भक्ती बिसुरे

नव्या वर्षांच्या स्वागताच्या तयारीत संपूर्ण जग बुडालेले असताना करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूच्या बीएफ.७ या प्रकाराने अनेक देशांमध्ये डोके वर काढले आहे. विशेषत: चीन, जपान, अमेरिका, ब्राझील, फ्रान्स अशा देशांमध्ये बीएफ.७ मुळे वाढणारी रुग्णसंख्या काहीशी चिंता वाढवणारी आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतासाठी पुढील ४० दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 

इतर देशांमध्ये करोनाबाबत सद्य:स्थिती काय आहे?

बीएफ.७ या ओमायक्रॉनच्या उपप्रकाराचा रुग्ण ऑक्टोबरमध्ये सर्वात प्रथम चीनमध्ये सापडला. सध्या चिनी माध्यमांतून समोर येणाऱ्या मर्यादित माहितीनुसार चीनमध्ये या प्रकारामुळे वाढणाऱ्या रुग्णांची संख्या प्रचंड आहे. चीनबरोबरच जपान, अमेरिका, ब्राझील आणि फ्रान्स या देशांमध्येही करोना संसर्गाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळत असल्याचे चित्र आहे. असे असले तरी प्रामुख्याने हे रुग्ण सौम्य लक्षणे असलेलेच असल्याने कडक टाळेबंदीसारखे उपाय कोठेही करण्यात आलेले नाहीत. ‘झिरो कोविड पॉलिसी’ धोरण बंद करणे हेच चीनमधील आता वाढणाऱ्या रुग्णसंख्येमागे प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. मात्र, चीनमधील वास्तवदर्शी माहिती मिळणे अवघड असल्याने त्याबाबत काही भाष्य करणे योग्य नाही.

चीनमधील या परिस्थितीचा भारताला धोका किती?

करोनामुळे भारतात रुग्णसंख्येत वाढ दिसली तरी रुग्णांना रुग्णालयात किंवा अतिदक्षता विभागात दाखल होण्याची गरज भासण्याची शक्यता नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे भारतात लसीकरण आणि संसर्ग या दोन्ही कारणांमुळे मोठय़ा प्रमाणात लोकसंख्येला समूह प्रतिकारशक्ती प्राप्त झाली आहे. त्यामुळे बीएफ.७ मुळे रुग्णसंख्या वाढली, तरी आजार सौम्य लक्षणे दाखवणाराच असेल, याबाबत वैद्यकीय वर्तुळातील तज्ज्ञांचे एकमत आहे.

भारत सरकार कोणती खबरदारी घेत आहे?

चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, थायलंड आणि सिंगापूर येथून येणाऱ्या प्रवाशांसाठी नजीकच्या काळात ‘एअर सुविधा’ हा अर्ज भरणे आणि ७२ तासांमधील आरटीपीसीआर चाचणी अहवाल मागितला जाण्याची शक्यता आहे. २४ डिसेंबर ते २६ डिसेंबरदरम्यान भारतातील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर दाखल झालेल्या सहा हजार प्रवाशांपैकी ३९ प्रवाशांना करोनाचा संसर्ग आढळल्याने नव्या मार्गदर्शक सूचना येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. मंगळवारी देशांतर्गत खबरदारीचा भाग म्हणून देशातील रुग्णालये आणि त्यांची तयारी याबाबतचा एक आढावा घेणारे प्रात्यक्षिक (मॉक ड्रिल) घेण्यात आले.

रुग्णसंख्येच्या लाटेबाबत ४० दिवसांचे गणित काय?

आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते झिरो कोविड पॉलिसी म्हणून चीनने स्वीकारलेले निर्बंध हटवल्यानंतर मुळातच संक्रमण वेग हे वैशिष्टय़ असलेला ओमायक्रॉन झपाटय़ाने पसरला. त्यात चीनच्या र्नैऋत्येकडील सिचुआन प्रांत आणि राजधानी बीजिंगमधील अर्ध्याहून अधिक रहिवाशांना संसर्ग झाला अशी माहितीही समोर येते. विशेषत: रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या नागरिकांना हा संसर्ग होत असल्याचे निरीक्षणही चीनमधून नोंदवण्यात येत आहे. मध्य आशियाई देशांमध्ये आलेली करोना रुग्णसंख्येची लाट साधारण ३५ ते ४० दिवसांनी भारतावर येऊन आदळत असल्याच्या पूर्वीच्या निरीक्षणाला अनुसरून देशातील रुग्णसंख्येच्या दृष्टीने पुढील ४० दिवस महत्त्वाचे असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

लसीकरणातील फरक भारताला तारणार?

चीनमध्ये तयार करण्यात आलेल्या करोना प्रतिबंधात्मक लशींपासून संपूर्ण संरक्षणासाठी तीन मात्रा घेणे आवश्यक होते. प्रत्यक्षात बहुसंख्य नागरिकांनी दोन मात्राच घेतल्या असून त्यामुळे पुरेसे संरक्षण प्राप्त झालेले नाही. ‘झिरो कोविड पॉलिसी’मुळे संसर्गाने प्राप्त होणारी समूह प्रतिकारशक्तीही चीनमध्ये पुरेशा प्रमाणात निर्माण झाली नाही. चिनी बनावटीच्या लशी वापरलेल्या इंडोनेशिया आणि ब्राझीलसारख्या देशांनी २०२१ मध्ये लशीची परिणामकारकता अनुक्रमे केवळ ६५ ते ५० टक्के नोंदवली, अशी माहिती आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिली आहे, असे काही तज्ज्ञ डॉक्टरांकडून नवीन रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सांगण्यात आले आहे. भारतातील लसीकरणाचे चित्र मात्र या तुलनेत अत्यंत समाधानकारक असल्याने लसीकरणाच्या दर्जा आणि प्रमाणातील फरक भारताला या संकटातही  सुरक्षित ठेवेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

bhakti.bisure@expressindia.com