देशभरात गृहनिर्माण बाजारपेठेला घरघर लागल्याचे चित्र आहे. यंदा एप्रिल ते जून तिमाहीत घरांच्या विक्रीसोबत नवीन घरांच्या पुरवठ्यातही मोठी घट झाली आहे. घरांच्या वाढत्या किमती, ऑपरेशन सिंदूर आणि इराण-इस्रायल युद्धामुळे निर्माण झालेला भूराजकीय तणाव याचा परिणाम घरांच्या विक्रीवर झाल्याचे दिसून येत आहे. देशातील सात महानगरांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिल ते जून दरम्यान घरांच्या विक्रीत २० टक्के घट झाली आहे. याचवेळी घरांच्या किमतीत ११ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने केलेल्या व्याजदर कपातीमुळे आगामी काळात पुन्हा घरांच्या मागणीत वाढ होईल, असा आशावादही गृहनिर्माण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
विक्रीत घट किती?
अनारॉक ग्रुपने देशातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. यात मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई आणि कोलकता या महानगरांचा समावेश आहे. या अहवालानुसार, देशातील सात महानगरांत यंदा दुसऱ्या तिमाहीत ९६ हजार २८५ घरांची विक्री झाली. गेल्या वर्षी याच तिमाहीत ही विक्री १ लाख २० हजार ३३५ होती. त्या तुलनेत यंदा घरांच्या विक्रीत २० टक्के घट नोंदविण्यात आली आहे. ही घट पुणे आणि हैदराबादमध्ये सर्वाधिक २७ टक्के असून, त्याखालोखाल मुंबई २५ टक्के, कोलकता २३ टक्के, दिल्ली १४ टक्के आणि बंगळुरू ८ टक्के अशी आहे. यात केवळ चेन्नईचा अपवाद असून, तिथे घरांच्या विक्रीत ११ टक्के वाढ झाली आहे.
विक्री नेमकी किती?
देशातील घरांच्या विक्रीत मुंबई आणि पुण्याचा एकत्रित वाटा ४८ टक्के आहे. मुंबईत दुसऱ्या तिमाहीत सर्वाधिक ३१ हजार २७५ घरांची विक्री झाली. त्या खालोखाल पुण्यात १५ हजार ४१० घरांची विक्री झाली असून, बंगळुरू १५ हजार १२०, दिल्ली १४ हजार २५५, हैदराबाद ११ हजार ४०, चेन्नई ५ हजार ६६० आणि कोलकता ३ हजार ५२५ अशी घरांची विक्री झाली. याचवेळी देशातील विक्री न झालेल्या घरांचा साठा कमी झाला आहे. देशात यंदा दुसऱ्या तिमाहीत विक्री न झालेल्या घरांची संख्या ५ लाख ६२ हजार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ३ टक्के घट झाली आहे. पुण्यात विक्री न झालेल्या घरांच्या संख्येत सर्वाधिक १५ टक्के घट झाली आहे.
नवीन पुरवठा कमी?
घरांच्या विक्रीबरोबर नवीन घरांच्या पुरवठ्यातही घसरण झाली आहे. यंदा दुसऱ्या तिमाहीत सात महानगरांमध्ये ९८ हजार ६२५ नवीन घरांचा पुरवठा झाला. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो १ लाख १७ हजार १६५ होता. त्यात यंदा १६ टक्के घट झाली आहे. यंदा दुसऱ्या तिमाहीत नवीन घरांच्या पुरवठ्यात मुंबईत सर्वाधिक ३६ टक्के घट झाली असून, त्या खालोखाल पुणे २५ टक्के, हैदराबाद १९ टक्के आणि बंगळूरू ४ टक्के अशी घट झाली आहे. चेन्नई, दिल्ली आणि कोलकत्यात नवीन घरांच्या पुरवठ्यात अनुक्रमे ६५, १० व १७ टक्के वाढ झाली आहे.
किमतीत किती वाढ?
देशातील सात महानगरांमध्ये घरांच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत ७ टक्के वाढ झाली आहे. दिल्लीत ही वाढ सर्वाधिक २७ टक्के आहे. त्याखालोखाल बंगळुरूमध्ये घरांच्या किमतीत १२ टक्के वाढ झाली आहे. घरांच्या किमतीत होणाऱ्या वाढीमुळे ग्राहकांनी खरेदीसाठी हात आखडता घेतल्याचे चित्र आहे. आगामी काळात किमती नियंत्रणात राहिल्यास घरांच्या मागणीत वाढ होईल, असा सूर गृहनिर्माण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
कारणे कोणती?
घरांच्या विक्रीतील घसरणीसाठी देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर भूराजकीय तणावाकडे अनारॉक ग्रुपचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की, भारत – पाकिस्तान युद्ध आणि इस्रायल-इराण युद्धाचा परिणाम गृहनिर्माण बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. युद्धजन्य स्थितीमुळे ग्राहकांकडून घर खरेदीचा निर्णय लांबणीवर टाकला गेला. याचवेळी गेल्या दोन वर्षांत सातत्याने घरांच्या किमतीत सुरू असलेली वाढही विक्रीला मारक ठरली आहे. रिझर्व्ह बँकेने केलेल्या व्याजदर कपातीमुळे आगामी काळात घरांच्या मागणीत वाढ होण्याचा अंदाज आहे.
sanjay.jadhav@expressindia.com