हिंदू धर्मशास्त्र आणि चर्च हे समीकरण ऐकायला थोडं वेगळं वाटत असलं तरी युरोपातील एका चर्चमध्ये मनुस्मृती या हिंदू धर्मशास्त्राची प्रतिकृती आजही आपण पाहू शकतो. कदाचित अनेकांना या गोष्टीचं प्रचंड आश्चर्यही वाटू शकतं, परंतु ही वस्तुस्थिती आहे. मनुस्मृतीच्या प्रतिकृतीचे थेट प्रदर्शन लंडनमधील सेंट पॉल कॅथेड्रल चर्चमध्ये करण्यात आले. मनुस्मृतीची ही प्रतिकृती विल्यम जोन्स यांच्या हातात दाखवण्यात आली आहे. त्यामुळे चर्चमध्ये मनुस्मृती आली कशी, हा आजही चर्चेचा विषय ठरतो आहे. त्याच पार्श्वभूमीवर ख्रिश्चन चर्चमध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या पहिल्या वहिल्या मनुस्मृतीचा घेतलेला हा वेध !

अधिक वाचा: विश्लेषण: अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा शोर्मा भारतात कुठून आला?

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
What Kiran Mane Said About Manusmruti?
“सुंदर स्त्री हीन जातीतली असली तरी तिला भोगण्यात…”, ‘मनुस्मृती’तलं वाक्य सांगत किरण मानेंची खरमरीत पोस्ट
Nitin Gadkari Kundali Predictions
मोदींच्या पंच्याहत्तरीच्या चर्चेत ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; २०२६ नंतर गडकरींच्या कुंडलीत राजकीय बहुमानाचा योग
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
unique wedding card Marriage Card viral on social media
अरे बापरे! लग्नपत्रिका वाचूनच घाबरले पाहुणे; लग्नाला जायचं की नाही? VIRAL लग्नपत्रिका पाहून पोट धरुन हसाल
What Devendra Fadnavis Said About Modi wave ?
‘लोकसभा निवडणुकीत मोदी लाट का दिसत नाही?’, देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आता भाजपाचा मतदार..”

कोण होते विल्यम जोन्स?

चर्चमध्ये मनुस्मृती हा विचित्र विरोधाभास उलगडण्याआधी, विल्यम जोन्स कोण होते हे जाणून घेणे आवश्यक आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे भारतीय पुरातत्त्वाच्या पायाभरणीत या विद्वानाचा मोलाचा वाटा होता. तसेच लंडन मधील चर्चमध्ये प्रदर्शित झालेल्या मनुस्मृतीमागेही हीच व्यक्ती आहे. विल्यम जोन्स (१७४६-१७९४) हे कलकत्ता येथील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्याशिवाय ते भारतीय संस्कृती आणि इतिहासाचे गाढे अभ्यासकही होते. १७८४ साली कलकत्ता येथे एशियाटिक सोसायटी स्थापन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारतात असताना त्यांनी संस्कृत आणि पर्शियन भाषा शिकून घेतली जेणेकरून त्यांना मूळ ग्रंथांचा अभ्यास स्वतः करता येईल. त्यांचा मोहम्मदन लॉ ऑफ इनहेरिटन्स, १७९२ साली आणि इन्स्टिट्यूट ऑफ हिंदू लॉ हा अनुवाद १७९६ साली प्रकाशित झाला. संस्कृत, लॅटिन, ग्रीक आणि पर्शियन यासारख्या अनेक युरोपियन आणि आशियाई भाषांचे मूळ एकच असल्याचा सिद्धांत त्यांनी मांडला. हा भाषा समूह प्रोटो इंडो-युरोपियन म्हणून ओळखला गेला. विशेषत: संस्कृतबद्दल त्यांना प्रचंड प्रेम होते. संस्कृत भाषा कितीही प्राचीन असली तरी या भाषेची रचना अप्रतिम आहे, ग्रीक आणि लॅटीनपेक्षाही संस्कृत परिपूर्ण भाषा असल्याचे मत त्यांनी मांडले. सर विल्यम जोन्स यांनी मनुस्मृतीचे प्रथम इंग्रजीत भाषांतर केले. मनुस्मृतीची पहिली इंग्रजी आवृत्ती १७९४ साली प्रकाशित झाली.

सेंट पॉल कॅथेड्रलमधील पुतळा आणि मनुस्मृती

लंडनमधील सेंट पॉल कॅथेड्रलमधील चार मोठ्या पुतळ्यांपैकी एक पुतळा विशेष नजरेत भरतो. संगमरवरात कोरलेला हा पुतळा ईस्ट इंडिया कंपनीने जॉन बेकन (१७४०-१७९९) यांच्याकडून घडवून घेतला. हा पुतळा जॉन विल्यम यांचा असून यावर संस्कृत मजकूर कोरल्याचे आढळून येते. या पुतळ्याचा हात एका पुस्तकावर आहे. हे पुस्तक दुसरे कुठले नसून मनुस्मृतीचे भाषांतर आहे. या पुस्तकावर मनूचे नाव ‘मनुः’ असे कोरलेले आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर-सांध्यावर देवनागरी लिपी वापरण्यात आलेली आहे. हा पुतळा ज्या पेडेस्टलवर (पादपीठावर) उभा आहे. त्यावर हिंदू पौराणिक कथांमधील दृश्य कोरण्यात आली आहेत. यात एक साडीतील भारतीय स्त्री मध्यभागी बसलेली आहे. तिच्या एका हातात ब्रह्मा-विष्णू-महेश त्रिमूर्ती आहे. तर दुसऱ्या हाताने तिने जो फलक पकडला आहे, त्यावर समुद्र मंथनाचे दृश्य कोरलेले आहे. समुद्र मंथनातून बाहेर आलेला मौल्यवान खजिनाही या दृश्यात कोरलेला आहे. समुद्रमंथनातून बाहेर आलेला ऐरावत (इंद्राचा हत्ती), कामधेनू (इच्छा पूर्ण करणारी दैवी गाय), उच्छैश्राव (सूर्याचा रथ ओढणारे सात घोडे), चंद्र, हलाहल (विष) आणि अमृताचे पात्रही कोरलेले आहे. या दृश्यात मंदार पर्वत विशाल कासवाच्या पाठीवर आहे आणि वासुकी नाग दोरीच्या स्वरूपात दर्शविलेला आहे. मंथनाच्या दृश्यावर विष्णूची चतुर्भुज आकृती विराजमान आहे. या पुतळ्याच्या चर्चमधील स्थापनेनंतर हिंदू धर्माशी निगडित महत्त्वाच्या घटकाला चर्चमध्ये स्थान का देण्यात आले हा विषय चर्चेचा ठरला होता. अमेरिकन इतिहासकार थॉमस आर. ट्राउटमन यांनी १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात भारत आणि युरोपियन विचारवंत यांच्या संदर्भात विस्तृत लेखन केले आहे. त्यांच्या ‘आर्य अॅण्ड ब्रिटिश इंडिया’ या पुस्तकात ख्रिश्चन चर्चमध्ये हिंदू देवतांच्या अशा प्रतिमांचे हे चित्रण आश्चर्य करणारे नाही असा युक्तिवाद करण्यात आला आहे. त्यांनी हिंदू मिथक शास्त्राचा संबंध ख्रिश्चन बायबल मधील कथांशी जोडला आहे.

ख्रिश्चन इंडोमानिया

ट्राउटमन यांनी म्हटले आहे की, ब्रिटिश चर्चमध्ये या हिंदू देवीदेवतांच्या प्रतिमांना स्थान कसे मिळाले, हे समजून घेण्यासाठी तत्कालीन सामाजिक- धार्मिक- राजकीय परिस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. जोन्स यांनी विष्णूचे पहिले तीन अवतार (मत्स्य, कूर्म आणि वराह) सार्वत्रिक जलप्रलयाच्या बायबलसंबंधी कथेशी खोलवर संबंधित असल्याचे सांगितले. यासाठी त्यांनी शतपथ ब्राह्मणात दिलेल्या एका कथेचा संदर्भ दिला. या कथेप्रमाणे एका माशाने मनूला सावध केले होते की, जगाचा नाश करणारा पूर लवकरच येणार आहे. म्हणूनच माशाने दिलेल्या सल्ल्यानुसार, मनूने एक मोठे जहाज बांधले आणि ज्यावेळेस महापूर आला त्यावेळेस तो माशाच्या शिंगाला बांधून ते जहाज डोंगराच्या शिखरावर सुरक्षितपणे नेण्यात यशस्वी झाला. मनूच्या वंशजांनी पुन्हा एकदा पृथ्वीवर वस्ती केली. याच कथेतील आणि नोहाच्या बायबलमधील जलप्रलय कथेत यांच्यात साम्य असल्याचे जोन्स यांनी म्हटले. जोन्स यांच्यासाठी हिंदू कथेने बायबलसंबंधी पुराच्या कथनाचे प्रमाणीकरण केले परंतु एम. डी व्होल्टेअर (फ्रेंच लेखक आणि तत्वज्ञानी) यांनी या निरीक्षणाचे खंडन केले आहे.

अधिक वाचा: विश्लेषण: विवाह संस्कार आणि सप्तपदी अनिवार्य; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय! हिंदू धर्मात किती प्रकारचे संस्कार महत्त्वाचे मानले गेले आहेत?

थॉमस मॉरिस अँग्लिकन धर्मगुरू होता आणि जोन्स यांचा समर्थकही होता. जोन्स यांनी केलेल्या तर्काचा पुरस्कार थॉमस मॉरिस यांनी देखील आपल्या लिखाणात केला आहे. ‘Sanskrit Fragments, or Interesting Extracts from the Sacred Books of the Brahmins, On Subjects Important to the British Isles’ या शोध निबंधात थॉमस मॉरिस यांनी हिंदू धर्मातील त्रिमूर्ती आणि ख्रिश्चन धर्मातील ट्रिनीटी तसेच बायबल आणि प्राचीन भारतात जगाच्या उत्पत्तीविषयी आलेल्या कथांमध्ये साम्य दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे. जोन्स आणि थॉमस मॉरिस यांनी प्राचीन भारतीय धार्मिक कथा आणि बायबलमधील कथा यांच्यात साम्य दर्शविण्याचा प्रयत्न का केला हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. याचे उत्तर हे त्या कालखंडात दडलेले आहे.

१६९० च्या दशकात ख्रिश्चन मिशनरींना फ्रान्स मधून विरोध होत होता. फ्रेंच प्रबोधनाचे विद्वान व्हॉल्टेअर, जीन-सिल्वेन बेली आणि कॉन्स्टँटिन फ्रँकोइस डी चासेबोउफ, कॉम्टे डी व्हॉलनी यांनी आधीच फ्रेंच राज्य आणि समाजातील कॅथोलिक चर्चच्या जबरदस्त वर्चस्वावर टीका केली होती. १७९०-१७९५ च्या दरम्यान, फ्रान्समधील नवीन क्रांतिकारी सरकारने चर्चच्या सामर्थ्यावर अंकुश ठेवणारे अनेक कायदे केले, त्याचे विशेषाधिकार रद्द केले आणि त्यांची मालमत्ता जप्त केली. याच पार्श्वभूमीवर प्राचीन भारत हा वादाचा मुद्दा ठरला. दोन्ही बाजूंकडून हिंदू धार्मिक ग्रंथांचा आधार घेत एकमेकांवर टीका करण्यात आली.

फ्रेंच विद्वानांकडून बायबलवर टीका करण्यासाठी कालगणनेचा आधार घेण्यात आला. बायबल मध्ये जगाची निर्मिती इसवी सन पूर्व ४००० वर्षांपूर्वी झाल्याचे म्हटले आहे तर मनुस्मृतीत हाच काळ चार युगांमध्ये विभागला गेला आहे आणि जगाची उत्पत्ती बायबलमध्ये दिली आहे त्याही पेक्षा अनेक कालखंड मागे जाते असा युक्तिवाद केला आहे. याउलट मॉरिसने संशयवाद्यांना प्राचीन भारतीय ज्ञान ‘हस्तांतरीत’ होऊ न देण्याचा निर्धार केला होता आणि जोन्सच्या प्रेरणेने, त्यांचा प्रतिकार करण्यासाठी त्यांनी भरपूर लिखाण केले. म्हणूनच हिंदू धार्मिक प्रतिमा असलेले विल्यम जोन्स यांचे स्मारक ख्रिश्चन चर्चमध्ये ख्रिस्ती धर्माच्या सत्याचा स्वतंत्रपणे प्रमाणित पुरावा म्हणून सामावून घेण्यात आले. हे केवळ जोन्स यांच्या आधी अकल्पनीय होते आणि नंतर ते अशक्य झाले.