एफएमसीजी (फास्ट-मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स) क्षेत्रातील आघाडीची कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने प्रिया नायर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. त्या १ ऑगस्ट २०२५ पासून हे पद स्वीकारतील. विशेष म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हरच्या ९२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला कंपनीच्या कामकाजाची धुरा सोपवण्यात आली आहे.
प्रिया नायर सध्या युनिलिव्हरमध्ये ब्युटी अँड वेलबीइंग विभागाच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी १९९५ मध्ये हिंदुस्तान युनिलिव्हरमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. हळूहळू त्यांनी विक्री, मार्केटिंगमध्ये अनेक महत्त्वाची पदं सांभाळली.
प्रिया नायर यांनी प्रामुख्याने भारतात युनिलिव्हरच्या होम केअर व्यवसायाला बळकटी मिळवून दिली आहे. तसंच जगभरात युनिलिव्हरच्या कॉस्मॅटिक्स विभागाचे नेतृत्वही त्यांनी केले आहे. २०२३ पासून त्या युनिलिव्हरच्या ग्लोबल अँड वेलबीइंग युनिटच्या अध्यक्षा आहेत. हा विभाग कंपनीच्या सर्वात वेगवान व्यवसायांपैकी एक आहे. प्रिया नायर या रोहित जावा यांच्या जागी काम करतील. रोहित जावा ३१ जुलै २०२५ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पदावरून पायउतार होत आहेत. कंपनीचे अध्यक्ष नितीन परांजपे याबाबत बोलताना म्हणाले की, प्रिया यांचा या क्षेत्रातील भारतीय बाजारपेठेतील अनुभव आणि उत्कृष्ट ट्रॅक रेकॉर्ड कंपनीला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल.
२०२३ पासून रोहित जावा सीईओ पदावर
हिंदुस्तान युनिलिव्हरच्या संचालक मंडळाने रोहित जावा यांचे आभार मानले आहेत. रोहित यांनी २०२३ पासून मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळली आहे. बाजारातील कठीण परिस्थितीच्या काळातही त्यांनी कंपनीला बळकटी दिली आहे. सध्या कंपनी शहरी बाजारपेठेतील मंदी, ग्रामीण भागातील वाढ आणि प्रिमियम उत्पादनांची वाढती मागणी यांसारख्या आव्हानांना तोंड देत असतानाच हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
प्रिया नायर यांचा प्रवास
प्रिया नायर १९९५ मध्ये हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये दाखल झाल्या. त्यांनी होम केयर, ब्युटी अँड वेलबीइंग आणि पर्सनल केयर या व्यवसायांमध्ये विक्री आणि मार्केटिंगमध्ये भूमिका बजावल्या आहेत. प्रिया नायर यांनी सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून अकाउंट्स अँड स्टॅटिस्टिक्समध्ये पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी पुण्यातील सिम्बोयसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमधून एमबीए केले आहे. युनिलिव्हरमध्ये त्या मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून दाखल झाल्या होत्या. त्याआधी प्रिया एचयूएलमध्येच होम केयर आणि ब्युटी अँड पर्सनल केयर पोर्टफोलिओचे नेतृत्व करत होत्या. सध्या प्रिया युनिलिव्हरच्या ब्युटी अँड वेलबीइंग बिझनेस ग्रुपच्या अध्यक्षा आहेत.
ठळक मुद्दे:
- देशातील सर्वात मोठ्या एफएमसीजी कंपन्यांपैकी एक आहे हिंदुस्तान युनिलिव्हर
- ९२ वर्षांत पहिल्यांदाच एका महिलेची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड
- सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक अशा दोन महत्त्वाच्या पदांची जबाबदारी
- प्रिया १ ऑगस्ट २०२५ पासून पदाचा कार्यभार स्वीकारतील
- सुमारे ३० वर्षे कंपनीत विविध महत्त्वाच्या भूमिका बजावल्या
- प्रिया यांची नियुक्ती एक धोरणात्मक पाऊल समजले जाते
- सध्याचे सीईओ रोहित जावा यांच्या जागी प्रिया काम करतील
- २०२३ पासून रोहित जावा सीईओ म्हणून काम पाहत होते
हिंदुस्तान युनिलिव्हर विषयी…
हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी जलदगतीने वाढणारी ग्राहकोपयोगी वस्तू बनवणारी कंपनी आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात एचयूएलची उलाढाल ६०,६८० कोटी रुपये होती. कंपनीचे बाजार भांडवल ५,६९,२२३.७३ कोटी रुपये आहे. यामुळे ही भारतातील सर्वात मौल्यवान कंपनी ठरते. एचयूएलचे ५० हून अधिक ब्रँड आहेत जे घराघरात प्रसिद्ध आहेत. यामध्ये लक्स, लाइफबॉय, सर्फ एक्सेल, रिन, व्हील, पाँड्स, वॅसलिन, लॅक्मे, डव, क्लिनिक प्लस, ब्रूकबाँड, हॉर्लिक्स, किसान यांचा समावेश आहे. हे ब्रँड्स साबण, चहा, डिटर्जंट्स, शॅम्पू, स्किनकेयर, टूथपेस्ट आणि पॅकेज्ड फूड अशा २० हून अधिक ग्राहक उत्पादनांमध्ये उपलब्ध आहेत.
प्रिया नायर यांच्या नियुक्तीनंतर, आज ११ जुलै रोजी हिंदुस्तान युनिलिव्हरच्या शेअरमध्ये प्रचंड वाढ दिसून येत आहे. कंपनीचा शेअर ४.६० टक्के इतक्या वाढीसह २५९९.९५ रूपयांवर ट्रेड होत आहे. कंपनीच्या शेअरची सुरूवात २४०९.०५ रूपयांच्या वाढीसह २४६० रूपयांनी झाली. शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३.०३४.५० रूपये आहे आणि ५२ आठवड्यांचा नीचांक २,१३६ रूपये आहे.