scorecardresearch

Premium

व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फीचर ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅनल’ नेमके काय आहे? जाणून घ्या सविस्तर…

व्हॉट्सअ‍ॅप चॅनल या फीचरच्या विस्ताराबाबत मेटा कंपनीने सविस्तर माहिती दिली आहे. युजर्स या व्हॉट्सअ‍ॅप चॅनल्सना कॅटेगिरी आणि नावाच्या मदतीने सर्च करू शकतात.

WHATSAPP CHANNEL
व्हॉट्सअ‍ॅपने व्हॉट्सअ‍ॅप चॅनल नावाचे नवे फीचर आणले आहे. (Image Credit-Reuters)

समाजमाध्यमाच्या जगात रोजच नवनवीन घडामोडी घडतात. एकमेकांशी स्पर्धा करताना वेगवेगळी समाजमाध्यमं रोज नवनवे फीचर्स आणतात. व्हॉट्सअ‍ॅप या आघाडीच्या मेसेजिंग अ‍ॅपनेदेखील सध्या ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅनल’ नावाचे एक भन्नाट फीचर आणले आहे. या फीचरच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचता येणार आहे. विशेष म्हणजे व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या फीचरला भारतात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अभिनेत्री कतरिना कैफ, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता अक्षय कुमार, दिलजित डोसांज, विजय देवरकोंडा यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींनी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल सुरू केले असून त्यांना लाखो लोकांनी फॉलो केले आहे. याच पार्श्वभूमीवर व्हॉट्सअ‍ॅप चॅनल नेमके काय आहे? याचा वापर कसा करावा? व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या फीचरमुळे काय फायदा होणार? हे जाणून घेऊ या…

व्हॉट्सअ‍ॅप चॅनल नेमके काय आहे?

व्हॉट्सअ‍ॅप हे मेसेजिंग अ‍ॅपच्या मेटा या कंपनीच्या मालकीचे आहे. व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना त्यांना हव्या असणाऱ्या सर्व घडामोडींची सर्व माहिती मिळावी म्हणून व्हॉट्सअ‍ॅप चॅनल हे नवे फीचर सुरू करण्यात आले आहे, असे मेटा कंपनीने म्हटले आहे. म्हणजेच आता आपल्याला या जगात काय सुरू आहे? काय घडामोडी घडत आहेत? हे व्हॉट्सअ‍ॅपमध्येच समजणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप चॅनलच्या माध्यमातून आपण ज्या लोकांना फॉलो केलेले आहे, त्यांच्याविषयीची सर्व माहिती वापरकर्त्याला मिळवता येईल. यामध्ये वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रांचेही व्हॉट्सअ‍ॅप चॅनल असून त्यांनादेखील फॉलो करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

Startup Valuation Many Other Types
Money Mantra : युनिकॉर्न व्यतिरिक्त इतर अनेक प्रकारचे स्टार्टअप, जाणून घ्या ‘हेक्टोकॉर्न’ म्हणजे काय?
Weight loss eating habits Why meal timing needs to be matched with what you eat
नाश्ता किंवा जेवणाची योग्य वेळ कोणती? वजन कमी करण्यासाठी काय करावे?
significance of the asteroid samples
विश्लेषण: ‘नासा’ने आणलेल्या लघुग्रह नमुन्यांचे महत्त्व काय?
iphone 12
फ्रान्समध्ये आयफोन १२ च्या विक्रीवर बंदी, नेमके कारण काय? जाणून घ्या….

चॅनल ॲडमीन, फॉलोअर्सच्या गोपनियतेचे काय?

व्हॉट्सअ‍ॅपचे हे नवे फीचर ‘वन वे कम्युनिकेशन’ आहे. म्हणजेच आपण ज्या लोकांना फॉलो करत आहोत, ते जे काही व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवर टाकत आहेत, ते सर्वकाही आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र, व्हॉट्सअ‍ॅप चॅनलच्या ॲडमिनशी फॉलोअर्सना थेट संपर्क साधता येणार नाही. व्हॉट्सअ‍ॅप चॅनल असणाऱ्या व्यक्तीचा खासगी फोन नंबरही फॉलोअर्सना दिसणार नाही. फॉलोअर्स फक्त इमोजींच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅप असलेल्या माहितीविषयी आपली प्रतिक्रिया, भावना व्यक्त करू शकतो. मेसेजिंग, चॅटिंग करण्यासाठी आपण व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतो. मात्र, आता व्हॉट्सअ‍ॅप चॅनल या नव्या फीचरच्या माध्यमातून आपल्याला जगातील वेगवेगळ्या लोकांची माहिती मिळणार आहे.

चॅनल्सना कॅटेगिरी आणि नावाच्या मदतीने करता येणार सर्च

व्हॉट्सअ‍ॅप चॅनल या फीचरच्या विस्ताराबाबत मेटा कंपनीने सविस्तर माहिती दिली आहे. युजर्स या व्हॉट्सअ‍ॅप चॅनल्सना कॅटेगिरी आणि नावाच्या मदतीने सर्च करू शकतात. जे चॅनल्स नवे आहेत, त्यांनादेखील युजर्स पाहू शकतात. तसेच जे चॅनल्स प्रसिद्ध आहेत, ॲक्टिव्ह आहेत, ते व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना प्राधान्यक्रमाने सर्च रिझल्टमध्ये दाखवले जाणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप चॅनल वापरण्यासाठी सुरक्षित आहे का?

व्हॉट्सअ‍ॅपने नुकतेच लाँच केलेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनलची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. मात्र, हे नवे फीचर सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना ‘आम्ही सर्वाधिक सुरक्षित ब्रॉडकास्ट सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहोत’, असे मेटाने म्हटले आहे. व्हॉट्सअ‍ॅप चॅनलचा ॲडमिन तसेच व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करणारे युजर्स अशा दोघांचीही वैयक्तिक माहिती गोपनीय आणि सुरक्षित असेल, असा दावा मेटाने केला आहे. तसेच चॅनलला फॉलो करणाऱ्या आणि ज्या व्यक्तींचे चॅनल आहे, अशा दोघांचाही व्हॉट्सअ‍ॅप नंबर एकमेकांना दिसणार नाही. चॅनलला फॉलो करणाऱ्यांचा मोबाईल नंबर तसेच डिस्प्ले पिक्चर चॅनलच्या ॲडमिनला दिसणार नाही, असेही मेटाने सांगितले आहे.

फॉरवर्ड, स्क्रीनशॉटचा ऑप्शन ब्लॉक करता येणार

व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवर टाकण्यात आलेले अपडेट्स ३० दिवसांनंतर आपोआप डिलिट होतील. चॅनलच्या ॲडमिनला स्क्रीनशॉट आणि फॉरवर्डची सुविधा ब्लॉक करता येणार आहे. म्हणजेच या सुविधा सुरू केल्यानंतर चॅनलवरील माहिती कोणालाही फॉरवर्ड करता येणार नाही किंवा स्क्रीनशॉट घेता येणार नाही. तसेच चॅनलला कोणी फॉलो करावे, कोणाला ब्लॉक करावे, हे निवडण्याचा पर्याय चॅनलच्या ॲडमिनकडे असणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप चॅनलची निर्मिती कोणाला करता येईल?

व्हॉट्सअ‍ॅपने भारतासह अन्य देशांत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल हे फीचर सुरू केले आहे. मात्र, प्रत्येकालाच ते सध्या तरी वापरता येत नाहीये. म्हणजेच प्रत्येकासाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल सुरू करण्याची सुविधा उपलब्ध नाही. मात्र, हे फीचर जेव्हा सर्वसामान्यांना उपलब्ध होईल, तेव्हा तसे नोटिफिकेशनच्या माध्यमातून कळवले जाईल. सध्या अनेकांना फक्त व्हॉट्सअ‍ॅप चॅनल्सना फॉलो करता येत आहे. व्हॉट्सअ‍ॅप चॅनलच्या माध्यमातून लिखित मजकूर, फोटो, व्हिडीओ, स्टीकर्स तसेच लिंक शेअर करता येते. तर फॉलोअर्स इमोजींच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया देऊ शकतात.

व्हॉट्सअ‍ॅप चॅनल कसे सुरू करावे?

मेटाने व्हॉट्सअ‍ॅप चॅनल सुरू करण्याचा ऑप्शन दिल्यानंतर अपडेट्स ऑप्शनमध्ये जावे. त्यानंतर तेथील प्लस चिन्हावर क्लिक करावे. त्यानंतर क्रिएट चॅनल हा ऑप्शन सिलेक्ट करून कन्टिन्यू या ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर चॅनलचे नाव टाकावे. हे नाव तुम्हाला कधीही बदलता येते. फोटो, डिस्क्रिप्शन टाकून व्हॉट्सअ‍ॅप चॅनल तयार करता येते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Meta tech company launched whatsapp channels feature know detail information prd

First published on: 21-09-2023 at 16:28 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×