एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आता निर्णायक टप्प्यावर आली असून भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांनी उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात चुरस होती. न्यूझीलंडने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेवर मोठा विजय मिळवत उपांत्य फेरीच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. तसेच या सामन्यातील निकालानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसाठी उपांत्य फेरीचे गणित फारच अवघड झाले आहे.

न्यूझीलंड-श्रीलंका सामन्यात काय घडले?

बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या न्यूझीलंड-श्रीलंका सामन्यावर पावसाचे सावट होते. याचा विचार करून न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला नाही. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करताना श्रीलंकेला ४६.४ षटकांत १७१ धावांत गुंडाळले. मग न्यूझीलंडने हे लक्ष्य २३.२ षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात गाठत यंदाच्या स्पर्धेतील आपला पाचवा विजय मिळवला.

हेही वाचा – बेरियम असलेल्या फटाक्यांवर बंदी का? हरित फटाके कसे तयार केले जातात?

न्यूझीलंडचे चौथे स्थान भक्कम का?

श्रीलंकेवरील विजयानंतर न्यूझीलंडचे नऊ सामन्यांत १० गुण झाले असून त्यांचे चौथे स्थान भक्कम झाले आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे प्रत्येकी आठ गुण असल्याने त्यांना आपापल्या अखेरच्या साखळी सामन्यांत विजय अनिवार्य आहे. तसेच न्यूझीलंडची (०.७४३) निव्वळ धावगती पाकिस्तान (०.०३६) आणि अफगाणिस्तान (-०.३३८) या संघांच्या तुलनेत बरीच सरस आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत भारताची गाठ न्यूझीलंडशी पडण्याची दाट शक्यता आहे.

पाकिस्तानसाठी समीकरण काय?

न्यूझीलंडच्या विजयामुळे आता उपांत्य फेरीत भारत-पाकिस्तान सामन्याचे क्रिकेटरसिकांचे स्वप्न अधुरेच राहण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचा अखेरचा साखळी सामना इंग्लंडविरुद्ध शनिवारी कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी केल्यास पाकिस्तानला २८७ धावांनी विजय मिळवावा लागेल. अन्यथा आव्हानाचा पाठलाग करताना २८४ चेंडू राखून सामना जिंकावा लागेल. म्हणजेच पाकिस्तानला विजयी लक्ष्य केवळ १६ चेंडूंत पार करावे लागेल. प्रथम फलंदाजी करताना ४०० धावा केल्यास पाकिस्तानला इंग्लंडला ११२ धावांवर, तर ३५० धावा केल्यास ६२ धावांवर आणि ३०० धावा केल्यास १३ धावांवर रोखावे लागले. हे शक्य झाले तरच पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत न्यूझीलंडला मागे टाकू शकेल.

हेही वाचा – विश्लेषण : समन्यायी पाणीवाटपाचा तिढा सुटेल?

अफगाणिस्तानने काय करण्याची गरज?

गुणतालिकेत न्यूझीलंडला मागे टाकण्यासाठी अफगाणिस्तानला शुक्रवारी होणाऱ्या आपल्या अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर तब्बल ४३८ धावांनी विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे अफगाणिस्तानचे आव्हान जवळपास संपुष्टातच आले आहे. अफगाणिस्तानच्या संघाने यंदाच्या स्पर्धेत आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. अफगाणिस्तानने इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांसारख्या माजी विजेत्यांना पराभवाचा धक्का दिला. तसेच त्यांनी नेदरलँड्सवरही विजय मिळवला. मात्र, गेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव त्यांना महागात पडला आहे. ऑस्ट्रेलियाला नमवण्याची अफगाणिस्तानकडे सुवर्णसंधी होती. परंतु ग्लेन मॅक्सवेलचा झंझावात रोखण्यात अफगाणिस्तानचे गोलंदाज अपयशी ठरले आणि त्यांना पराभव पत्करावा लागला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपांत्य फेरीचे सामने कुठे?

उपांत्य फेरीतील एक सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये होणार आहे. मात्र, भारतीय संघ अजून आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या प्रतीक्षेत आहे. न्यूझीलंडला चौथे स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास उपांत्य फेरीतील पहिला सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर १५ नोव्हेंबरला खेळवला जाईल, तर आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हा दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबरला कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर रंगेल. परंतु पाकिस्तानने अशक्य ते शक्य करत इंग्लंडला मोठ्या फरकाने नमवले आणि उपांत्य फेरी गाठली, तर भारताचा सामना मुंबईऐवजी कोलकाता येथे खेळवला जाईल. सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान संघ मुंबईत खेळणार नाही.