‘तुम्ही मित्र बदलू शकता; पण शेजारी नाही.’ माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेत म्हटलेली ही ओळ जगातल्या एका मोठ्या व्यक्तीसाठी आठवली जात आहे. मेटाचे सीईओ मार्क झकरबर्ग यांच्या बाबतीत काहीसे असेच घडले आहे. खरे तर सिलिकॉन व्हॅलीमधील पालो अल्टो इथल्या अब्जाधीश सीईओचे घर त्यांच्या इतर शेजाऱ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. एकेकाळी स्टीव्ह जॉब्स आणि इतर प्रसिद्ध तंत्रज्ञान तज्ज्ञांचे निवासस्थान असलेला हा परिसर आता मार्क झकरबर्गच्या पालो अल्टो इस्टेटचा त्रास सहन करत आहे.

यंत्रे, आवाज आणि रहदारी

मार्क झकरबर्गने २०११ मध्ये सिलिकॉन व्हॅलीतील क्रेसेंट पार्क या भागात एक घर खरेदी केले. त्याने एजवूड ड्राइव्हवर ५,६०० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेले घर विकत घेतले. पालो अल्टोमधील हे सर्वांत जुने घर, अशी याची नोंद आहे. त्यानंतर एकामागून एक कंपन्या खरेदी करण्याच्या त्याच्या सवयीप्रमाणे त्याने घरांच्या बाबतीतही तसेच केले. झुकरबर्गने एकामागून एक तब्बल ११ घरे खरेदी केली. घर खरेदी करणे यात मुळात काही वाद नाहीच; पण खरी समस्या तेव्हा सुरू झाली जेव्हा मार्कने ही सर्व घरे एकत्र करायला सुरुवात केली.

मार्क झकरबर्गच्या या घरांचे काम सुरू झाल्यापासून हा परिसर रहिवासी नाही, तर एखाद्या किल्ल्याचा परिसर असल्यासारखा झाला आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार, मार्क झुकरबर्गने ९२० कोटी रूपये खर्च करून ही जागा मार्क त्याच्या आणि कुटंबीयांच्या गरजांनुसार विकसित करीत आहे. गेस्ट हाऊसपासून ते बाग, पिकलबॉल कोर्टपर्यंत सर्व काही येथे बांधले जात आहे. पिकलबॉल हा एक रॅकेट आणि पॅडल खेळ आहे, जो टेनिस, बॅडमिंटन व पिंगपाँगसारखा आहे. त्यासोबतच या ११ घरांपैकी एकाचा वापर केवळ १४ मुलांसाठी खासगी शाळा म्हणून केला जात आहे. येथे चार शिक्षकांसह सहा कर्मचारीदेखील आहेत. स्थानिक निवासी क्षेत्रीय नियमांनुसार, याची परवानगी नाही. त्याविरोधात काही रहिवाशांनी शहर प्रशासनाकडे याबाबत तक्रारही दाखल केली होती. येथील परिस्थिती हाताळण्यासाठी आतापर्यंत काहीही प्रयत्न केले गेले नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

येथील बांधकाम काही काळासाठी थांबले; पण २०२२ मध्ये पुन्हा सुरू झाले. ही मालमत्ता विक्रेते बाजार मूल्यापेक्षा जास्त किमतीच्या ऑफर स्वीकारतात. या किमती चालू दरापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट असतात.

मार्क झकरबर्गने त्याची पत्नी प्रिसीला चॅनचा सात फूट उंच चांदीचा पुतळादेखील तयार केला आहे. त्यासोबतच सात हजार चौरस फूट बंकरदेखील तयार केला आहे. मार्क अब्जाधीश असल्याने त्याच्या सुरक्षेसाठी या भागात त्याचे वैयक्तिक अंगरक्षकही आहेत. तेथे कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. हे कॅमेरे शेजाऱ्यांच्या घरांकडे तोंड करून लावलेले आहेत.

या सर्व प्रकरणानंतर असे वाटत असेल की, मार्कचे शेजारी विनाकारण मत्सर करीत असतील. सर्व काही नियमांच्या कक्षेतच घडत असेल; पण तसे नाही. २०१६ मध्ये मार्कने चार घरे पाडून एक मोठे तळघर बांधण्याची परवानगी मागितली होती आणि ती नाकारण्यात आली होती; पण बांधकाम अजूनही सुरू आहे. मार्क झुकरबर्ग ब्लॉक पार्ट्यांमध्येही जात नाही, तसेच तो सोसायटीच्या बैठकांनाही येत नाही.

शेजाऱ्यांचे म्हणणे काय?

याबबात शेजाऱ्यांचे म्हणणे आहे की, या मालमत्तांच्या परिवर्तनामुळे सतत त्रास होत आहे. बांधकामकामांमुळे रस्ते मोठ्या वाहनांनी भरले आहेत, रस्ते अडवले आहेत आणि काही प्रकरणांमध्ये रहिवाशांच्या गाड्यांचे नुकसान झाले आहे. स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे, इमारतींच्या ढिगाऱ्यांमुळे टायर फुटले आहेत आणि अरुंद रस्त्यांवर जड यंत्रसामग्री चालवल्याने पार्क केलेल्या वाहनांचे आरसे फुटले आहेत.
मार्कचे शेजारी आणि CREDO मोबाईलचे संस्थापक मायकेल किश्निक यांनी म्हटले, “कोणताही शेजारी व्यापू इच्छित नाही.” स्थानिक रहिवासी ग्रीर स्टोन म्हणतात की, मार्क नियमांमधील त्रुटींचा फायदा घेत आहे.

दरम्यान, मार्क झकरबर्गचे प्रवक्ते आरोन मॅकलियर यांनी म्हटले आहे की, मेटाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना धमक्या आल्या असल्याने या उपाययोजना आवश्यक आहेत. त्यांनी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी पावले उचलेली गेली आहे. त्यामध्ये कार्यक्रमांची आगाऊ सूचना देणे, रस्त्यावर पार्किंग मर्यादित करण्यासाठी कर्मचार्‍यांना राईड शेअर्ससाठी परतफेड करणे आणि समस्या नोंदवण्यासाठी थेट संपर्क साधणे या गोष्टींचा समावेश आहे.

मार्क झकरबर्ग भेटी देऊन करतात सारवासारव

मार्क झकरबर्गने काही वेळा इथल्या रहिवाशांना भेटही दिली आहे. इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आता जास्त आवाज करणाऱ्या पेट्रोल कारऐवजी इलेक्ट्रिक वाहने वापरायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे काही वेळा शेजाऱ्यांना स्पार्कलिंग वाईन, चॉकलेट्स, क्रिस्पी क्रेम डोनट्स आणि अनेकदा नॉईज कॅन्सलेशन हेडफोन्स अशा भेटवस्तूही दिल्या आहेत. अलीकडेच झालेल्या येथील एका पार्टीत मार्क झुकरबर्ग उपस्थित नव्हता; मात्र त्याने उपस्थितांसाठी आइस्क्रीमचा कार्ट पाठवले होते, असे ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तात दिले आहे