Lake Nyos disaster जगात एक अशी जागा आहे, ज्याला मृत्यूचे सरोवर किंवा नरकाचे द्वार, असे म्हटले जाते. २१ ऑगस्ट १९८६ रोजी आफ्रिकेतील उत्तर-पश्चिम कॅमेरूनमधील न्योस सरोवरात (Lake Nyos) आधुनिक इतिहासातील सर्वांत विध्वंसक घटनांपैकी एक घटना घडली होती. अचानक झालेल्या ‘लिम्निक इरप्शन’मुळे (limnic eruption) कार्बन डायऑक्साइड (CO₂) वायूचा प्रचंड मोठा ढग बाहेर पडला. हा वायू हवेपेक्षा जड असल्यामुळे आजूबाजूच्या खोऱ्यांमध्ये पसरला. त्यामुळे जवळच्या गावांमधली माणसं तसंच जनावरांनी जीव गमावला. काही तासांतच या दुर्घटनेत तब्बल १७०० लोकांचा आणि ३,५०० जनावरांचा मृत्यू झाला. नेमकी ही घटना काय होती? त्या रात्री नक्की काय घडले? या तलावाला नरकाचे द्वार का म्हटले जाते? त्याविषयी जाणून घेऊयात.
१९८६ ची ‘ती’ भयावह रात्र
आफ्रिकेच्या स्थानिक भाषेत या तलावाला ‘लेक न्योस’ म्हणतात. १९८६ साली घडलेल्या विध्वंसक घटनेमुळे जग हादरले. शांत दिसणारे ज्वालामुखी सरोवर काही मिनिटांतच हजारोंच्या मृत्यूचे कारण ठरले. आजही न्योस सरोवर जगभरातील नैसर्गिक धोक्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी एक महत्त्वाचा विषय आहे. या तलावात कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळेच या तलावाला मृत्यूचे सरोवर, असे म्हटले जाते.

न्योस सरोवरातील आपत्तीचे कारण काय होते?
- न्योस सरोवरातील आपत्ती ‘लिम्निक इरप्शन’ नावाच्या दुर्मीळ नैसर्गिक घटनेमुळे घडली होती. तलावातील पाण्यात जेव्हा कार्बन डाय-ऑक्साइड मिसळले जाते आणि अचानक हे पाणी ढवळून निघते, तेव्हा ‘लिम्निक इरप्शन’ होते.
- न्योस सरोवरामध्ये कार्बन डाय-ऑक्साइड वायू अनेक दशकांपासून सरोवराच्या खोल थरांमध्ये उच्च दाबामुळे साठला होता.
- शास्त्रज्ञांचे असे सांगणे आहे की, या घटनेला अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात.
- सरोवरात छोटे भूस्खलन होणे, सरोवराच्या तळाशी लहान ज्वालामुखीची हालचाल होणे किंवा मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे पाण्याचे थर ढवळले गेल्याने, ही घटना घडल्याचे सांगितले जाते.
जेव्हा कार्बन डाय-ऑक्साइडने भरलेले दाट पाणी वेगाने पृष्ठभागावर आले, तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर पडला. हा वायू आजूबाजूच्या खोऱ्यांमध्ये वाहू लागला आणि ऑक्सिजनला विस्थापित करीत गेला. ज्या ज्या भागात कार्बन डाय-ऑक्साइड पसरत गेला, त्या भागातील प्रत्येकाचा मृत्यू झाला. ही दुर्मीळ आणि अनपेक्षित घटना काही विशिष्ट ज्वालामुखींच्या सरोवरांचे धोके दर्शवते. हे सरोवर वरकरणी शांत वाटत असले तरी त्याच्या पोटात प्रचंड हालचाली सुरू असतात.
लोक आणि जनावरांवर प्राणघातक परिणाम
न्योस सरोवरातून बाहेर पडलेला कार्बन डाय-ऑक्साइड वायूचा ढग ताशी २० ते ५० किलोमीटर वेगाने जमिनीला लागून वाहत होता. कारण- हा वायू हवेपेक्षा जास्त जड असतो. हा वायू २५ किलोमीटरच्या परिसरातील गावांमध्ये पसरला आणि त्यामुळे तेथील लोक व जनावरांचा बळी घेतला. कार्बन डाय-ऑक्साइड रंगहीन आणि गंधहीन असतो. मात्र, प्रत्यक्षदर्शींनी सल्फर किंवा कुजलेल्या अंड्यांसारखा तीव्र वास आल्याचे सांगितले. लोक बेशुद्ध झाले आणि जमिनीवर कोसळले. काही तासांत सुमारे १७०० लोक आणि ३,५०० जनावरे मरण पावली.
या घटनेतून वाचलेल्या ४,००० नागरिकांना आपली घरे सोडून जावे लागले. या वाचलेल्यांपैकी अनेकांना गुदमरणाऱ्या वायूमुळे श्वासोच्छ्वासाच्या समस्या, अर्धांगवायू व शरीरावर जखमा झाल्या. या घटनेमुळे लोकांवर मानसिक आघात झाला. कारण- लोकांनी त्यांचे कुटुंब, मित्र आणि शेजाऱ्यांना डोळ्यांसमोर मारताना पाहिले. या आपत्तीमुळे स्थानिकांच्या उपजीविकेचे साधन पूर्णपणे नष्ट झाले. जनावरांचा मृत्यू झाला आणि पिकांचेही मोठे नुकसान झाले.
भविष्यातील आपत्ती टाळण्यासाठी प्रयत्न
न्योस सरोवरासारखे भविष्यातील धोके समजून घेण्यासाठी आणि कमी करण्यासाठी तातडीने वैज्ञानिक अभ्यास सुरू झाला. संशोधकांना असे आढळले की, इतर खोल, थर असलेल्या ज्वालामुखींच्या सरोवरांमध्येही कार्बन डाय-ऑक्साइड जमा होऊ शकतो. २००१ मध्ये न्योस सरोवरात एक कायमस्वरूपी ‘डीगॅसिंग सिस्टीम’ स्थापित करण्यात आली. या प्रणालीमध्ये सरोवराच्या खोल पाण्यात एक पाइप टाकला जातो. त्याद्वारे कार्बन डाय-ऑक्साइड नियंत्रित पद्धतीने हळूहळू बाहेर सोडला जातो. सुरुवातीला ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी पंपांचा वापर केला गेला; पण एकदा वायू बाहेर पडायला लागल्यावर त्याने एक स्वयंचलित प्रवाह तयार केला. सुरक्षा वाढविण्यासाठी २०११ मध्ये आणखी दोन पाइप बसवण्यात आले. २०१९ पर्यंत शास्त्रज्ञांनी पुष्टी केली की, एकच पाइप अनिश्चित काळासाठी सुरक्षित कार्बन डाय-ऑक्साइडची पातळी नियंत्रित करू शकतो. या उपायांमुळे आणखी एका अचानक उद्रेकाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे, ज्यामुळे सरोवरावर सतत लक्ष ठेवले जाते आणि आसपासच्या समुदायांचे अधिक चांगले संरक्षण होते.
जागतिक महत्त्व
इतिहासात दोन लिम्निक इरप्शन झाले आहेत. त्यापैकी न्योस सरोवर हे एक आहे. दुसरी घटना १९८४ मध्ये कॅमेरूनमधील मोनोउन सरोवरात घडली होती. या घटनांनी दाखवून दिले आहे की, काही ज्वालामुखीची सरोवरे, विशेषतः पूर्व आफ्रिकन रिफ्ट प्रदेशातील सरोवर अनेक दशके मोठ्या प्रमाणात कार्बन डाय-ऑक्साइड साठवून ठेवू शकतात, ज्यामुळे एक छुपा धोका निर्माण होतो. न्योस सरोवराच्या शोकांतिकेमुळे अशा सरोवरांना समजून घेण्यासाठी आणि लवकर धोक्याची सूचना देणाऱ्या प्रणाली लागू करण्यासाठी जागतिक वैज्ञानिक अजूनही काम करीत आहेत.