scorecardresearch

विश्लेषण: काश्मीर प्रकरणी केलेलं ट्वीट भोवलं, मारुती सुझुकीपासून डॉमिनोजपर्यंतच्या कंपन्यांचा माफीनामा; नेमकं काय झालं जाणून घ्या

काश्मीर प्रकरणी फुटीरवाद्यांचं समर्थन करणाऱ्या ट्वीट प्रकरणी कंपन्यांचा एकामागोमाग एक माफीनामा सुरु झाला आहे.

Kashmir_Tweet
काश्मीर प्रकरणी केलेलं ट्वीट भोवलं, मारुती सुझुकीपासून डॉमिनोजपर्यंतच्या कंपन्यांचा माफीनामा; नेमकं काय झालं जाणून घ्या

काश्मीर प्रकरणी फुटीरवाद्यांचं समर्थन करणाऱ्या ट्वीट प्रकरणी कंपन्यांचा एकामागोमाग एक माफीनामा सुरु झाला आहे. भारतीय युजर्सने ट्विटरवर टीकेची राळ उठवल्यानंतर कंपन्यांना उपरती झाली आहे. #Boycott ट्रेंड सुरु असल्याने कंपन्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. या ट्रेंडचा प्रोडक्टवर परिणाम होईल अशी भीती कंपन्यांना गेल्या दोन दिवसांपासून सतावत होती. ह्युंदाई, केएफसी, पिझ्झा हट, टोयोटा आणि सुझुकीनंतर डॉमिनोज आणि होंडा या जागतिक कंपन्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. पिझ्झा चेन डॉमिनोज आणि जापानी ऑटो कंपनी होंडाने पाकिस्तानमधील त्यांच्या व्यावसायिक सहयोगींनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे भारतीयांच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागितली आहे. तर कार निर्माता ह्युंदाईने काश्मीरमधील फुटीरतावाद्यांचे समर्थन करणाऱ्या ट्विटसाठी स्पष्टीकरण दिलं आहे.

डॉमिनोज इंडियाने सांगितले की, “डॉमिनोज इंडिया भारतीय बाजारपेठेसाठी वचनबद्ध आहे, २५ वर्षांहून अधिक काळ आपलं घर आहे आणि देशातील लोकांचा, संस्कृतीचा आणि राष्ट्रवादाच्या भावनेचा अत्यंत आदर करतो,” असे कंपनीने ट्विटरवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दुसरीकडे, केएफसीने सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट केली होती. यामुळे कोट्यवधी भारतीयांच्या भावना दुखावल्या होत्या. यानंतर नेटकऱ्यांनी #BoycottKFC हॅगटॅग वापरत नाराजी व्यक्त केली होती. या ट्रेंडनंतर केएफसीला उपरती झाली असून मंगळवारी माफी मागितली आहे. केएफसी पाकिस्तानच्या अधिकृत खात्यावरून काश्मीरमधील फुटीरवाद्यांच्या समर्थन करण्यात आलं होतं. ही पोस्ट अंगलट आल्यानंतर केएफसी इंडियाने सारवासारव केली आहे. तर इंस्टाग्रामवर पिझ्झा हटच्या पाकिस्तान हँडलने देखील असाच संदेश पोस्ट केला होता. बुधवारी, क्यूआरएस साखळीने एक विधान जारी केले की, “सोशल मीडियावर फिरत असलेल्या पोस्टच्या मजकुराला समर्थन देत नाही किंवा सहमत नाही,” असं सांगितल्याचं पीटीआयने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

मारुती सुझुकीने एक निवेदन जारी करत स्पष्टीकरण दिले आहे. “कॉर्पोरेट धोरण म्हणून आम्ही जगाच्या कोणत्याही भागामध्ये कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक प्रवृत्तीचं समर्थन करत नाही. या विषयांवरील आमच्या डीलर्स किंवा व्यावसायिक सहयोगींकडून केलेली पोस्ट आमच्या कंपनीचे प्रतिनिधित्व करत नाही. आमच्याद्वारे अधिकृत नाही.”

दक्षिण कोरिया स्थित ऑटोमोबाईल उत्पादक कियाने बुधवारी सांगितले की, “खासगी डीलरने स्वतःच्या खात्यांचा गैरवापर करून पोस्ट केली आहे. या अनधिकृत सोशल मीडिया पोस्टची किया इंडियाने दखल घेतली आहे. आम्ही Kia ब्रँडचा असा गैरवापर टाळण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत आणि पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रक्रिया राबवल्या आहेत.” दुसरीकडे ह्युंदाईच्या वादग्रस्त पोस्टप्रकरणी दक्षिण कोरियाचे परराष्ट्रमंत्री चुंग युई योंग यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना फोन केला. सोशल मीडिया पोस्टमुळे भारतीय आणि सरकारच्या भावना दुखावल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, एमईएचे अधिकृत प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, “आम्ही ह्युंदाई पाकिस्तानने तथाकथित काश्मीर प्रकरणी केलेली सोशल मीडिया पोस्ट पाहिली होती. ६ फेब्रुवारी २०२२ रोजी केलेल्या या सोशल मीडिया पोस्टनंतर लगेच आमच्या राजदूताने ह्युंदाई मुख्यालयाशी संपर्क साधला आणि स्पष्टीकरण मागितले. आक्षेपार्ह पोस्ट त्यानंतर काढून टाकण्यात आली. त्याचबरोबर कोरियाच्या राजदूताला परराष्ट्र मंत्रालयाने ७ फेब्रुवारी २०२२ रोजी समन्स दिला आहे.”

काय होतं पोस्टमध्ये?
पाकिस्तानमध्ये साजरा करण्यात आलेल्या काश्मीर एकता दिनानिमित्त कंपन्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. यात ह्युंदाई, केएफसी, पिझ्झा हट, टोयोटा, सुझुकी, किया, डॉमिनोज आणि होंडा या जागतिक कंपन्यांचा सहभाग होता. फुटीरतावाद्यांचं समर्थन करणाऱ्या या पोस्टमुळे नव्या वादाला फोडणी मिळाली होती. पोस्टबाबत सोशल मीडियावर आक्षेप घेण्यात आला होता. वाद वाढल्याचं पाहून कंपन्यांनी आपल्या पोस्ट डिलीट केल्या आणि माफीनाम्याचं सत्रं सुरू झालं.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maruti suzuki hyundai kfc dominos kia brands apologise after backlash over posts on kashmir rmt

ताज्या बातम्या