World Milk Day : आज ‘आंतरराष्ट्रीय दूध दिवस.’ दूध हा आहारातील महत्त्वाचा आणि पौष्टिक घटक समजला जातो. भारताला दुग्ध उत्पादनात सक्षम बनवण्यास ही श्वेतक्रांती उपयुक्त ठरली. भारताच्या इतिहासात महत्त्वाची ठरलेली श्वेतक्रांती ही पूर्ण भारतीय धाटणीची आहे का, त्यातील युरोपचे योगदान आणि आजच्या दुग्ध उत्पादनातील श्वेतक्रांतीचा महत्त्वाचा सहभाग जाणून घेणे, महत्त्वपूर्ण ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्वेतक्रांती म्हणजे काय ?

श्वेतक्रांती, धवलक्रांती, ऑपरेशन व्हाइट फ्लड हा दि. १३ जानेवारी, १९७० रोजी सुरू करण्यात आलेला जगातील सर्वात मोठा दुग्धविकास कार्यक्रम होता. भारताच्या राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचा हा महत्त्वाचा प्रकल्प ठरला. भारतातील पशुधन वाढवणे, तसेच दुधाची कमतरता कमी करून दुधाचे उत्पादन वाढवणे आणि पर्यायाने ग्रामीण रोजगार वाढवणे हा या मोहिमेचा उद्देश होता, तसेच श्वेतक्रांतीचे प्रमुख उद्देश दूध उत्पादनात वाढ, ग्रामीण उत्पन्नात वाढ, ग्राहकांसाठी रास्त भाव, दुधाचा स्थिर पुरवठा हे होते. या मोहिमेने ग्रामीण भागातील उत्पादन वाढले, रोजगारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि भारत दुग्धप्रगतीच्या दिशेने वाटचाल करू लागला.

श्वेतक्रांती किंवा ऑपरेशन व्हाइट फ्लडचे शिल्पकार म्हणून ‘अमूल’चे अध्यक्ष आणि संस्थापक डॉ. वर्गीस कुरियन यांना ओळखतात. तत्कालीन पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांनी भारत राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड केली. ‘अमूल पॅटर्न’च्या आधारे, तसेच परदेशातील विकासकामांचा अभ्यास करून भारतामध्ये दुग्धक्रांती घडवून आणली. श्वेतक्रांतीमध्ये राष्ट्रीय दुग्ध क्षेत्रे निर्माण करण्यात आली. स्पर्धा कमी करण्यासाठी दूध क्षेत्रांचे उल्लंघन होणार नाही, असे नियम तयार करण्यात आले. ग्रामीण भाग आणि शहरे यांना जोडणारी क्षेत्रे निर्माण करण्यात आली. मध्यस्थांवर होणारा खर्च टाळून शेतकरी आणि दुग्ध संघटना यांना एकत्रित जोडणारे प्रकल्प निर्माण करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नफ्यामध्ये वाढ झाली. श्वेतक्रांतीमध्ये प्रादेशिक स्तरांवर दूध उत्पादक सहकारी संस्था उभ्या करण्यात आल्या. या संस्थांद्वारे दूध खरेदी आणि इतर सेवा पुरवण्यात येऊ लागल्या.

हेही वाचा : गोवा राज्य का साजरे करते दोन राज्य दिन ? गोवा मुक्ती दिन आणि गोवा स्थापना दिन यांचा काय आहे इतिहास

श्वेतक्रांतीमधील युरोपची देणगी

श्वेतक्रांतीमधील सर्वात महत्त्वाची देणगी म्हणजे दुधाचे वाढते उत्पादन आणि दुग्धजन्य अन्य पदार्थ. श्वेतक्रांतीमधील सर्वात मोठी प्रगती म्हणजे स्किम्ड मिल्क पावडर आणि बटर ऑइल. ही प्रगती ‘युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी’ यांच्या संकल्पना आणि सहकार्यामुळे शक्य झाली. ‘युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी’तर्फे राष्ट्रीय दुग्धविकास कार्यक्रमांतर्गत काही नियम ठरवण्यात आले. पहिल्या टप्प्यात भारतातील १८ ठिकाणी दुग्ध केंद्रे सुरू केली आणि या केंद्रांना दिल्ली, चेन्नई, मुंबई आणि कोलकाता ही शहरे जोडली. या चार शहरांमध्ये ‘मदर डेअरी’ स्थापन केल्या. १९७५ पर्यंत श्वेतक्रांतीचा पहिला टप्पा पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, १. १६ अब्ज रुपयांच्या एकूण खर्चानंतर १९७९ मध्ये पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला.

हेही वाचा : विश्लेषण : ‘अमूल’ आणि ‘आवीन’ वाद काय आहे ? त्याला राजकीय रंग का दिला गेला ?

भारतात जर्सी गाईचे आगमन

दुधाची उत्पादकता वाढवण्यासाठी श्वेतक्रांतीअंतर्गत विदेशी गाईंना भारतात आणले गेले. त्यातील जर्सी गाय ही मुख्य होती. जर्सी गाईचे मूळ हे युरोपमधील आहे. ही संकरित गाय आहे. तिची दूध देण्याची क्षमताही देशी गाईंपेक्षा अधिक होती. त्यामुळे श्वेतक्रांतीमध्ये जर्सी गाई घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले गेले. त्यासाठी त्यांना विशिष्ट अनुदान देण्यात आले. जर्सी गाय ही गुंतवणुकीच्या तुलनेत जास्त परतावा देणारी होती. तसेच तिचे प्रजनन आणि दूध देण्याचे प्रमाण हे देशी गाईंपेक्षा अधिक होते.

श्वेतक्रांतीची यशस्वी वाटचाल

ऑपरेशन फ्लडच्या दुसऱ्या टप्प्यात दूध केंद्रांची संख्या १८ वरून १३६ पर्यंत वाढवली. १९८५ च्या अखेरीपर्यंत ४,२५०,००० दूध उत्पादकांसह ४३ हजार सहकारी संस्थांची स्वयंपूर्ण प्रणाली निर्माण करण्यात आली. देशांतर्गत दूध पावडरचे उत्पादन १ लाख, ४० हजारांपर्यंत वाढवण्यात आले. दुधाचे विपणनही वाढवण्यात आले. ही सर्व प्रगती श्वेतक्रांतीमध्ये स्थापन झालेल्या दूध केंद्रांनी केली.
श्वेतक्रांतीच्या तिसऱ्या टप्प्यात ‘अमूल’ दूध संघाची स्थापना गुजरातमध्ये झाली. तसेच या टप्प्यात दुग्ध सहकारी संस्थांना वाढत्या प्रमाणात दुधाची खरेदी आणि विक्री करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा विस्तार आणि बळकटीकरण करण्यास सक्षम केले. दुधाचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी पशुवैद्यकीय प्रथमोपचार आरोग्य सेवा, खाद्य आणि कृत्रिम रेतन सेवा पुरवण्यात आल्या. श्वेतक्रांतीच्या तिसऱ्या टप्प्याने भारतातील सहकारी चळवळीला बळकटी दिली. दुसऱ्या टप्प्यामध्ये उभारण्यात आलेल्या ४३ हजार संस्थांमध्ये ३० हजार नवीन जोडण्यात आल्या. तसेच १३६ दूध केंद्रांवरून ही संख्या १७३ झाली. या दुग्धविकास कार्यक्रमामध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय वाढला. दूध उत्पादनासोबत प्राण्यांचे आरोग्यही महत्त्वाचे

२१ व्या शतकातील भारताची दूध क्षेत्रातील प्रगती

श्वेतक्रांतीनंतर भारतीय दूध उत्पादनात अधिक वाढ झाली. २०१८ मध्ये भारत जगातील सर्वात अधिक दूध उत्पादक देश ठरला होता. भारतातील उत्तर प्रदेश हे राज्य सर्वात अधिक दूध उत्पादक राज्य ठरले. भारतातील १८ टक्के दूध उत्पादन हे उत्तर प्रदेशमध्ये होते. तसेच दुधाची उपउत्पादने घेण्यामध्ये राजस्थानचा क्रमांक येतो. दूध आणि अंडी यांचे राजस्थानमध्ये उत्पादन होते. २०२१-२२ मध्ये २२ कोटी टन दुधाचे उत्पादन भारताने केले.
परंतु, दुधाचे उत्पादन होत असताना भारत दूध निर्यातीत थोडा मागे आहे. दूध हा नाशवंत पदार्थ असल्याने विदेशात त्याची निर्यात होणे, थोडे अवघड आहे. परंतु दुग्धजन्य पदार्थांची निर्यात काही प्रमाणात केली जाते. परंतु भारत देशांतर्गत दूधपुरवठा करण्यात बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे.

‘आंतरराष्ट्रीय दूध दिवसा’निमित्त श्वेतक्रांती भारताच्या विकासाला नक्कीच कारणीभूत ठरली, असे म्हणता येईल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Operation flood idea of europe or india milk powder became the cause of operation flood vvk
Show comments