मंगळवारी पंतप्रधान मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्यांदा अर्ज भरला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह एनडीएतील घटक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. या प्रसंगाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधानांना छत्रपती शिवाजी महाराजांची खास ओळख असलेला जिरेटोप पंतप्रधानाच्या डोक्यावर चढवला. यानंतर एका नवीन वादाला तोंड फुटले. त्याच पार्श्वभूमीवर जिरेटोप या शिरस्त्राणाचा नेमका इतिहास काय सांगतो, याविषयी जाणून घेणे नक्कीच समयोचित ठरणारे आहे.
अधिक वाचा: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
छत्रपती शिवाजी महाराज आणि जिरेटोप
जिरेटोप म्हटला की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र. आपण वर्षानुवर्षे महाराजांच्या चित्रात त्यांच्या डोक्याभोवती बांधलेला किनारीचा पागोटा पाहिलेला आहे. किंबहुना आपण तेच शिरस्त्राण जिरेटोप असल्याचे मान्य करतो. मराठेशाहीच्या कालखंडात छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर शंभू महाराज आणि राजाराम महाराज यांच्या तसबिरीत आपल्याला जिरेटोप दिसतो. विशेष म्हणजे समकालीन इतर राजकीय वर्तुळात अशा प्रकारचे शिरस्त्राण वापरात असल्याचे फारसे आढळत नाही. त्यामुळेच शिवाजी महाराज आणि जिरेटोप असे घट्ट समीकरण आहे. जिथे प्रत्यक्ष महाराजांची प्रतिमा स्थापन करणे शक्य होत नाही अशा ठिकाणी त्यांच्या प्रतिकात्मक वस्तूंची स्थापना करून महाराजांच्या कार्याचा गुणगौरव केला जातो. त्यामुळेच महाराष्ट्रासाठी आराध्य दैवत असलेल्या महाराजांच्या जिरेटोपाचा भेटवस्तू म्हणून केलेला वापर वादग्रस्त ठरला आहे. सर्वसाधारण जरीचे काम असलेले किंवा किनार असलेल्या मलमली कापडाचे पागोटे म्हणजे जिरेटोप अशी काहीशी धारणा आहे. परंतु खरोखरच मराठाकालीन जिरेटोपची ओळख इतकीच मर्यादित होती का? की त्याही पलीकडे काही वेगळे शिरस्त्राण होते हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे ठरणारे आहे.
शिवाजी महाराजांच्या जुन्या चित्रांमध्ये त्यांच्या डोक्यावर दिसणारे कापडी पागोटे/ शिरस्त्राण सारख्याच पद्धतीचे आहे. जे कपाळापासून सुरु होत मागे साधारण शंकूच्या आकारात गुंडाळले जात होते. परंतु सध्या प्रचलित किंवा ज्या स्वरूपाचे जिरेटोप महाराजांचे शिरस्त्राण म्हणून दाखविले जाते तशा स्वरूपाचे ते नव्हते. तर महाराजांचा जिरेटोप हा त्यांचा प्राणरक्षक होता. सध्याच्या जिरेटोपात कपड्याचा पीळ दिलेला दिसतो, हा जिरेटोप सहज घालता आणि काढता येतो. परंतु मूळच्या जिरेटोपात अशी काहीही रचना नव्हती. फेटे जसे बांधले जातात तशाच प्रकारे महाराजांचे शिरस्राणही बांधले जात होते.
अधिक वाचा: विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली?
मराठाकालीन प्राणरक्षक जिरेटोप
उपलब्ध संदर्भानुसार छत्रपती शिवाजी महाराजांवर झालेला प्राणघातक हल्ला याच जिरेटोपाने झेलला होता आणि महाराजांचे रक्षण केले होते. तसे आपल्याला मराठाकालीन बखरींमध्ये संदर्भ सापडतात. कृष्णाजी अनंत सभासद यांच्या सभासद बखरीत महाराज अफजलखानाच्या भेटीला निघाले त्यावेळेस त्यांनी जिरेटोप परिधान केला होता. बखरीतील संदर्भानुसार महाराजांनी कापडी पागोट्याखाली लोखंडाचा तोडा घातला होता असा उल्लेख आहे. डोक्यावर मंदील बांधला होता आणि त्याखाली तोडा होता असा उल्लेख आला आहे. तोडा म्हणजे सोने-चांदीच्या तारांचा टोप तर मंदील म्हणजे जरीचे पागोटे असा अर्थ होता. वस्तुतः जिरेटोप हा लोखंडी काड्यांपासून तयार केला जात असे. शेडगावकर, चिटणीस, श्रीशिवदिग्विजय या सर्व बखर साहित्यात महाराज आणि अफजलखानाच्या भेटीचा संदर्भ सापडतो. या संदर्भानुसार अफजलखान आणि शिवाजी महाराज भेटीच्या वेळी अफजलखानाने शिवाजी महाराजांच्या डोक्यावर तलवारीचा वार केला होता, परंतु यावेळी महाराजांच्या डोक्यावर जिरेटोप असल्यामुळे तो गहूभर तुटला आणि महाराजांचे प्राण वाचले, असा संदर्भ सापडतो.
त्यामुळेच आज जिरेटोप म्हटल्यावर जो काही कापडी टोप किंवा पागोटे आपल्या डोळ्यासमोर येतो तो निश्चितच जिरेटोप नाही. याच कापडी पागोट्याचा उल्लेख सभासद बखरीत मंदील म्हणून आलेला आहे. लोखंडी टोप हा जिरेटोप म्हणून उल्लेखलेला आहे. एकूणातच जिरेटोप हा लोखंडी काड्यांपासून तयार केलेला किंवा संपूर्ण धातूचा टोप होता.
प्राचीन भारतातील शिरस्त्राण
भारतीय उपखंडात शिरस्त्राण प्राचीन काळापासून वापरले जात होते. वैदिक-पौराणिक साहित्यात शिरस्त्राणाचे उल्लेख सापडतात. चाणक्याच्या अर्थशास्त्रात शरीर संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या आयुधांची चर्चा केलेली आहे, यात लोहजालिका, शिरस्त्राण, पट्टा, कवच आणि सूत्रक यांचा समावेश होता.