे. हा समुदाय प्रामुख्याने सिरोही, जोधपूर, बाड़मेर आणि जैसलमेर येथे आढळतो. या समुदायातील स्त्रिया या विधवा किंवा कुमारिका असतात. त्या प्रामुख्याने गांजू, दुस्साड, दरोगी किंवा भिल्ल या जातींशी संबंधित असतात.
- उच्च वर्णीय राजपूत किंवा ठाकूर समाजातील स्त्रिया उघड दुःख व्यक्त करू शकत नव्हत्या. त्यामुळे एखादी व्यक्ती मृत झाली की, त्यांना घरातच राहावं लागतं असे. अशा वेळी रुदाली सार्वजनिकरीत्या शोक व्यक्त करत. व्यक्ती गेल्यानंतर मृत व्यक्तीच्या घरी येऊन त्या १२ दिवस दररोज मोठ्याने रडतात. त्यामुळे कुटुंबाला त्या दुःखातून सावरण्यास मदत होत असे. सर्वात मोठ्याने रडणारी रुदाली तिच्या कामात चांगली समजली जात असे.
- राजस्थानसारख्या ठिकाणी रुदाली या सुदैवी मानव्या की दुर्दैवी हा एक महत्त्वाचा विषय आहे. या भागात मुलगी जन्माला येणं हे पाप समजलं जातं. त्यातही ती विवाहबाह्य संबंधातून जन्मलेली असेल तर जन्मतः तिला यमसदनी पोहोचवले जाते. परंतु, रुदालीच्या मुली त्या बाबतीत अपवाद ठरतात. रुदाली समुदायात विवाह होतात. परंतु, वैधव्य आलं की, त्या स्त्रिया रुदाली म्हणून काम करतात. अनेकदा विवाहबाह्यसंबंधांसाठी जमीनदारांकडून त्यांचा वापर केला जात असे. त्या संबंधातून मुलगी जन्माला आली की, ती पुढची रुदाली ठरत असे. मुलगा जन्माला आला की, तो त्या जमीनदाराच्या घरात सेवकाचं काम करत असे.
- रुदालींचे नियम व रीतिरिवाज भागानुसार थोडेफार वेगळे असतात. बहुतांश रुदाली विधवा असतात, पण निधी डागर कुंदलिया आपल्या ‘द लॉस्ट जनरेशन’ या पुस्तकात लिहितात की, काही रुदाली या ठाकुरांच्या घरी काम करणाऱ्या स्त्री सेविकाही होत्या.
- विधवा असल्यामुळे रुदाली समाजश्रेणीच्या सर्वात खालच्या पातळीवर ठेवल्या जात आणि ते यांना नीच वागणूक दिली जात असे. बहुतेक राजपूत स्त्रियांप्रमाणे त्यांनाही घरात राहण्याचे आदेश असतात. त्यांची वस्ती गावाच्या बाहेर, समाजापासून पूर्णतः वेगळी असे. त्यांचे इतरवेळी दर्शन होणे निषिद्ध मानले जात असे.
विधवा स्त्रीला नवऱ्याचा मृत्यूनंतर किंमत उरत नाही, असे मानले जाते. मात्र, रुदालींना एक स्वतंत्र ओळख असते. गावातील प्रतिष्ठित पुरुषाचा मृत्यू झाल्यावर रुदालींना बोलावलं जातं. हिंदीत ‘मातम’ म्हणतात तसा शोक रुदालींकडून व्यक्त केला जात असे. त्या जमिनीवर, छातीवर हात आपटतात आणि मोठ्याने ओरडत रडतात. गावातील लोकांचा असा समज आहे की, जितका मोठा शोक, तितकी सामाजिक प्रतिष्ठा अधिक. त्यामुळे रुदाली कसलीही शंका न ठेवता रडतात, छातीवर हात आपटतात. त्या शोकगीतंही गातात.

भारत आधुनिकतेकडे झपाट्याने वाटचाल करत असताना रुदाली नवीन उपजीविकेच्या शोधात आहेत. निधी कुंदलिया लिहितात की, काही रुदाली स्त्रियांना अन्न व निवारा मिळतो. यात प्रभावशाली कुटुंबांमध्ये राहणाऱ्या रुदालींचा समावेश होतो. एका अशाच कुटुंबातील पुरुष सेवकाने सांगितले की, त्या रुदाली इतर समुदायांतील स्त्रियांच्या तुलनेत बऱ्याच बऱ्यापैकी स्थितीत असतात. त्या स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतात.
पूर्वी राजस्थानात राजघराणी आणि जमीनदारांचं साम्राज्य होतं, तेव्हा रुदाली परंपरा खूप मोठ्या प्रमाणात पाळली जात होती. परंतु, भारत स्वतंत्र झाल्यानंतर आणि आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना, अनेक सांस्कृतिक परंपरा मागे पडल्या. त्यामुळेच आज रुदाली हा विषय सामान्य लोकांसाठी एक अज्ञात आणि रहस्यमय ठरला आहे.
‘रुदाली’ (१९९३)
‘रुदाली’ (१९९३) हा कल्पना लाजमी दिग्दर्शित एक हिंदी चित्रपट आहे. हा चित्रपट महाश्वेता देवी यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटात डिंपल कपाडियाने दुःखात असूनही कधीही न रडणारी शनीचरी या महिलेची भूमिका साकारली आहे. तिचं बालपण तिच्या वडिलांच्या मृत्यूने आणि आईच्या परित्यागाने सुरू होतं. नंतर लग्न एका दारूच्या आहारी गेलेल्या माणसाशी होतं. आयुष्यभर ती केवळ पुरुषी छळ, जातीय शोषण आणि सामाजिक अन्याय सहन करत राहते. पण, कधीच रडत नाही.

शनीचरीचं आयुष्य इतकं कठीण असतानाही समाज तिच्याकडून ‘रुदाली’ म्हणजेच व्यावसायिक शोककर्ती म्हणून रडण्याची अपेक्षा करतो. अशा वेळी तिची भेट भिकनी नावाच्या दुसऱ्या रुदालीशी होते. जी तिला आपली भावना व्यक्त करण्याची प्रेरणा देते. या संवादातून शनीचरीच्या आत खोल दडलेल्या वेदना व्यक्त होतात.
चित्रपटात भूपेन हजारिकांनी संगीत दिलं असून ‘दिल हूं हूं करे’, ‘झूठी मूठी मिठवा’ यांसारखी गाणी आजही गहिवर निर्माण करतात. गुलजार यांनी लिहिलेल्या या गाण्यांतून स्त्रीमनातील संवेदना प्रभावीपणे उमटतात. डिंपल कपाडियाला या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

‘रुदाली’ हा केवळ चित्रपट नव्हे, तर स्त्रीच्या अंतर्मनातील वेदनेचं, समाजाच्या दांभिकतेचं आणि आर्थिक गरजांपोटी भावनांचं बाजारीकरण कसं होतं याचं सखोल चित्रण आहे. डिंपल कपाडियाच्या अभिनयाने हा चित्रपट भारतीय समांतर चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. महत्त्वाचे म्हणजे तब्बल २० वर्षांनंतर या चित्रपटामुळे डिंपलला व्यावसायिक यश मिळालं आणि त्यानंतर आजतागायत तिने अभिनेत्री म्हणून मागे वळून पाहिलेले नाही.
- राजकारणात शब्दांचा खेळ सुरू असतानाच, ‘रुदाली’ या प्राचीन परंपरेचा उल्लेख पुन्हा एकदा सार्वजनिक चर्चेत आला आहे. राजस्थानातील रुदाली परंपरा ही केवळ शोकाच्या अभिव्यक्तीची सांस्कृतिक पद्धत नसून, ती स्त्रीच्या दु:खाची, तिच्या सामाजिक स्थानाची आणि सत्ताकेंद्रांपासून तिच्या दूर लोटण्यात आलेल्या अस्तित्वाची जिवंत साक्ष आहे. कालांतराने, ही परंपरा मोठ्या पडद्यावर डिंपल कपाडियाच्या ‘रुदाली’मधून समोर आली आणि तिने स्त्री-अभिव्यक्तीच्या अर्थाला नवसंवेदनशीलतेने स्पर्श केला
- आज, जेव्हा राजकीय व्यासपीठावर ‘रुदाली’सारखा शब्द एक टीका म्हणून वापरला जातो, तेव्हा या शब्दाच्या मूळ सामाजिक संदर्भाची जाणीव असणं अधिक गरजेचं आहे. कारण ‘रुदाली’ ही केवळ रडणारी बाई नाही, तर ती इतिहास, लिंगभाव, सामाजिक अन्याय आणि सांस्कृतिक लय या सगळ्यांची जिवंत साक्ष आहे. एक विचित्र योगायोग म्हणजे रुदालीच्या निमित्ताने तब्बल २० वर्षांनंतर डिंपलला व्यावसायिक यश मिळाले आणि त्यानंतर यशाची कमान चढतीच राहिली. राज व उद्धव ठाकरे बंधूही तब्बल २० वर्षांनंतर एकत्र आले आहेत. त्यांनाही यश मिळणार आणि यशाची कमान चढतीच राहणार का, हे येणारा काळच ठरवेल!