भारत-पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया-इंग्लंड, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड क्रिकेटविश्वात हे द्वंद्व अतिशय प्रसिद्ध आहेत. हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकले की चाहत्यांना दर्जेदार खेळाच्या बरोबरीने बोलंदाजीही अनुभवायला मिळणार याची खात्री असते. हे संघ एकमेकांसमोर येतात तेव्हा शेवटच्या चेंडूपर्यंत जुगलबंदी रंगते. त्यांच्या चाहत्यांमध्येही हाडवैर अनुभवायला मिळतं. त्यामुळे टेस्ट असो किंवा वनडे किंवा ट्वेन्टी२० या देशांचे सामने नेहमीच गर्दी खेचतात. या यादीत आता नव्या दोन संघांची भर पडली आहे. आपले सख्खे शेजारी असलेल्या श्रीलंका आणि बांगलादेश या दोन देशांदरम्यानच्या क्रिकेट लढतीत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. आशिया उपखंडातल्या या दोन देशांदरम्यानच्या सामन्यांमध्ये बाचाबाचीपासून मिमिक्रीपर्यंत सगळं काही अनुभवायला मिळत आहे. कधी सुरू झालं हे प्रतिद्वंद्व आणि वैर का वाढीस लागतंय याचा घेतलेला आढावा.
या घटनेला आता बरीच वर्ष झाली. विजयाच्या सेलिब्रेशनमध्येच श्रीलंका-बांगलादेश क्रिकेटद्वंद्वाचं बीज रोवलं आहे. १५ फेब्रुवारी २०१८ रोजी या दोन देशांमध्ये झालेल्या सामन्यात बांगलादेशच्या नझमुल इस्लामने कारकीर्दीतील पहिल्यावहिल्या विकेटचा आनंद नागीण डान्स करुन साजरा केला. सोशल मीडियावर हे सेलिब्रेशन चांगलंच व्हायरल झालं होतं.
तीन दिवसांनंतर या दोन संघातच झालेल्या सामन्यात श्रीलंकेने नझमुलच्या सेलिब्रेशनची परतफेड केली. १८ फेब्रुवारीला झालेल्या सामन्यात दानुष्का गुणतिलकाने नझमुलच्या नागीण डान्सची मिमिक्री करत त्याची खिल्ली उडवली होती.
महिनाभरात हे दोन संघ निधास ट्रॉफी स्पर्धेत आमनेसामने आले तेव्हा पुन्हा एकदा नागीण डान्स चर्चेत आला. बांगलादेशचा अनुभवी फलंदाज, माजी कर्णधार आणि विकेटकीपर मुशफकीर रहीमने या सामन्यात दिमाखदार खेळी साकारली. विजयानंतर रहीमने रागात नागीण डान्स करुन दाखवला.
सहा दिवसांनंतर या दोन संघांदरम्यानच्या सामन्यात वादाची राळ उडाली. पंचांनी नोबॉल न दिल्याने बांगलादेशचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार शकीब उल हसनने सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. यावेळी दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांशी भिडले. पंचांनी हस्तक्षेप करत हा वाद सोडवला. बांगलादेशने या सामन्यात शेवटच्या षटकात विजय मिळवला. विजयाचा आनंद आणि जल्लोष खेळाडूंसह सपोर्ट स्टाफने नागीण डान्स करुन साजरा केला. सपोर्ट स्टाफमध्ये बांगलादेशचे माजी खेळाडू खालेद महमूद यांचाही समावेश होता. ड्रेसिंगरुममधली काच फोडल्याप्रकरणी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला नुकसानभरपाई दिली.
यानंतर जवळपास चार वर्ष हाडवैर थंडावलं. यापैकी दोन-अडीच वर्ष कोरोनात गेल्यामुळे हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध फार खेळलेही नाहीत.
१ सप्टेंबर २०२२ रोजी या दोन संघांदरम्यान सामना झाला. वेगवान गोलंदाज चामिका करुणारत्ने याने नागीण डान्स करुन दाखवला आणि पुन्हा सगळ्या आठवणी जागृत झाल्या.
टाईम आऊट नाट्य
गेल्या वर्षी भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकपदरम्यान या वादाने नवं वळण घेतलं. श्रीलंका आणि बांगलादेश सामन्यादरम्यान अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊट देण्यात आलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात टाईम आऊट होणारा मॅथ्यूज हा पहिलाच खेळाडू ठरला.
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामन्यात २४व्या ओव्हरमध्ये समरविक्रमा बाद झाला. त्यानंतर अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीसाठी मैदानात आला. पण बॅटिंगला सुरुवात करणार तेवढ्यात त्याला त्याच्या हेलमेटमध्ये काहीतरी समस्या जाणवली. त्यानं तातडीने पॅव्हेलियनमध्ये दुसरं हेलमेट मागवलं. हेलमेट आलंही. पण ते घालून मॅथ्यूज पुन्हा बॅटिंग करण्याआधीच शाकिब अल हसननं अम्पायरकडे आऊटचं अपील केलं होतं आणि अम्पायरनंही मॅथ्यूजला आऊट दिलं होतं! हे पाहून सगळेच चक्रावले होते. पण तिकडे बांगलादेशचे खेळाडू आणि विशेषत: शाकिब अल हसन मात्र खुश होते. कारण श्रीलंकेचा धडाकेबाज खेळाडू एकही चेंडू न खेळता अगदी स्वस्तात माघारी परतला होता.
मेरलीबोन क्रिकेट क्लब आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसाठी नियम तयार करते. १ ऑक्टोबर २०२२ पासून लागू करण्यात आलेल्या नियमांनुसार ४०.१ अन्वये पंचांनी मॅथ्यूजला बाद दिलं. एमसीसीच्या नियमावलीनुसार, एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर किंवा दुखापतग्रस्त झाल्यामुळे बाहेर गेल्यानंतर पुढच्या तीन मिनिटांत पुढच्या फलंदाजाने मैदानात थेट क्रीजवर येऊन फलंदाजी करण्यासाठी तयार राहायला हवं. जर यादरम्यान अतिरिक्त वेळेची मागणी अम्पायरच्या परवानगीने किंवा संमतीने करण्यात आली असेल, तर ते विचारात घेतलं जातं. मात्र, तसं नसल्यास तीन मिनिटांच्या आत फलंदाज सर्व तयारी करून चेंडू खेळण्यासाठी क्रीझवर उपस्थित असायला हवा.
आयसीसीतर्फे आयोजित प्रत्येक स्पर्धेसाठी प्लेइंग कंडिशन्स अर्थात नियमावली नव्याने तयार केली जाते. मूळ नियम आणि स्पर्धेसाठीचे नियम यात बदल असू शकतो. त्यानुसार आयसीसी वर्ल्डकप २०२३ प्लेइंग कंडिशन्स अन्वये, फलंदाज बाद झाल्यानंतर नव्या येणाऱ्या फलंदाजाने २ मिनिटात चेंडूचा सामना तयार करण्यासाठी सज्ज असणं अपेक्षित आहे. श्रीलंका-बांगलादेश सामन्याचे पंच अँड्रियन होलस्टॉक यांनी यासंदर्भात प्रक्षेपणकर्त्या वाहिनीला माहिती दिली. त्यामुळे मॅथ्यूजकडे तीन नव्हे तर दोनच मिनिटं होती. तो तेवढ्या वेळात खेळण्यासाठी तयार नसल्याने पंचांनी त्याला बाद देण्याचा निर्णय घेतला.
मॅथ्यूजच्या बाबतीत इथेच गोंधळ झाला. मॅथ्यूज मैदानावर आला खरा. क्रीझवरही उभा राहिला. पण नेमकं तेव्हाच त्याला त्याच्या हेलमेटची पट्टी निसटल्याचं लक्षात आलं. त्यावर त्यानं डगआऊटमधून दुसरं हेलमेट मागवलं. तोपर्यंत बराच वेळ गेला. यादरम्यान शाकिब अल हसननं टाईम आऊटचं अपील केलं. दोन्ही अम्पायर्सनं नियमाचा आढावा घेतला आणि मॅथ्यूजला आऊट दिलं. मॅथ्यूजने पंचाशी हुज्जत घातली पण ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. नाराज मॅथ्यूज तंबूत परतला. परतल्यावर त्याने हेल्मेट फेकून दिलं.
काही तासात मॅथ्यूजने शकीबला बाद केलं. त्यावेळी मनगटावर घड्याळ दाखवत मॅथ्यूजने शकीबला तंबूत परतण्याची खूण केली. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मॅथ्यूजने शकीबच्या अपील मागे न घेण्याच्या वृत्तीवर जोरदार टीका केली. या घटनेपासून टाईम आऊट ची खूण हे द्वंद्वांचं द्योतक झालं.
टाईम आऊट २.०
सध्या श्रीलंकेचा संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. ४ मार्च रोजी झालेल्या सामन्यात बांगलादेशच्या शोरिफुल इस्लामने मनगटावर टाईम आऊटची खूण करत मॅथ्यूजची मिमिक्री केली.
काही दिवसांनी पुन्हा एकदा टाईम आऊट चर्चेत आलं. श्रीलंका संघाने ट्वेन्टी२० मालिका विजयाचा आनंद साजरा केला. हा आनंद साजरा करताना त्यांनी मनगटावर खूण करुन टाईम आऊट दाखवत बांगलादेशला खिजवलं.
याचा पुढचा अंक १८ तारखेला पाहायला मिळाला. बांगलादेशने वनडे मालिका जिंकली. करंडकासह आनंद साजरा करण्यापूर्वी बांगलादेशचा अनुभवी खेळाडू मुशफकीर रहीमने अँजेलो मॅथ्यूजची नक्कल केली. वर्ल्डकपमध्ये मॅथ्यूजने टाईम आऊट बाद दिल्यावर जी नाराजी व्यक्त केली होती त्याची रहीमने मिमिक्री केली. रहीमच्या मिमिक्रीला दाद देत बांगलादेशच्या खेळाडूंनी जल्लोष केला.
आयपीएल स्पर्धा सुरू असतानाच श्रीलंका-बांगलादेश संघांदरम्यानची टेस्ट सीरिज सुरू होत आहे. नागीण डान्स आणि टाईम आऊट या दोन्ही गोष्टी या सीरिजमध्येही चर्चेत असतील याची चाहत्यांना खात्री आहे. सोशल मीडियावर दोन्ही संघांचे प्रचंड प्रमाणात चाहते आहेत. खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला किंवा संघाला उद्देशून काहीही कृती केल्यास त्याला जोरदार प्रतिसाद मिळतो. नागीण डान्स आणि टाईम आऊट मिमिक्रीचे व्हीडिओ व्हायरल होतात. या दोन्हीच्या अनुषंगाने असंख्य मीम्स तयार झाली आहेत.
एवढा वाद का होतो?
आकडेवारी पाहिल्यास श्रीलंकेचं पारडं नेहमीच जड राहिलं आहे. पण गेल्या काही वर्षात बांगलादेशने श्रीलंकेला चांगली टक्कर दिली आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार दासून शनकाने या द्वंद्वाविषयी भूमिका मांडली आहे. आम्ही नव्वदच्या दशकात भारताविरुद्ध स्वत:ला सिद्ध करण्याच्या उद्देशाने खेळायचो. बांगलादेशचा संघ आता आमच्याविरुद्ध तसंच खेळतो. श्रीलंकेला हरवून त्यांना ताकद सिद्ध करायची आहे.
योगायोग म्हणजे श्रीलंकेचे माजी खेळाडू चंडिका हतुरासिंघे यांनी २०१४ ते २०१७ अशी तीन वर्ष बांगलादेशचं प्रशिक्षकपद सांभाळलं. श्रीलंकेचे खेळाडू, त्यांचे डावपेच याविषयी हतुरासिंघे यांना सखोल माहिती होती. याचा बांगलादेशला फायदा झाला. गंमत म्हणजे यानंतर हतुरासिंघे दोन वर्ष श्रीलंकेचे प्रशिक्षक होते. बांगलादेशच्या खेळाडूंसंदर्भातली सगळी माहिती त्यांच्याकडे होती. ते प्रशिक्षक असल्याने श्रीलंकेला बांगलादेशविरुद्धच्या लढतीत फायदा झाला. हतुरासिंघे आता पुन्हा बांगलादेशचे प्रशिक्षक झाले आहेत. श्रीलंका-बांगलादेश क्रिकेट द्वंद्वांत हतुरासिंघे यांची भूमिका महत्त्वाची आहे.
बांगलादेशचे खेळाडू श्रीलंकेत आयोजित होणाऱ्या लंका प्रीमिअर लीगमध्ये खेळतात. श्रीलंकेचे खेळाडू बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये खेळतात. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळताना असलेल्या द्वंद्वांचा परिणाम लीग सहभागात दिसत नाही.
श्रीलंका गेल्या काही वर्षांमध्ये आर्थिक संकटाचा सामना करत आहे. श्रीलंकेला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यात बांगलादेशने मोलाची भूमिका बजावली आहे. पण हे सहकार्य, सामंजस्य मैदानावर दिसत नाही. श्रीलंका क्रिकेटने मोठ्या संघांना टक्कर देण्यासाठी जे प्रारुप अंगीकारलं तेच बांगलादेशने स्वीकारलं आहे. विदेशी प्रशिक्षकांना ताफ्यात समाविष्ट करण्याची सुरुवात श्रीलंकेने केली. बांगलादेशने ही परंपरा अंगीकारली आहे. स्लेजिंग अर्थात शेरेबाजी हे अस्त्र ऑस्ट्रेलियाने प्रदीर्घ काळ वापरलं. प्रतिस्पर्धी खेळाडूंची एकाग्रता भंग करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने याचा खुबीने वापर केला. स्लेजिंग आमच्या डावपेचाचा भागच आहे असं ऑस्ट्रेलियाचं म्हणणं असे. आता त्यांनी याची तीव्रता कमी केली आहे. याच धर्तीवर आक्रमक पवित्र्याने सेलिब्रेशन हे सूत्र श्रीलंका आणि बांगलादेश संघांनी एकमेकांविरुद्ध खेळताना अवलंबले आहे. जिंकण्यासाठी हे कदाचित उपयुक्त ठरुही शकतं पण यामुळे दोन देशांदरम्यानच्या लढतीत फारशी गुणात्मक सुधारणा दिसलेली नाही. मात्र नवनवीन वादांमुळे सामन्यांचे आणि त्या घटनेचे व्हीडिओ, क्लिप्स व्हायरल होतात. याचा फायदा अर्थातच सामन्याचं प्रक्षेपण करणाऱ्या कंपनीला होतो. सोशल मीडियावर यासंदर्भात चर्चा होते. एरव्ही श्रीलंका-बांगलादेश मालिका म्हणजे दुर्लक्षित मालिका असं गृहित धरलं जात असे पण आता या मालिकेकडे क्रिकेटचाहत्यांचं बारीक लक्ष असतं. खेळापेक्षा वादांचीच चर्चा जास्त असते.
श्रीलंका- बांगलादेश आमनेसामने
टेस्ट- २४, श्रीलंका-१८, बांगलादेश- १, अनिर्णित- ५
वनडे- ५७, श्रीलंका- ४३, बांगलादेश- १२, रद्द- २
ट्वेन्टी२०-१६, श्रीलंका- ११, बांगलादेश-५.