Nepal Social Media Ban Protests 2025 : नेपाळमधील सरकारने समाजमाध्यमांवर बंदी घातल्यानंतर तेथील तरुणांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारविरोधात तीव्र निदर्शने केली. सोमवारी (तारीख ८ सप्टेंबर) या निदर्शनांना हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. या गोळीबारात १९ हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर नेपाळचे गृहमंत्री रमेश लाल लेखक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंतप्रधानांनी बोलावलेल्या मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान त्यांनी राजीनामा देऊन या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे. सध्या नेपाळमध्ये तणावपूर्ण शांतता असून काही भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. दरम्यान, नेपाळमधील ही निदर्शने नेमकी कुणी आयोजित केली होती? असा प्रश्न काहींना पडला आहे. त्यासंदर्भात घेतलेला हा आढावा…

नेपाळमधील निदर्शने कुणी आयोजित केली?

नेपाळमध्ये सुरू असलेल्या निषेध आंदोलनांपैकी एका आंदोलनाचे आयोजन ‘हामी नेपाळ’ या स्वयंसेवी संस्थेने केले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही संस्था २०१५ मध्ये अनधिकृतपणे स्थापन झाली होती आणि २०२० मध्ये तिची अधिकृतरीत्या नोंदणी झाली. या संस्थेचे अध्यक्ष सुधन गुरुंग (वय ३६) असून ते परोपकारी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. गेल्या दशकभरापासून गुरूंग हे आपत्ती निवारण, सामाजिक सेवा आणि आपत्कालीन भागात मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. भूकंप, पूर आणि भूस्खलनासारख्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त भागात मदतकार्य उभारणे, आंतरराष्ट्रीय निधी संकलन, देणग्या गोळा करणे आणि आवश्यक वस्तूंचे वितरण करण्याचे काम ते करीत आले आहेत.

‘हामी नेपाळ’ संस्थेनं आंदोलकांना काय आवाहन केलं?

८ सप्टेंबर रोजी ‘हामी नेपाळ’ संस्थेने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून मैतीघर मंडला येथे आंदोलनाचे आवाहन केले होते. विद्यार्थ्यांना एकत्र करण्यासाठी या संस्थेने समाजमाध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर केला. इतकंच नाही तर आंदोलन कसे करावे यावर अनेक व्हिडीओदेखील अपलोड केले. विद्यार्थ्यांनी कॉलेज बॅग, पुस्तके घेऊन यावे व शाळेच्या गणवेशात आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन या व्हिडीओंमधून करण्यात आले. “२०१५ मध्ये आलेल्या भूकंपानंतर मला या संस्थेची स्थापना करण्याची प्रेरणा मिळाली”, असं सुधन गुरुंग यांनी सांगितलं.

आणखी वाचा : तालिबानी नेत्यांना भारतात येण्यास मनाई, संयुक्त राष्ट्रांनी परवानगी नाकारली; नेमकं कारण काय?

‘हामी नेपाळ’ संस्थेची कार्य कोणती?

‘दी अन्नपूर्णा एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत गुरुंग म्हणाले, “एक लहान बाळ माझ्या हातात मरण पावले. तो क्षण मी कधीही विसरू शकणार नाही. त्यावेळी मी समाजमाध्यमांवर एसओएस (SOS) जारी केला आणि त्याला २०० लोकांनी प्रतिसाद दिला होता.” ‘हामी नेपाळ’ या संस्थेचे सध्या १,६०० हून अधिक सदस्य आहेत. गेल्या काही वर्षांत या संस्थेनं विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. संस्थेच्या संकेतस्थळानुसार, त्यांनी नेपाळमधील सैन्याबरोबर मिळून नागरिकांना पुराच्या पाण्यातून प्राण वाचविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच त्यांनी विविध शाळांमध्ये ५०० हून अधिक जॅकेटचे वाटप केले आहेत. त्याशिवाय कावरे, सिंधुपालचोक आणि दोलखा येथील विस्थापित कुटुंबांसाठी अन्न, कपडे, ब्लँकेट आणि वैद्यकीय औषधांची मदतही पुरवली आहे.

‘हामी नेपाळ’ संस्थेचे अनेक समर्थक

जागतिक ख्यातीचे नेत्ररोगतज्ज्ञ आणि परोपकारी व्यक्ती डॉ. संदुक रुइट ‘हामी नेपाळ’ या संस्थेचे मार्गदर्शक आणि समर्थक आहेत. तसेच, २०१८ मध्ये ‘मिस युनिव्हर्स नेपाळ’चा किताब जिंकणाऱ्या मनीता देवकोटा या संस्थेच्या सदिच्छा दूत आहेत. याशिवाय, कोविड-१९ मधून बरे झालेल्या लोकांसाठी प्लाझ्मा बँक सुरू करण्यास मदत करणाऱ्या अभिनेत्री प्रियंका कार्की, दृष्टिहीन आणि शारीरिकदृष्ट्या अपंग कुटुंबांना अन्न मदत देणाऱ्या स्वस्तिमा खडका आणि निधी गोळा करण्यात मदत करणाऱ्या गायिका अभया सुब्बा यांनीही संस्थेला समर्थन दिलेलं आहे. ‘हामी नेपाळ’ ही संस्था कोणत्याही राजकीय पक्षाच्या विचारांशी संलग्न नाही, असं गुरुंग यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील पोस्टमध्ये नमूद केलेलं आहे.

Nepal social media ban
नेपाळमध्ये सोमवारी झालेल्या हिंसक आंदोलनात १९ जणांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. (छायाचित्र दी इंडियन एक्स्प्रेस)

‘हामी नेपाळ’ संस्थेचं आंदोलन कशासाठी?

‘हामी नेपाळ’ संस्थेनं सुरू केलेलं आंदोलन हे पूर्णपणे सरकारच्या निर्णयांविरोधात आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आयोजित केलं होतं, असंही गुरुंग यांनी स्पष्ट केलं आहे. संस्थेच्या संकेतस्थळानुसार, त्यांना अल जझीरा, कोका-कोला, व्हायबर, गोल्डस्टार आणि मलबेरी हॉटेल्स यांसारख्या ब्रँड्सकडून सहकार्य मिळाले आहे. “नवीन पिढीने पुढे येऊन देशाच्या जुन्या कार्यप्रणालीला आव्हान देण्याची वेळ आली आहे. तुमच्यात इच्छाशक्ती असेल तर तुम्ही काहीही करू शकता,” असे गुरुंग यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

हेही वाचा : पाकिस्तानी वंशाच्या महिलेकडे ब्रिटनचं गृहमंत्रिपद; शबाना महमूद भारतविरोधी आहेत का?

हिंसक आंदोलनात पोलिसांसह अनेक जखमी

नेपाळमध्ये सरकारविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागलं. काठमांडूतील संसद भवनाजवळ पोलिस आणि आंदोलनकर्ते आमने सामने आले. या घटनेत आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. जमावाने केलेल्या हल्ल्यात २८ पोलिसांना दुखापत झाल्याचं पोलिस अधिकारी शेखर खनाल यांनी सांगितलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराची मदत घेण्यात आली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ‘कांतिपूर’ वृत्तपत्राने डॉक्टरांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, काठमांडूमधील बीर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सहा आंदोलकांचा मृत्यू झाला आहे; तर सिव्हिल आणि केएमसी रुग्णालयात उपचार घेणारे दोन आंदोलक दगावले आहेत. जखमींवर काठमांडूमधील सहा वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.